व्हिएसन्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागातील लाचखोर लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
प्रकाश जयसिंग रोहकले (वय-39, रा. पिंपळे गुरव) असे निलंबित करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.
बिलाच्या फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन धनादेश देण्यासाठी ठेकेदाराकडून लिपिक रोहकले याने चार हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक (एसीबीकडे) तक्रार दिली. त्यानुसार 22 डिसेंबर 2017 रोजी पालिका मुख्यालयात ठेकेदाराकड़ून चार हजार रुपयांची लाच स्वीकाराताना रोहकले याला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले होते.
त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने रोहकले याला 25 डिसेंबर 2017 रोजी 14 दिवसांची मॅजिस्टक कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी महापालिकेला दिली. त्यानंतर महापालिकेने रोहकले याला निलंबित केले आहे.