व्हीएस न्यूज - पीएमपीएमएल बस चालकाला बस चालवत असताना अचानक भोवळ आली. बस बाजूला घेत असताना नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड येथे केंद्रीय विद्यालयासमोर घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी - किवळे (एमएच 12, सीएच 3946) ही बस निगडीवरून देहूरोडच्या दिशेने जात होती. देहूरोड जवळील केंद्रीय विद्यालयासमोर आल्यानंतर बस चालकाला अचानक भोवळ आली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटून बसचे एक चाक रस्त्याखाली खड्ड्यात उतरले. यामुळे बस पलटी झाली. बसमध्ये प्रवासी होते. त्यातील 7-8 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर, चालक गंभीर जखमी झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करत असताना 65 वर्षीय वृद्ध मजुराचा सज्जावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. कचरू लिंबाजी डोंगरे (वय-65) असे सज्जावरून पडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजी करण्याचे काम सुरु आहे. डोंगरे हे याठिकाणी मजुर म्हणून काम करत होते. दुपारी नेहमीप्रमाणे सज्जावर उभे राहून सभागृहाला प्लास्टर करण्याचे काम करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक भोवळ आल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने डोंगरे यांना त्वरीत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पवना नदीत उडी मारून शनिवारी आत्महत्या केलेल्या केलेल्या तरूणाचा मृतदेह रविवारी सकाळी अग्निशामक दलाने शोधून काढला. अक्षय गेरबा ढोणे (वय 26, रा. जयमालानगर, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास अक्षय याने सांगवीतील मैलाशुध्दीकरण प्रकल्पाजवळ नदीपात्रात उडी मारली. परिसरातील नागरिकांनी त्वरीत महापालिका अग्निशामक दलाला खबर दिली. अग्निशामक जवानांनी त्याचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो मिळून आला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.
व्हीएस न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी पळवल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. याप्रकरणी कुलकर्णी (वय 68) आणि मेघना डबळी (वय 69) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी आणि मेघना डबळी वीर आर्केड बीआरटी रोड येथून जात असताना मोटारसायकलवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी 'आम्ही पोलीस आहोत तुमच्या गळ्यातील सोने चोरीला जाऊ शकते तुम्ही तातडीने तुमच्या गळ्यातील दागिने तुमच्या पर्समध्ये टाका'. असे बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स ऐवजी त्यांच्या जवळील बॅगेत टाकून फरार झाले. हे लक्षात येताच दोघींनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी एक जण उंच असून 30 ते 35 वर्षाचा आहे. त्याने काळी पॅंट आणि तपकिरी रंगाचा शर्ट घातला आहे. तर दुसरा एक जण धिप्पाड सावळा असून त्याने काळा आणि तपकिरी रंगाचा मिक्स काळा टी शर्ट काळी पॅन्ट आणि काळी टोपी घातली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - महिनाभरापुर्वी धावत्या शिवनेरी एस.टी.बस चे उघडल्या गेलेल्या डीक्कीमुळे घडलेल्या अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सोमवारी दुपारी निगडीवरुन मनपा कडे जाणाऱ्या पीएमपीएल बसच्या उघड्या असलेल्या सीएनजी बॉंक्सचे झाकन जागरुक नागरिकाने वेळीच वाहनचालकास निदर्शनास आणुन दिल्यामुळे एसटी बस अपघाताची पुनरावृती टळली. खडकी येथे वास्तव्यास असलेले डॅंनियल रत्नाकर केदारी (वय50) हे दुपारी 1 वाजता दुचाकीवरुन भवानी पेठ पुणे येथे आईला भेटण्यास निघाले होते. मरीआई पोलिस चौकी समोरील मार्गाने जात असताना निगडीवरुन मनपाकडे निघालेली (एम.एच-12 के.क्यु. 1741) या पीएमपीएल बसच्या उजव्या बाजुस असलेले सीएनजी बॉंक्सचे झाकन उघडे असलेले केदारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ येथिल संजय हुंडई शोरुम जवळ बस थांबवुन वाहनचालकास सीएनजी बॉंक्सचे झाकन उघडे असल्याचे सांगितले. वाहनचालकाने बस डेपोत घेऊन जाऊ व झाकन व्यवस्थितरित्या लावुन घेऊ अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. मात्र केदारी यांनी सदर प्रकरणाचे गांभिर्य वाहनचालकाच्या निदर्शनास आणुन देत महिनाभरा पूर्वीच शिवनेरी एस.टी.बस अपघाताची घटना लक्षात आणुन दिली. त्यानंतर वाहनचालकाने अखेर सीएनजी बॉंक्सचे उघडलेले झाकन तारेने तात्पुरते बंद केले व डेपोत बस नेऊन झाकन व्यवस्थितरित्या बंद केले जाईल असे केदारी यांना सांगितले. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.
व्हीएस न्यूज - चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27,27 फेब्रुवारी रोजी संयुक्त समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिसवांदाचे आयोजन केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन चऱ्होली येथील डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात सकाळी 11 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे संस्थापक डॉ अजिंक्य डी वाय पाटील व आय. आय. एम. तिरुचिरापल्ली चे संचालक डॉ भीमराया मेत्री यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ जॉन अंतोनी झेवियर मॉरिशस देशाच्या डॉ अनिता रामागत्ती वौंग , कॅनडा देशाचे डॉ कृष्णलाल, मौरीशस देशाचे डॉ महेंद्रनाथ मोटा, कोलंबो श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा हे मार्गदर्शन करणार आहेत. या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत श्रीलंकेच्या आरोषा जेनिफर मेरी, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, जपान देशाचे तोमियो एसोगयी, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रामधील भारतातून व इतर देशातून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी आवाहन केले आहे.
व्हीएस न्यूज - मराठी असोसिएशन पर्थ तर्फे ऑस्ट्रेलियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा सोहळा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी अनेक भारतीय नागरिक, तसेच स्थानिक विदेशी नागरिकांनी देखील आवर्जून उपस्थिती लावून छत्रपती शिवरायांप्रती आदर व्यक्त केला. यावेळी शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन, बालशिवाजींचा पाळणा, शिवाजीमहाराजांचे आचार व विचार, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, जिजाऊंचे संस्कार यांसारख्या विषयावर छान माहीती, मराठी अस्मितेवरील समुहगान, लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषा, शिवकालीन ऐतिहासिक प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवराय व जिजाऊंच्या वेशातले बालचमू शोभून दिसते होते. असोसिएशनच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर अयोजित करीत परदेशात मराठी अस्मितेचा आदर्श निर्माण केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सदर उपक्रम चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरत आहे. यावेळी असोसिएशनचे कमिटी मेंबर व इतर सभासद उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढल्याने आज सकाळपासूनच पुण्याकडे जाणार्या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वेग मंदावला होता. त्यातच अनेक मोठी अवजड वाहने वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्टया असल्याने अनेक पर्यटक फिरायला जाण्याचा बेत आखत सकाळच्या सत्रात घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता, अतिक्रमणासह विविध विकास कामांचा आढावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज घेतला.
आयुक्त कक्षात झालेल्या या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता राजन पाटील,रवींद्र दुधेकर, अय्युबखान पठाण, प्रवीण तुपे, यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
शहरातील स्वच्छतेसाठीची यंत्रणा सक्षम करावी. शहरातील उड्डाणपूल व मुख्य रस्त्यांच्या प्रारंभी कचरा टाकण्यात येतो. तो नियमितपणे उचलून स्वच्छता राखण्यात यावी अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणा-या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व अतिक्रमण विषयक कामकाज सक्षमतेणे करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील हे काम अनधिकृत बांधकाम नियंत्रण व बांधकाम परवानगी विभागाकडे देण्यात यावे अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रत्येक एका किलोमिटर अंतरावर नागरिकांसाठी ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून अथवा महापालिकेकडून ही कार्यवाही करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या. यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरातील इतर दवाखान्यातील ओ.पी.डी. सेवा सक्षम करावी यासाठी नियोजन करावे.
शहरातील सर्व चौकातील लेफ्ट टर्न फ्री केल्यास वाहतूक सुरळीत होईल. त्यासाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यावर योग्य ती कार्यवाही शहर अभियंता व सह शहर अभियंता यांनी करावी अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या. शहरातील रस्त्यावरील बेवारस वाहने पडलेली आहेत. त्यावर कार्यवाही करण्यात यावी असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. त्यावर येत्या 10 दिवसात सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी अशा वाहनांचे सर्व्हेक्षण करून अहवाल द्यावा अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या त्यानंतर पोलीस आयुक्त यांना कळविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शहरातील व्यायामशाळा, स्विमिंग पूल इत्यादी मधून खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्यात यावेत व त्याची देखभाल योग्य प्रकारे करण्यासाठी नियोजन करावे. शहरातील मनपाच्या शाळा व इमारतीसाठी स्वतंत्र रंग संगती निश्चित करून इमारतींना रंग द्यावेत. नव्याने बांधण्यात येणा-या इमारतींना अथवा मनपा इमारतीची कामे सुरु असणाऱ्या ठिकाणी त्याचा अवलंब करावा. व त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीस एक वर्ष पूर्ण झाले गेल्या एक वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरवाशियांनी सत्ता परिवर्तन केले, राष्ट्रवादीच्या मनमानी कारभाराला कंटाळून पूर्व श्रमीचे राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक भाजपमध्ये दाखल होऊन त्यांनी आपल्याच नेत्याला आव्हान देऊन सत्ता काबीज केली. भय भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड करणार असल्याच्या घोषणा केल्या, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’चा नारा दिला. पण गेल्या एक वर्षाच्या काळात सत्ता मिळालेल्या भाजपा कडून पिंपरी चिंचवडकरांची घोर निराशा झाल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासनाची खैरात केली राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पोवाडे गायले गेले, मूर्ती खरेदी भ्रष्टाचारापासून अनेक भ्रष्टाचाराचे दाखले दिले. परंतू गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचाराचा आरोप भाजपाला सिद्ध करू शकली नाही. महापालिका निवडणूकीत आश्वासनाची खैरात घालण्यात आली. अनाधिकृत बांधकामे नियमित करणार, शास्ती कर रद्द करणार, रखडलेले पुर्नवसन प्रकल्प सूरू करणार, बंद पवना जलवाहीनी बाबत निर्णय घेणार, पाणी – कचरा ह्या मुलभूत समस्या सोडवण्याबरोबरच भय, भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड शहर करणार, परंतू या सर्व आश्वासनाचा विसर सत्ताधार्यांना पडला असल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
दुसऱ्यावंर आरोप करून टीका करणे सोपे असते परंतू अनेक राष्ट्रवादी – काँग्रेस मध्ये भ्रष्टाचाराची फळे चाखणारे सत्ता मिळताच त्यांच्या मूळ भुमीकेत आले आहे. गेल्या एक वर्षापूर्वी शहरवासियांना दिलेल्या आश्वासनाचा पूर्ण विसर पडला आहे. अनाधिकृत बांधकामाबाबात राज्य शासनाने निर्णय घेऊनही त्याचा शहरवाशियांना कोणताही फायदा झाला नाही. शास्तीकर माफी बाबत सर्व मौन पाळुन आहे. विकासाच्या नावावर रिंगरोड बाधित नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखला गेला. परंतु त्या भागातील नागरीकांनी त्याला प्रचंड विरोध करीत आजपर्यंत तो टाळून लावला आहे. बीआरटी मार्गावर कोट्यावधी रूपये खर्च करूनही बीआरटी चालु होऊ शकली नाही. विठ्ठलनगर, ओटास्कीम लिंकरोड या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसन प्रकल्पाला ज्यांनी विरोध केला त्या प्रकल्पाचे एक वर्षात काय झाले हे ही ह्यांना सांगणे कठीण झाले असल्याचे बारणे म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरात दिवसोंदिवस कचरा, पाणी ह्या समस्य़ा वाढत आहेत. नागरीकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना फुरसत नाही. नागरीकांना चौपट पाणीदर वाढीचा भुर्दंड मात्र सोसावा लागणार आहे. भयभ्रष्टाचार मुक्तीच्या घोषणेचा पूर्ण विसर सत्ताधारी भाजपाला पडला आहे. शहरात रोज अनेक टोळकी सर्वसामान्य नागरीकांची वाहने तोडफोड करीत आहे. संपूर्ण शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन अनेक गुन्हेगार राजरोस पणे हप्ते वसुली करीत आहेत. गुन्हेगारंना एक प्रकारे राजआश्रयच मिळाला आसल्याचे नागरीक खाजगीत बोलु लागले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. अनेक निविदा संगनमत करून भरल्या जाऊ लागल्या आहेत. प्रशासन व सत्ता पक्ष दोन्ही ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालू लागल्याने सर्व काही अलबेल असल्याचा दिखावा करू लागले असल्याने पिंपरी चिंचवडकरांनी सत्ता परिवर्तन करूनही आपली घोर निराशा झाल्याने यांच्या पेक्षा पहिले बरे असे बोलू लागले असल्याने भाजपाच्या एक वर्षाची पूर्ती म्हणजे हाती सत्ता देऊन शहरवासियांच्या पदरी घोर निराशा आली असल्याचे खासदार बारणे यांनी म्हंटले आहे.
व्हीएस न्यूज - दुचाकीवरुन तोंड बांधून आलेल्या दोघांनी समोरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीची सोनसाखळी भरदिवसा हिसकावून नेली. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीगावात घडली. मच्छिंद्र काटे (वय 28, रा. पिंपळे सौदागार) असे सोनसाखळी चोरीला गेलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिंपरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आंतरकर यांनी माहिती दिली. मच्छिंद्र हा शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीगावातून दुचाकीवरुन पिंपळे सौदागरकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून प्लसर या दुचाकीवरुन तोंड बांधून आलेल्या दोघांनी त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची 90 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - मराठी भाषा गौरव दिन व जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांंना शिक्षणाबरोबरच अर्थाजनासाठी विविध उपक्रमाविषयी माहिती देत मोडी लिपी मधून करिअर करता येते हे ही सांगितले. आज लाखो मोडी लिपीतील कागदपत्रे अभ्यासकांची वाट पहात आहेत. या अशा अभ्यासक्रमातून पुढे अभ्यासक निर्माण व्हावेत असा आमचा प्रयत्न असल्याच्या त्या म्हणाल्या. श्यामला पानसे गेली आठ वर्षे येथे मोडी षिकवित आहेत त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या श्यामला पानसे म्हणाल्या की, 1935 मध्ये मोडी लिपी बंद झाली. पण अनेक जुने कागदपत्रे, वारसाहक्काची, जमिनीची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्याचे देवनागरीत रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप संधी आहे. इतिहासाचे कागद बोलत असतात आणि मोडी हा त्याचा मार्ग असल्याचे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट यांनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संगिता लांडगे यांनी तर आभार प्रा. दुर्गा भिसे यांनी मानले. डॉ. धनंजय वाघमारे, डॉ. संगिता लांडगे यांचे सहकार्य लाभले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002