व्हीएस न्यूज - आलिशान बसमधून इंदौरकडून पुण्याकडे आणण्यात येणारा 25 लाखांचा गुटखा गुरूवारी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात आली. विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा 25 लाख रुपयांचा गुटखा, 80 लाख रुपये किंमतीच्या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुटखा माफिया श्रीकांत चांदेकर आणि राजेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. (यूपी 75, एटी 4677) आणि (यूपी 75, एटी 4678) या क्रमांकाच्या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेला सर्व माल निगडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. ही कारवाई एफएसओ अधिकारी संतोष जाधव, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त नरगुडे, संजय दळवी यांच्या टीमने केली.
व्हीएस न्यूज - वाढदिवसाला तलवारीने केक कापणे बर्थडे बॉयसह त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. बर्थडे बॉय सुरज खंडू काटेसह दहा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुरज खंडू काटे (वय-28, रा. पिंपळे सौदागर) या तरुणाचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्थडे साजरा करताना सुरजने तलवारीने केक कापला. वाढदिवसाचे फोटो सुरजने फेसबुकवर टाकले. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानुसार आरोपींनी शस्त्रबंदीचा आदेश न पाळता त्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या वाढदिवसाला भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह त्याचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या पिंपळे सौदागर परिसरात लिनियर गार्डन वेगाने विकसित केले जात आहे. या लिनियर गार्डनमध्ये ‘लॅबिरींथ प्लाझा’ उभारणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिलेच ‘लॅबिरींथ प्लाझा’ पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर मध्ये होणार असल्याची माहिती नगरसेवक नाना काटे यांनी दिली.
नगरसेवक नाना काटे म्हणाले की, आकर्षक आणि अत्याधुनिक सुविधायुक्त लॅबिरींथ प्लाझाची उभारणी या परिसरात होत आहे. लॅबिरींथ प्लाझाचा आकार वर्तुळाकार असणार असुन साधारण ३०० स्के.फुट जागेमध्ये असणार आहे. त्यामध्ये एक बिंदु असुन त्याची रचना चांगल्या प्रकारे केली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी लॅबिरींथ प्लाझा उपयोगी ठरणार आहे. लॅबिरींथ प्लाझा मुळे तणावमुक्ती,मन प्रसन्न होणे, रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होणे, हृदय निरोगी राहते, रक्तदाब कमी राहतो असे विविध फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
अमेरीका, सिडनी, कॅनडा, सिंगापुर या ठिकाणी लॅबिरींथ प्लाझा असुन आता भारतामध्ये प्रथमच पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे होणार आहे असेही नगरसेवक नाना काटे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, महाराष्ट्राची पहिली जॉइंट कमिशन इंटरनँशनल (जेसीआय), अमेरिका आणि एनएबीएचएक्रीडीटेड हॉस्पिटल यांनी १९ आणि २० फेब्रुवारी रोजी २ यशस्वी अवयवांचे प्रत्यारोपण केले आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे आणि ग्लोबल हॉस्पिटल येथील डॉक्टर्सच्या संयुक्त टीमने पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडली.
आजारी असलेले दाते या दोघीही अनुक्रमे वय ४२ आणि ४६ वर्ष या पुण्यातील गृहिणी होत्या ज्यांना मोठ्या प्रमाणावर मेंदूत रक्तस्त्राव होऊन मेंदूतील स्टेम पेशींचे कार्य थांबून मृत्यू आला. दीर्घ समुपदेशन केल्यानंतर दोन्हीही कुटुंब परिस्थितीला समजू शकली आणि त्यांनी अवयव दानाची इच्छा व्यक्त केली. या उदात्त हेतूमुळे यकृताचा गंभीर आजर आणि किडनीचा शेवटच्या स्तरावरील आजार असलेल्या गरजू रुग्णांसाठी दोन यकृत आणि चार किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी उपलब्ध अन्यथा त्यांचा आजार बळावला असता.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये ज्यांना यकृत लाभले त्या ५४ वर्षाच्या सांगलीच्या गृहिणी होत्या तर दुसरे ६० वर्षाचे मुंबईतील पुरुष होते. दुसरीकडे किडनीचा लाभ २० वर्षाच्या विद्यार्थिनी असलेल्या मुलीला आणि ३७ वर्षाच्या आयटी व्यावसायिकाला झाला. एक किडनी नाशिकच्या हॉस्पिटलला तर दुसरी पुण्यातल्या हॉस्पिटलला देण्यात आली. हे सर्व वाटप विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) सल्ल्याने करण्यात आले.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे म्हणाल्या की “मेंदू मृत झालेल्या रुग्णांकडून दान केलेले अवयव प्राप्त करणे हे लोकांमध्ये झालेल्या व्यापक जनजागृती आणि आदित्य बिर्ला क्रिटीकल केअर टीमच्या सदस्यांनी प्रभावित कुटुंबाच्या केलेल्या सखोल समुपदेशन यामुळे शक्य झाले. “जानेवारी २०१६ पासून हॉस्पिटलमध्ये संभावित दात्यांच्या कुटुंबियांचे योग्य समुपदेशन झाल्याने पाच मृत व्यक्तींचे अवयव दान बघायला मिळाले आहे.परिणामस्वरूप सहा यकृत, आठ किडनी आणि एक हृदय प्राप्त होऊ शकेल. अलीकडे बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला यकृत प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळाली आहे आणि हॉस्पिटल दान केलेले अवयव प्राप्त करणे आणि प्रत्यारोपण या दोन्ही गोष्टी अविरतपणे करत राहील.”. आदित्य बिर्ला हॉस्पिटलला अवयव प्राप्त करणे आणि किडनी प्रत्यारोपण यसाठी २००७ पासून मान्यता आहे आणि अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमात ते अग्रभागी आहे.
व्हीएस न्यूज - आपल्या न्याय मागण्यासाठी नाशिक ते मुंबईतील विधानभवनावर २०० किलो मीटर लांबचा पल्ला पायीवारी करून मोर्चा काढणा-या शेतक-यांना भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवाद्याची उपमा दिली आहे. शेतक-यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे विधान अत्यंत निषेधार्ह असून महाजन यांनी शेतक-यांचा अवमान केले आहे. त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वर्षा जगताप यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने नाशिक ते मुंबईतील विधानभवनावर २०० किलो मीटर लांबचा पल्ला पायीवरी करून मोर्चा काढला. या मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक उन्हाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असताना या मोर्चेक-यांना सत्ताधारी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवादीची उपमा दिली आहे.
शेतक-यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी माओवाद शेतकरी आंदोलनातून डोकावत असल्याचे, संतापजनक विधान त्यांनी केले आहे. महाजन यांनी राज्यातील बळीराजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी. त्यांच्या वक्तव्याच्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत आहे. राज्य सरकार हे शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देणे, शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून शेतक-यांची चेष्टा करत आहे. भाजप सरकारला गर्दी व आंदोलन केल्यानंतरच नेहमी जाग येणार का?सरकार म्हणून काय नैतिक जबाबदारी आहे की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
व्हीएस न्यूज - चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्यवाहपदी अॅड. सतीश नानासाहेब गोरडे तर सहकार्यवाहपदी रवींद्र धोंडिबा नामदे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.
चापेकर स्मारक समितीच्या जुन्या कार्यकारिणीची नुकतीच मुदत संपली होती. त्यामुळे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी चापेकर वाड्यात कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत गिरीश प्रभुणे यांची एकमताने पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष शकुंतला विनोद बंसल, कोषाध्यक्ष संजय मनोहर कुलकर्णी, सदस्य मधुसुदन दत्तात्रय जाधव, अशोक माधव पारखी, गतिराम रघुनाथ भोईर, नितीन गजानन बारणे, लक्ष्मण बापू पवार, शरद सोपान जाधव, आसाराम एकनाथ कसबे, सुनीता श्रीकांत शिंदे, निता सुरेश मोहिते, विश्वस्त मुकुंद वासुदेव कुलकर्णी, विलास सुदाम लांडगे, व्यवस्थापक सिध्देश्वर धनराज इंगळे यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणीचा कार्यकाल पाच वर्षांचा असणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून रविकांत कळबंकर यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ”क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या दुस-या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्मारकाचे काम केले जाणार आहे. या कामास प्रत्यक्षात लवकरच सुरुवात केली जाणार असून सहा मजली इमारत असणार आहे. स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीचे केले जाणार आहे. क्रांतिकारांचे दगडी कोरीव कामामध्ये शिल्प तयार केले जाणार आहे. क्रांतिकारांचे वेगवेगळ्या रुपातील २५ शिल्प साकारले जाणार आहेत. चापेकरांच्या आठवनींना उजाळा दिला जाणार आहे. देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने स्मारकाचे काम केले जाणार आहे. देशातील नागरिकांना प्रेरणा मिळेल, अभिमान वाटेल असा स्वरुपाचे स्मारक असणार आहे”.
व्हीएस न्यूज -नवी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून जोमाने काम सुरु होते. आपल्यावर असलेली जबाबदारी समर्थपणे पेलत होतीच. पण अनपेक्षितपणे एक मोठी जबाबदारी मी स्वीकारली. ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांच्या ‘बबन’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली. एक आव्हान म्हणून मी ती स्वीकारलीही. अभिनय ही माझी पॅशन आहे. मी 1981 पासून बँक क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला मी आकाशवाणी, मग दूरदर्शनवर छोटी-मोठी कामे केली आहेत. मात्र, चित्रपटात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. मी बँकिंग क्षेत्रातील करिअरमधून रिटायर होण्याच्या उंबरठ्यावर असताना भाऊरावांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांची आणि ‘बबन’ चित्रपटाच्या टीम’ची मी कायम ऋणी असणार आहे. कारण त्यांच्यातील सकारात्मक प्रोत्सहनामुळेच मला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, असे बँक शाखा व्यवस्थापक सीमा समर्थ यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, आजपर्यंत मुंबईत बँकेत काम करीत होते. पण चित्रपटसृष्टीशी कधी संबंध आला नव्हता. अचानक माझी पुण्यात नवी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून बदली झाली. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कर्हाडे यांना भेटण्याची इच्छा होती. बँकेचे एक खातेदार म्हणून मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. पण दुसर्या दिवशी ते स्वत: मला भेटायला आले. वारंवार बोलणे होत राहिले. एके दिवशी त्यांनी स्वत:च विचारले, की ‘मी एक मराठी सिनेमा करतोय, तुम्हाला काम करायला आवडेल का ? तर ऑडिशनला या.’ मी क्षणभर गोंधळून गेले. नंतर ऑडिशनला गेले. सिलेक्शनही झाले. भाऊरावांनी मला माझी चित्रपटातील भूमिका काय ते सांगितले. आणि तिथूनच बबन’ चित्रपटातील भूमिकेबाबत काम सुरु झाले.
‘बबन’ चित्रपटात खेडे गावातील एका ‘आजी’ची भूमिका करायची असल्याने तिथली मराठी भाषा आत्मसात करणे खूप कठीण काम होते. मात्र, भाऊरावांनी माझी भाषा सुधारण्यासाठी खूप कष्ट घेतले. वेगवेगळी पुस्तके वाचायला सांगितली. ग्रामीण भाषा, वावरण्यातला ग्रामीण ढंग येण्यासाठी शिरुरमध्ये एका कुटुंबाच्या घरी महिनाभर राहावे लागले. तिथल्या बायकांचे उठणे, बसणे, वागणे, साडी नेसणे, डोक्यावरचा पदर सांभाळण्याचे पद्धत, जेवण्याची पद्धत, सहज येणार्या शिव्या शिकण्याबरोबरच शेतात जाऊन कांद्याची पात कापणे, खुरपणी, जनावरांच्या गोठ्यातील कष्टाची कामे करावी लागली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत चित्रपटात आजीची भूमिका सर्वोत्तम वठवायचीच, असा ठाम निर्धार केला होता. तत्पूर्वी भाऊरावांचा ख्वाडा चित्रपट मला खूप भावला होता.
दिग्दर्शक भाऊरावांची काम करून घेण्याची पद्धतच वेगळी आहे. सेटवरच सीनविषयी माहिती ते देत. त्यांचे म्हणणे असे की सीनची माहिती अगोदर सांगितली, की कलाकार त्यांच्या भूमिकेची एक प्रतिमा मनात तयार करतात. आणि तसेच सेटवर प्रेझेंट होतात. मला काय हवे आहे, ते मला कलाकाराचे डोके रिकामे असताना भरणे सोपे जाते. भाऊराव भूमिका समजावून सांगताना आवर्जून सांगत, की तुला आहे तशीच भूमिका करायची आहे. फक्त भाषेचा लहेजा आत्मसात कर.
मला असे वाटते की बबन हा सिनेमा भाऊराव कर्हाडे या तरुण लेखक आणि दिग्दर्शकाने त्याच्या स्वत:च्या अनुभवाच्या मक्तेदारी बरोबरच तरुणांना जगण्याची एक वेगळी दिशा दाखविणारा, वास्तविक, सांगीतिक, यशासाठी धडपडणार्या, मनापासून प्रेम करणार्या, आयुष्यातले चढ-उतार अनुभवणार्या तरुणाची रंजक कथा आहे. सेटवर सगळे मला म्हातारीच म्हणत असत. ते अजूनही तसेच बोलतात. माझ्या आयुष्यात आलेला हा सरळ, साध्या दिग्दर्शकाबरोबरचा प्रवास खूपच आनंददायी होता. पुढील आठवड्यात प्रदर्शित होत असलेला ‘बबन’ हा चित्रपट सर्वांनी सिनेमागृहात जाऊन आवर्जून पाहावा, असे आवाहन मी करते.
व्हीएस न्यूज - आपल्या प्रियसीला फिरायला घेऊन गेल्याचा राग मनात धरून एका महाविद्यालयीन युवकाला जीवे मारून त्याचा मृतदेह पाण्यात टाकून दिल्याची घटना लोणावळा शहरातील तुंगार्ली धरणावर घडली. मृत झालेल्या युवकाचे नाव किसन शिवा परदेशी (वय २०, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव, ता.मावळ) असे असून मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या पूर्वी सदर घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी मृत युवकाचा चुलता भरत मिठाईलाल परदेशी (वय ५३, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव, ता.मावळ) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास किसन परदेशी हा एका मुलीला घेऊन तुंगार्ली धरणावर फिरायला गेला होता. ही माहिती समजल्यावर या प्रकरणातील आरोपी प्रशांत विठ्ठल धरफळे (रा.डोंगरगाव वाडी, ता.मावळ) हा मनात राग धरून घटनास्थळी पोचला. त्याने त्याठिकाणी किसन परदेशी याला हाताने आणि दगडाने मारहाण करीत त्याचा खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकला. किसन याचा मृतदेह बुधवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या बचाव पथकाने पाण्यातून बाहेर काढला.
लोणावळा शहर पोलिसांनी याप्रकरणी भादवी कलम ३०२, २०१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रशांत धरफळे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. एन.बी.रानगट हे करीत आहे
व्हीएस न्यूज - एका महाविद्यालयीन तरुणाला दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने धमकी देत लुटले. हा प्रकार रावेत येथे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. कुणाल लक्ष्मण मलवाडे (वय 19, रा. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, बॉईज हॉस्टेल, रावेत, मूळ रा. लातूर) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्चमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कुणाल जेवण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर शतपावली करीत होता. दुचाकीवरून (एम एच 14, डीपी 7459) या क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने कुणालला धमकी देत तुझ्याकडे असलेला मोबाईल व पैशांचे पाकीट देण्याची मागणी केली. कुणालने याला विरोध करताच तिघांनी त्याला हाताने मारहाण करत मोबाईल व पैशांचे पाकीट असा आठ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने नेला. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - घरासमोर लावलेली दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना जुनी सांगवीत दि.10 मार्च रोजी मध्यरात्री घडली. वैशाली रामकिशोर सिंग (वय 30, रा. बडगुजर बिल्डिंग, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जुनी सांगवी येथील बडगुजर कॉलनी येथे राहतात. दि. 10 मार्च रोजी रात्री घरासमोर लावलेली बजाज पल्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - डीजे वर मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवत असताना आवाज कमी करण्यास सांगितल्याने तरुणाने एकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडला. याबाबत इंद्रजित कौर बग्गा (वय-48, रा. नवले रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बग्गा व आरोपी जाधव नवले रेसिडेन्सी पिंपळे सौदागर येथे शेजारी-शेजारी राहतात. जाधव याच्या घरात लाईट दुरुस्तीचे काम सुरु आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जाधव याने मोठ्या आवाजात डीजे वर अश्लील गाणी लावली. डीजेचा आवाज कमी कर, असे सांगण्यासाठी बग्गा यांचा मुलगा जसमित व त्याची आई गेले असता आरोपी जाधवने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि नगररचना उपसंचालक यांनी अवघ्या दहा महिन्यात पाच हजार 300 कोटी रुपयांचे टीडीआर वाटप केले आहे. त्यातच नगररचना उपसंचालकाची बदली होऊन एक महिना उलटला तरी त्यांनी पदभार सोडला नाही. आयुक्तांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे संशय वाढला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील दहा महिन्यात तब्बल 41 लाख27 हजार चौरस फुटांचे हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) वाटप केले आहे. त्याची किंमत 5 हजार 300 कोटी असून यामध्ये आयुक्त व भाजपचे आमदार, पदाधिकारी,नगरसेवक यांचा सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन आपण पत्राद्वारे दिले आहे.
महापालिकेचे नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारी 2018 रोजी तडकाफडकी मुंबईतील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन (एसआरए) विभागाच्या उपसंचालकपदी बदली केली. बदलीचा आदेश 14 फेब्रुवारीला पारित करण्यात आला. बदली होऊन एक महिना होत आला. तरी देखील ठाकूर यांनी पदभार सोडला नाही. त्यांचा फाईल क्लिअर करण्याचा सपाटा सुरुच आहे. तसेच, आयुक्त हर्डीकर यांनी देखील त्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे संशय वाढला आहे. ठाकूर यांनी 14 फेब्रुवारी ते 13 मार्च2018 दरम्यानच्या काळात घेतलेल्या सर्व निर्णयांची, मंजूर केलेल्या फाईल्सची सखोल चौकशी करावी. तसेच, राज्य शासनाच्या आदेशाचे उलंघन केल्या प्रकरणी आयुक्त हर्डीकर व नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002