घटनेला 24 तास उलटूनही आरोपीचा थांगपत्ता नाही व्हीएस न्यूज - एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 74 लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ऍक्सिस बॅंकेच्या रहाटणी येथील शाखेमध्ये घडली होती. पैशांची रिकामी पेटी शिक्रापूरच्या पुढे सापडली असून आरोपी चालक पसार झाला आहे. या घटनेला चौवीस तास झाल्यानंतर पोलीसांनी आरोपीचा थांगपत्ता लागला नसल्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील ऍक्सिस बॅंकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी 74 लाखांची रोकड घेऊन व्हॅन चालक व एक सुरक्षा रक्षक आले होते. सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरताच व्हॅनचालक कोरेकर याने व्हॅनसहित 74 लाखांची रोकड घेऊन पसार झाला. संबंधित कंपन्यांचे सक्षम अधिकारी घटनास्थळी येण्यासाठी व त्यांना माहिती मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे पोलिसांना वर्दी देखील उशिराच मिळाली. याचा फायदा घेत चालक व्हॅन व रोकडसह शहराबाहेर लवकरच पसार झाल्याची चर्चा होऊ लागली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित वाकड व सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून व्हॅनचा शोध सुरु केला. आरोपी कोरेकर याने पळवून नेलेली व्हॅन भोसरी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. तर शिक्रापूरच्या पुढे पैसे ठेवलेली लोखंडी रिकामी पेढी आढळली आहे. पेढीमध्ये नोटांच्या बंडलवर लावण्यात आलेल्या पावत्या देखील सापडल्या आहेत. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.