व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहन करण्यात आले. परंतु या ध्वजारोहन प्रसंगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने ध्वजाला देण्यात येणारी प्रथम सलामी तळेगाव पोलीसांनी दिली नाही. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रजासत्ताकदिनी सकाळी 8 वा 15 मिनिटांनी नगरपरिषद तळेगाव दाभाडे येथे ध्वजारोहनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व प्रथम तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने ध्वजाला सलामीची मानवंदना दिली जाते व नंतर नगराध्यक्षाच्या हस्ते ध्वजारोहन होते. मात्र यावर्षी हि प्रथा खंडित झाली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तळेगावचे माजी नगराध्यक्ष ऍड रविंद्र दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी निवेदनाव्दारे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, संदीप शेळके, अमोल शेटे, संतोष शिंदे, इंद्रमल ओसवाल, नगरसेविका विभावरी दाभाडे, शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, संध्या भेगडे, काजल गटे, मंगल जाधव, नीता काळोखे, कल्पना भोपळे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, सुजाता खेर, तळेगाव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, रजनी ठाकूर आदींच्या स्वाक्षरी आहेत. याबाबत जबाबदार व्यक्तीवर योग्य ती कारवाई न केल्यास जन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे निवेदनात नमूद केले आहे.