अलंकापुरीतील इंद्रायणी नदी पात्रात मासेमारीला बंदी
आळंदी
2018-01-31
मासेमारीचे साहित्य जप्त करणार; जलचरांचे अस्तित्वासाठी निर्णय
व्हीएस न्यूज - अलंकापुरीतील इंद्रायणी नदी पात्रात जलचरांचे अस्तित्वासाठी मासेमारी बंदीचा निर्णय पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यापुढील काळात नदी पात्रात मासेमारी करताना आढळल्यास साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिला आहे. याबाबतची कारवाई पाणी पुरवठा विभागावाचे माध्यमातून करण्यात येणार आहे. मासेमारी रोखण्याचे उपाय योजना करण्याच्या सूचना तसेच पाणी पुरवठा केंद्रासह पाणी साठवण बंधाऱ्याचे दोन्ही किनारे स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच पाणी पुरवठा बंधारा, चौंडी घाट परिसराचे सुशोभीकरण, स्वच्छता, किनारा मार्ग साफसफाईचे काम आळंदी नगरपरिषद, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन व रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी सांगितले. इंद्रायणी नदी प्रदूषण व जलपर्णी मुक्त करण्याचे काम प्रभावी पणे हाती घेण्यात आले आहे. यासाठी नागरिक, लोकसहभाग यासाठी आवाहन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी तील स्वच्छता व जलपर्णी मुक्त नद्यांचे प्रवाह कायम सुरु रहावेत या मोहिमेत जिल्ह्यातील सेवाभावी संस्थानी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एकाचवेळी सर्वत्र जलपर्णी हटविण्याची मोहीम सुरु होण्याची गरज असल्याने पिंपरी महापालिकेने तसेच आळंदी लगतच्या ग्रामपंचायतींनी देखील आपापल्या नदी परिसरातील जलपर्णी हटविण्याचे कामकाज सुरु करण्यासाठी संपर्क मोहीम सुरु करण्यात आल्याचे नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष सागर भोसले यांचे मार्गदर्शनाखाली केळगाव, चिंबळी, मोई, निघोजे, कुरुळी आदी ठिकाणी यासाठी संपर्क मोहीम राबविण्यात आली जलपर्णी रोखण्यास वायर रोप, ड्रम बांधण्याचे काम सुरु इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त करण्याचे कामाचा भाग म्हणून वायर रोप, ड्रम बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांना आळंदीत इंद्रायणी नदी पात्रात पाणी उपलब्ध व्हावे, तसेच इंद्रायणी स्वच्छ राहावी यासाठी मुख्य प्रदर्शनी भागात नदी पात्र जलपर्णी मुक्त करण्यात आले आहे. यासाठी इंद्रायणी नदीवर ठिकठिकाणी जलपर्णी अडविण्यात आली असून नदी पात्राबाहेर जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे.