व्हीएस न्यूज - सद्य परिस्थितीत देशात शांतता,सहिष्णुता वाढीस लागण्यासाठी रक्त पिपासूंपेक्षा रक्तदात्यांची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी येथे केले.
विश्व विवेक फाऊंडेशन आणि नावंदर कुटुंबियांच्या वतीने प्राधिकरण निगडी येथील संत तुकाराम उद्यानात आज रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खा. साबळे बोलत होते यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आर. एस. कुमार, संयोजक नगरसेवक बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सचिन नावंदर, विजय सिनकर, संजय मंगोडेकर,सुभाष नावंदर, सुरेश नावंदर, सचिन नावंदर, आधार ब्लड बँकेचे मकरंद शहापुरकर आदी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, गेली एकवीस वर्षे कै. अशोक नावंदर यांनी सुरु केलाला रक्तदान शिबीराचा यज्ञकुंड असाच पुढे सुरु रहावा. निस्पृहपणे त्यांनी सुरु केलेले समाजकार्य त्यांची पुढची पिढी करीत आहे. नावंदर परिवाराने सुरु केलेली मोफत स्वर्गरथ रुग्ण वाहिका सेवा समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी देखील शुभेच्छा दिल्या. स्वागत बाबू नायर, सूत्र संचालन सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - उत्तम वक्ता निर्माण होण्यासाठी अभ्यासूवृत्ती, वाचन, भाषेची जाण, वक्तशीरपणा, समयसूचकता या गुणांची आवश्यकता आहे. आपले मत मार्मिक पद्धतीने मांडल्यास समोरच्या व्यक्तींना पटते. वक्ता व श्रोता या दोन्हीही बाबी उत्तम वक्तृत्वासाठी आवश्यक असल्याचे मत ॲड. रविंद्र यादव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'स्पिकर्स फोरम' या विद्यार्थी केंद्रबिंदू असलेल्या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कलेची जोपासना करून त्यामार्फत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करावी हा स्पिकर्स फोरमचा मुख्य हेतू आहे. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, प्रा. विजय नवले, प्रा. नितीन धवस आदी उपस्थित होते.
ॲड. यादव म्हणाले की, सकस विचार करणारे प्रभावी वक्ते समाजासाठी गरजेचे असतात. सचिव संतोष खांडगे म्हणाले की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पिकर्स फोरमचे असणारे महत्व व उत्तम वक्ता निर्माण होण्यासाठी विद्यार्थी दशेतूनच आवश्यक असणारे प्रयत्न संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी असा अभिनव उपक्रम चालू केल्याबद्दल त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थी विकसन विभागाचे कौतुक केले. येथे वक्तृत्व प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल. प्रास्ताविक प्रा. विजय नवले, सूत्रसंचालन प्रा. अर्चना भसे, आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची (पीसीसीओईआर) अंजली टेके या विद्यार्थिनीला जपान (टोकिओ) मधील आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनीत सतरा लाखांचे घवघवीत‘पॅकेज’मिळाले असल्याची माहिती पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी दिली. अंजली ही पीसीसीओईआर मध्ये संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिने जपानी भाषेत पारंगतता मिळविली असल्यामुळे ही संधी तिला मिळाली. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे अंजलीचा सत्कार करताना म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅम्पस प्लेसमेंटची सुरुवात झाली आहे. यापूर्वीही अनामिका कुमारी हीला अकरा लाख तर व्यंकटेश अय्यर ह्यास बत्तीस लाखांचे पॅकेज मिळाले होते. परंतु अंजलीची ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्याने पीसीईटीच्या नावलौकिकात भर पडली आहे. यावेळी संस्थेचे सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी तिचे कौतुक केले.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका कविता संदेश आल्हाट यांची महाराष्ट्र मुलींच्या (19 वर्षाखालील) कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलनात डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे सराव शिबीर संपन्न झाले. कविता आल्हाट या कबड्डी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच आहेत. तसेच मोशी येथील लक्ष्यवेध स्पोर्टस् फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. डॉ. डी.वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या मृदुला महाजन यांचे नेहमी आल्हाट यांना मार्गदर्शन लाभते. प्राचार्यांनी आल्हाट यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जानेवारी 2018 मधील दिल्लीत होणा-या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आल्हाट या महाराष्ट्र कबड्डी मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी काम पाहणार आहेत.
रविवारी आकुर्डीत पुरस्कार वितरण सोहळा
व्हीएस न्यूज - आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा 2017 चा कौमी एकता पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता बीना इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मैदानावर होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती बीना एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे सचिव रफीक आतार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, खजिनदार हमजा खान, सरचिटणीस आझम खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, अब्दुलाह खान आदी उपस्थित होते.
या पुरस्काराचे वितरण कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि प्रमुख पाहुणे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील आदी उपस्थितीत राहणार आहेत. मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना आतापर्यंत तीन राष्ट्रपती शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील गुन्हेगारी जगतावर प्रकाशझोत टाकणारे ‘बेमिसाल’खरे अनुभव इसाक बागवान हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी एकूण पस्तीस वर्षे पोलिस खात्यात सेवा केली. 1984 साली मन्या सुर्वे याचा मुंबईत एन्काऊंटर केला. 26/11 च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात बागवान यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली. अशी माहिती इकबाल खान यांनी दिली.
व्हीएस न्यूज - ज्ञानाच्या भांडवल निर्मितीवरच भारत देश जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. संस्कृती व बौध्दिकता जपत भारताने जगाला शांततामय सहजीवनाचा आर्दश घालून दिला आहे. ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि कलेचा हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महोत्सव म्हणजे भारताच्या बहुसंस्कृतीचा सुरेख अविष्कार आहे. सर्व धर्माचे सार, विचार, मुल्य, तत्व मानवतेसाठी जगा आणि जगू द्या अशी मार्गदर्शक आहेत. असे मार्गदर्शन बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आझम कॅम्पस, कॅम्प पुणे येथे महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन मराठी ॲकेडमीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीईचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार, अकादमीच्या संचालिका नुरजहॉ शेख, मानद सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या प्राचार्या शैला बुटवाला, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग उपसचिव अर्पणा गावडे, डॉ. केतकी भोसले, प्रा. अर्चना देसाई, दिलशाद सैय्यद आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, अखिल भारतीय मराठी संमेलन देखील तीन दिवसाचे असते. मात्र, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पंधरा दिवस एवढ्या भव्य प्रमाणात पुण्यात साजरा केला जात आहे. ही अभिमानाचीबाब आहे. ज्ञान,साहित्य, संस्कृती, कलेचा हा महोत्सव प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी अक्षरांशी, पुस्तकांशी, ज्ञानाशी मैत्री करावी यातूनच आपले जीवन संपन्न होईल. मानवी जीवनात पुस्तकांचे आणि वाचनाचे स्थान अनमोल आहे. पुस्तके ज्ञानाचे वाहक आहेत. 21 वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. बुध्दी हेच भांडवल आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचे एकत्रित शिक्षण एकाच कॅम्पस मध्ये एवढ्या बहुसंख्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. बेगलूरु येथील आयआयएम पेक्षा ही पाचपट जास्त येथे संगणीकरण झाले आहे. हे अभिमानास्पद व गौरवास्पद आहे अशा शब्दात देशमुख यांनी एमसीई सोसायटीचा गौरव केला. ज्या भाषेतून ज्ञानाची, विज्ञानाची व रोजगारांची निर्मिती होते. ती भाषा संपन्न होते. आपली मातृ भाषा आपण गमावून बसत आहोत. शासकीय मराठी शाळा बंद पडत आहेत ही चिंतेची बाब आहे. जगात फक्त चार टक्के व्यवहार इंटरनेट वरुन इंग्रजीत होतात. भारतात याचे प्रमाण दहा टक्के आहे. गुगल ट्रान्सलेटमुळे आता आपल्या मातृभाषेतून देखील व्यवहार वाढतील असा आशावाद देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागत प्रास्ताविक नुरजहॉ शेख, प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. केतकी भोसले, सूत्रसंचालन दिलशाद सैय्यद आणि आभार प्रा. अर्चना देसाई यांनी मानले.
व्हीएस न्यूज - काल भिडे गुरुजींची साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे पाठराखण केली होती. दरम्यान, उदयनराजेंच्या याच मुलाखतीचा आधार घेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बारामती पोलिसांकडे ही मागणी बारामतीमधील हेमचंद्र मोरे या वकीलांनी एक पत्रक काढून केली आहे. या मुलाखतीमध्ये उदयनराजेंनी वारंवार जातीचा उल्लेख करुन दलितांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भिडे गुरुजींवर भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर आरोप सुरु झाल्यानंतर त्यांच्या पाठिशी उदनयराजे उभे राहिले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. याशिवाय उदयनराजे भोसलेंनी जितेंद्र आव्हाड यांना बोलताना विचार करावा असा सल्लाही दिला.
भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीचे सूत्रधार भिडे गुरुजी असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच काही हिंदुत्त्ववादी संघटना या घटनेमागे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केला आहे.
व्हीएस न्यूज - रमेशदादा बागवे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा.मार्तंड साठे यांच्या हस्ते माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा सहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. कारगिल विजयामध्ये मोलाची कामगिरी केलेल्या मेजर संतोष कांबळे व गणेश दामोदरे या जवानाना कारगिल विजय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श पुरस्कार शिवाजीराव माने व गजानन वाव्हळ यांना देण्यात आला. तर सावळेराम भोर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आण्णासाहेब गोडसे, भरत शितोळे, शिवाजीराव काटे, रामचंद्र पाटील, शिवाजी मोरे यांना वारकरी भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, मावळ लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, राजन नायर, वीरेंद्र गायकवाड, हभप वाघ महाराज, जेष्ठ नेते सुदामराव ढोरे, महेश भागवत, बाळासाहेब शितोळे, कर्नल स्वामी बारवे, किशोर धगाटे, बापु घेडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यश शेषराव कसबे व मावळ लोकसभा युवक कॉंग्रेस सरचिटणीस नरेंद्र कसबे, शिवाजी शिंदे, राजेंद्र कसबे, सनी कसबे, विजय देवरे, कुंदन कसबे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष नवले यांनी केले. आभार धर्मेद्र कसबे यांनी मानले....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002