व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेली हॉटेल्स बंद करण्यात यावीत अशी मागणी मनसेचे महापालिकेतील गटनेता सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
मुंबईतील लोअर परळ भागात कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या रुफटेरेस हॉटेलला 29 डिसेंबर रोजी आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चिखले यांनी ही मागणी केली आहे. शहरात अनेक रुफ टेरेस हॉटेल्स असून काही त्यातील काही बेकायदेशीरही आहेत. याठिकाणी कमला मिल प्रमाणे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे चिखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वाकड येथील सयाजी हॉटेल, पिंपळे सौदागर येथील स्पॉट नाईन हॉटेल आणि पिंपरीतील सेंट्रल मॉलमध्ये रुफटेरेस हॉटेल्स चालविली जात असून तेथे बार्बेक्यू देखील असतो. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. शिवाय, या हॉटेल्समध्ये दुर्घटना घडलीच तर खाली उरतण्यासाठी योग्य ती सोयही नाही असे निवेदनात म्हटले आहे.