व्हीएस न्यूज - साहित्यसुधा आणि सूरज पब्लिकेशन, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तुझ्याविना' या गझलसंग्रहाचे आणि 'जीवनगाणे' या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन येत्या रविवारी निगडी येथे होणार आहे. येथील कै.जी.एस.कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख (पनवेल) यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र साहित्य परिषद शाखाध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत हुईलगोळकर आदी उपस्थित राहणार आहेत. प्रकाशनानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. विनामूल्य असणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने दादा इंचलकर आणि राजेश जैन यांनी केले आहे....Read More
व्हीएस न्यूज - भर दिवसा स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूममधील तीन कपाटातील 35 हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने असा तब्बल 24 लाख 34 हजार 165 रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना बुधवारी पिंपळे निलख येथे घडली. करिपाल जोसेफ थॉमस (वय 63, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिपाल जोसेफ थॉमस व त्यांच्या पत्नी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घर कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील 807.905 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 24 लाख, 34 हजार 165 रुपयांचा ऐवज चोरला. सायंकाळी थॉमस साडेपाच वाजता घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य जनतेला विविध प्रकारची आश्वासने देऊन फसवणूक करित आहे. प्रामुख्याने पेट्रोल व डिजेल या अनावश्यक वस्तुंवर जीएसटी लागून वेळोवेळी दरवाढ केली जात आहे. तसेच, रहाटणी - काळेवाडी परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत करून प्रस्थापित राजकीय पुढारी जनतेला वेठीस धरत आहेत.
त्याचप्रमाणे भाटनगर- पिंपरी परिसरात स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्त पिंपरी मोरवाडी चौकातील राजमाता अहिल्यादेवी पुतळा परिसरातशिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बुधवार दि. ३१ रोजी निदर्शने करण्यात आली. या संदर्भात पिंपरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टेकर यांना निवेदन देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात आली .
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख खंडु शिरसाठ, लहु तिकोने, शिवसेना प्रणित शिव व्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले, शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, गोरख पाटील ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, बाळासाहेब गायकवाड, नाना गायकवाड,दत्ता गिरी, रोहीदास तांबे, दिपक कांबळे, माऊली जाधव, भोसरी विधानसभा प्रमुख भरत इंगळे, पिलाभाऊ बनसोडे, नितीन गायकवाड, अजय कांबळे,अरूण गायकवाड, तुकाराम शिंदे, अक्षय थोरात, सोनु शिरसाठ, पुणे जिल्हा महीला संघटीका अनुजा शिंदे, महीला शहर संघटीका भाग्यश्री मस्के, संजय गांधी निराधार योजना पिंपरी विधानसभा सदस्या सारीका तामचीकर, सिमा रावळकर, अनुसया तापचिकर, सोनी भाट , गिता माच्छरे, ममता माच्छरे,मंदाकिनी मोरे, मनिषा मगर, लक्ष्मी कांबळे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - भाजप सरकार उद्योजक धार्जिणे असून माथाडी कायद्यामध्ये उद्योजकांच्या सोयीनुसार बदल करून माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान सरकार आखत आहे. कायद्यात बदल करुन माथाडी कामगाराला देशोधडीला लावण्याचा सरकाराचा इरादा आहे. माथाडी कामगारांचे दैवत आमदार आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी बनविलेल्या कायद्याची सरकारने १७ जानेवारीला काढलेल्या अध्यादेशाद्वारे चिरफाड होत आहे. सरकार त्यांच्या व उद्योजकांच्या स्वार्थासाठी गरीब व माथाडी कामगारांच्या लाखो कुटुंबीयांना उपासमारीच्या खाईत लोटत आहे. नवीन माथाडी मंडळ अस्तित्वात आणून यावर राजकीय व माथाडी कामगारांची जाण नसलेल्या पुढा-यांना बसवून ठराविक घटकांच्या हिताचे राजकारण करण्याचा डाव असल्याचा, गंभीर आरोप महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केला आहे. प्रस्तावित अध्यादेश मागे घेण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र मजदूर संघटना पुणे जिल्ह्यातील एकही कंपनी चालू देणार नाही. त्यासाठी संघटना उग्र आंदोलन करेल. आंदोलनातून होणा-या सर्व नुकसानीला सरकारच जबाबदार असेल, असेही सय्यद म्हणाले.
पिंपरीतील, महात्मा फुले पुतळ्यासमोर महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, मुरलीधर कदम, ज्ञानोबा मुजुमले, भिवाजी वाटेकर, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, राहुल कोलटकर, राजू तापकीर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडुरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबाले, मारुती वाळुंज, संतोष जाधव, अक्षय पवार, प्रभाकर गुरव, मारुती कौदरे, सतिश कंटाळे, सुनील सावळे, अशोक साळुंखे, हनुमंत शिंदे, शंकर मदने, गोरक्ष बांगर, बाबासाहेब पोते, संतोष माशेरे, सुभाष मुके, ज्ञानेश्वर घनवट, विजय खंडागळे, चंद्रकांत पिंगट, ज्ञानेश्वर घनवट, विलास ताठे आदी माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना सय्यद बोलत होते. तसेच मंचर, जुन्नर, ओथुर, आळेफाटा आणि नारायण गाव या बाजारपेठांचे काम बंद केले होते. तसेच आद्योगिक परिसरातील पाच हजारहून अधिक माथाडी कामगारांनी धरणे आंदोलन केले.
”माथाडी कामगारांचे दैवत आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी कायदा बनवला, आणि संघटित कामगारांना न्याय दिला. त्यानंतर प्रत्येक वेळेच्या सरकारने त्या-त्या वेळी माथाडी कामगारांना संरक्षण देण्याचे काम केले. भाजप सरकार मात्र सत्तेचा दुरुपयोग करून हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठीच कायद्यामध्ये बदल करून लोकशाहीमधील कामगार चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा” आरोप करत इरफान सय्यद पुढे म्हणाले की, ”३६ माथाडी मंडळाचे विलिनिकरण करुन राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा सरकार घाट घालत आहे. असे महामंडळ तयार करत असताना कोणत्याही प्रकारच्या माथाडी कामगार यांच्याशी चर्चा न करता हा निर्णय घेत आहे, असे महामंडळ तयार करून सरकार मंत्री यावर अध्यक्ष करण्याच्या बाबतीत घाट घालत आहे. जेणेकरून प्रशासनावर दबाव ठेवण्यात येईल, अशा प्रकारचे कारस्थान सरकार आखत आहे. माथाडी कामगाराला मोडीत काढायचा हा प्रयत्न आहे”.
”माथाडी कायद्यामध्ये उद्योजकांच्या सोयीनुसार बदल करून माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान भाजप सरकार आखत आहे. नियोजित कायद्यानुसार आण्णासाहेब पाटील यांनी असंघटीत माथाडी कामगारांच्या न्याय व हक्कासाठी आदर्श माथाडी कायदा बनवन्यासाठी प्रयत्न केले. त्या कायद्याची चिरफाड या सरकारने १७ जानेवारीला काढलेल्या अध्यादेशाव्दारे केली आहे. हे सरकार त्यांच्या व उद्योजकांच्या स्वार्थासाठी गरीब व कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या लाखो कुटूंबांना उपासमारीच्या खाईत लोटत आहे. यासाठी नवीन माथाडी मंडळ अस्तित्वात आणून यावर राजकीय व माथाडी कामगारांच्या समस्येची जाण नसलेल्या पुढा-यांना बसवून ठराविक घटकांच्या फायद्यापोटी असे करणे अत्यंत चुकीचे आहे”, असेही सय्यद म्हणाले.
व्हीएस न्यूज - सौरभ राव यांची त्वरित बदली करून पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमोल थोरात यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सौरभ राव फेब्रुवारी २०१४ पासून अर्थात तब्बल चार वर्षांपासून कार्यरत आहेत. शासकीय सेवकांच्या बदल्यांसदर्भात नियमावली, मार्गदर्शक तत्वे आणि संकेतावली अस्तित्वात आहे. त्यानुसार शासकीय सेवक एकाच पदावर तीन वर्षे आणि एकाच जिल्ह्यात पाच वर्षे सेवा करू शकतात. विशेष बाब म्हणून या कालावधीत बदल करता येतो. त्यानुसार सौरभ राव पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी तब्बल चार वर्षांपासून सेवेत आहेत; मात्र सौरभ राव यांच्याकडून कामात हलगर्जी होत असून, त्यांचा बेजबाबदारपणा वाढला आहे.
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील दंगल केवळ प्रशासकीय बेजबाबदारपणाची परिणीती आहे. ‘विजयदिन’ आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम आदींबाबतचे महत्त्व, उपाययोजना, घ्यावयाची काळजी आणि नियोजन करण्याकडे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. विजयदिनी कोरेगाव भीमा येथे तब्बल सात ते आठ लाख अनुयायी येणार असल्याचा अहवाल संबंधित विभागांकडून देण्यात आल्यानंतरही सक्षम नियोजन आणि ठोस उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी राव यांनी उदासीनता दाखविली. केवळ काही हजार अनुयायी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावतील, असे गृहीत धरून जिल्हाधिकारी राव यांनी विजयदिनाच्या नियोजनबाबत कामचलाऊपणा केला. दंगल उसळल्यानंतरही जिल्हाधिकारी राव यांनी तत्परता न दाखवता निर्णय घेण्यात कुचराई केली. परिणामी प्रकरण अधिक चिघळले आणि जिल्हाधिकारी राव यांच्या अकार्यक्षमतेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्वरित निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात जिल्हाधिकारी राव कमी पडले. त्यामुळे समाजकंटकांना संधी मिळाली आणि सरकारच्या विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले. यातून पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि सरकार म्हणून भाजपची प्रतिमा मलीन झाली.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अकार्यक्षमतेचा फटका महाराष्ट्राला आणि सरकारला सहन करावा लागला. स्थानिक पातळीपासून राज्य आणि केंद्रातही भाजप सरकारकडून पारदर्शक आणि विकासाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. सर्वसामान्यांकडून भाजपच्या कार्यशैलीला पसंती मिळत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार भाजप सरकार कार्यरत आहे; मात्र काही जण याला बाधा निर्माण करीत आहेत. अशांपैकी जिल्हाधिकारी सौरभ राव एक असल्याचे ‘कोरेगाव भीमा’ प्रकरणावरून दिसून आले आहे. त्यामुळे सौरभ राव यांची त्वरित बदली करून जिल्हाधिकारी पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निवेदनातून केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी येथील हेमू कलानी उद्यानामध्ये शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा लवकरच सुशोभिकरण करुन बसविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. याबाबत वाघेरे यांनी पाठपुरावा सुरू केलायं.
याबाबत संदिप वाघेरे म्हणाले की, २००६ पासून या उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा बसविण्याचे काम रखडले होते. मुंबई येथील कलासंचनालय यांचे मान्यता अभावी हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. या पुतळ्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी सिंधी बांधवांकडून वारंवार केली होती. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करुन कलासंचनालय मुंबई यांची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार हेमू कलानी यांच्या पुतळ्यास कलासंचनालय मुंबई यांनी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात आले आहे. लवकरच मुख्य वास्तुशास्ञ मुंबई यांची मान्यता मिळवून कामास सुरुवात केली जाणार असल्याचे वाघेरे म्हणाले.
टाटा मोटर्स व ‘यशस्वी’ संस्थेतर्फे विद्यार्थ्याना ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेन्ट कौन्सिलचे प्रशिक्षण संपन्न.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्किल इंडिया मिशनला यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांना उद्योगजगताकडून मिळणारा अनुकूल प्रतिसाद हा निश्चितच आशादायी आहे, असे मत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. पिंपरी येथील टाटा मोटर्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करताना बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, टाटा मोटर्स सारखे उद्योगसमूह स्वतःच्या विकासासोबतच सातत्याने देशातील जनतेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीही महत्वपूर्ण योगदान देतात, म्हणूनच मेक इन इंडिया व स्किल इंडिया सारख्या महत्वाकांक्षी अभियानातही टाटा मोटर्सने घेतलेला पुढाकार हा वाखाणण्याजोगा आहे. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत 'ऑटो कंपोनंट असेम्ब्ली फिटर' या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या १६६ विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये ९४ मुले व ७२ मुलींचा समावेश आहे.
यावेळी बोलताना आपल्या मनोगतात टाटा मोटर्सचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर व कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर म्हणाले की, नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन अर्थात नीम योजनेअंतर्गत टाटा मोटर्स मध्ये जे विद्यार्थी कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत त्यांची कामाप्रती असलेली शिस्त, काम करण्याची शैली ही वेगाने प्रगतिपथावर आहे. दहावी, बारावी चे शिक्षण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे तांत्रिक कौशल्य नसतानाही ऑन द जॉब ट्रेनिंग पद्धतीने ही मुले- मुली आज कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे वाहन उत्पादन क्षेत्रातील अद्ययावत तांत्रिक कौशल्यामध्ये खूप कमी वेळात निपुण होत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे असेही बोरवणकर यांनी सांगितले. यावेळी आपल्या मनोगतात टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी गजेंद्र चंडेल यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना सांगितले की, नीम सारख्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे युवकांना प्रत्यक्ष कंपनीत चालणारी कामकाज पद्धती जवळून पाहता येते,हाताळता येते व शिवाय त्या विषयाचे तांत्रिक ज्ञानही प्रशिक्षकांमार्फत शिकता येते, ही अतिशय परिणामकारक बाब आहे. विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी टाटा मोटर्सतर्फे प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवक युवतींना प्राधान्य दिले जाते असेही चंडेल यांनी सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सर्व प्रशिक्षकांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.अशाप्रकारचे प्रशिक्षण गुजरात राज्यातील सानंद येथील टाटा कंपनीच्या प्रकल्पामध्येही सुरु असून, मार्च २०१८ पर्यंत आणखी ५०० प्रशिक्षणार्थ्याचें प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगीं कल्याणी पुरोहित व अनंत मराठे या विद्यार्थ्यानीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व्ही. सुरेश, सीव्हीबीयु क्वालिटी हेड राजेश खत्री, सीव्हीबीयु प्लांट हेड आलोक सिंह, पीव्हीबीयू प्लांट हेड जयदीप देसाई,टाटा मोटर्सचे कौशल्य विकास विभाग प्रमुख श्रीनिवासन, कंपनीचे टॅलेंट एक्विझिशन हेड सुधांशु मिश्रा, पीव्हीबीयू वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका अनुराधा दास ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे अधिकारी संजीव तिवारी, अलका पांडे, 'यशस्वी' चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक राजेश नागरे यांच्यासह विविध पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टाटा मोटर्सचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व्ही. सुरेश यांनी, सूत्रसंचालन मनुष्यबळ व्यवस्थापक नेहा शिशुपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन पीव्हीबीयूचे कौशल्य विकास प्रशिक्षण विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002