व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 या उपक्रमाअंतर्गत चालू असलेल्या अभियानास नागरिक आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून उस्फुर्त प्रतिसात मिळत असून राज्य शासनाने आयोजित केलेल्या प्रभागनिहाय स्पर्धेसाठी नगरसेवक आणि नगरपरिषद आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
राज्य शासनाच्या अभियानानुसार स्वच्छ तळेगाव दाभाडे सुंदर तळेगाव दाभाडे ही संकल्पना युध्दपातळीवर नगरपरिषदेकडून राबविण्यात येत आहे. या संकल्पनेसाठी तळेगावकर नागरीकांना जनजागृतीच्या माध्यमातून सहभागी करुन घेत आहे. घरोघरी यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरीकांचे प्रबोधन केले जात आहे. नगरपरिषदेकडून यासाठी जाहिरात फलक, आरोग्य पत्रके, माहितीपत्रके, स्टिकर, इलेक्टानिक डिस्प्ले, वृत्तपत्र माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये यातील सर्व विद्यार्थी, तसेच जेष्ठ नागरीक संघ, लयन्स, रोटरी क्लब बरोबरच सामाजिक संस्था, या मधून स्वच्छता विषयक सहभाग आणि जागृती वाढविण्यात येत आहे. शहरातील वाणिज्य क्षेत्रातील हॉटेल्स व्यावसायिक, मटन, चिकन व्यावसायिक यांनाही या अभियानात सहभागी करुन घेतले जात आहे. प्रत्येक प्रभाग निहाय स्वच्छतेची स्पर्धेचे आयोजिन करण्यात आल्याने प्रभागा प्रभागात चुरस निर्माण झाली आहे. लहानापासून थोरांपर्यंत या अभियानात सहभाग वाढला आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, आरोग्य सभापती अरुण भेगडे, सर्व नगरसेवक आणि प्रशासन हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.