व्हीएस न्यूज - पीएमपीएमएल बस चालकाला बस चालवत असताना अचानक भोवळ आली. बस बाजूला घेत असताना नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड येथे केंद्रीय विद्यालयासमोर घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी - किवळे (एमएच 12, सीएच 3946) ही बस निगडीवरून देहूरोडच्या दिशेने जात होती. देहूरोड जवळील केंद्रीय विद्यालयासमोर आल्यानंतर बस चालकाला अचानक भोवळ आली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटून बसचे एक चाक रस्त्याखाली खड्ड्यात उतरले. यामुळे बस पलटी झाली. बसमध्ये प्रवासी होते. त्यातील 7-8 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर, चालक गंभीर जखमी झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.