व्हीएस न्यूज -नवी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून जोमाने काम सुरु होते. आपल्यावर असलेली जबाबदारी समर्थपणे पेलत होतीच. पण अनपेक्षितपणे एक मोठी जबाबदारी मी स्वीकारली. ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांच्या ‘बबन’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली. एक आव्हान म्हणून मी ती स्वीकारलीही. अभिनय ही माझी पॅशन आहे. मी 1981 पासून बँक क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला मी आकाशवाणी, मग दूरदर्शनवर छोटी-मोठी कामे केली आहेत. मात्र, चित्रपटात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. मी बँकिंग क्षेत्रातील करिअरमधून रिटायर होण्याच्या उंबरठ्यावर असताना भाऊरावांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांची आणि ‘बबन’ चित्रपटाच्या टीम’ची मी कायम ऋणी असणार आहे. कारण त्यांच्यातील सकारात्मक प्रोत्सहनामुळेच मला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली, असे बँक शाखा व्यवस्थापक सीमा समर्थ यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, आजपर्यंत मुंबईत बँकेत काम करीत होते. पण चित्रपटसृष्टीशी कधी संबंध आला नव्हता. अचानक माझी पुण्यात नवी सांगवीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून बदली झाली. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कर्हाडे यांना भेटण्याची इच्छा होती. बँकेचे एक खातेदार म्हणून मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. पण दुसर्या दिवशी ते स्वत: मला भेटायला आले. वारंवार बोलणे होत राहिले. एके दिवशी त्यांनी स्वत:च विचारले, की ‘मी एक मराठी सिनेमा करतोय, तुम्हाला काम करायला आवडेल का ? तर ऑडिशनला या.’ मी क्षणभर गोंधळून गेले. नंतर ऑडिशनला गेले. सिलेक्शनही झाले. भाऊरावांनी मला माझी चित्रपटातील भूमिका काय ते सांगितले. आणि तिथूनच बबन’ चित्रपटातील भूमिकेबाबत काम सुरु झाले.
‘बबन’ चित्रपटात खेडे गावातील एका ‘आजी’ची भूमिका करायची असल्याने तिथली मराठी भाषा आत्मसात करणे खूप कठीण काम होते. मात्र, भाऊरावांनी माझी भाषा सुधारण्यासाठी खूप कष्ट घेतले. वेगवेगळी पुस्तके वाचायला सांगितली. ग्रामीण भाषा, वावरण्यातला ग्रामीण ढंग येण्यासाठी शिरुरमध्ये एका कुटुंबाच्या घरी महिनाभर राहावे लागले. तिथल्या बायकांचे उठणे, बसणे, वागणे, साडी नेसणे, डोक्यावरचा पदर सांभाळण्याचे पद्धत, जेवण्याची पद्धत, सहज येणार्या शिव्या शिकण्याबरोबरच शेतात जाऊन कांद्याची पात कापणे, खुरपणी, जनावरांच्या गोठ्यातील कष्टाची कामे करावी लागली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत चित्रपटात आजीची भूमिका सर्वोत्तम वठवायचीच, असा ठाम निर्धार केला होता. तत्पूर्वी भाऊरावांचा ख्वाडा चित्रपट मला खूप भावला होता.
दिग्दर्शक भाऊरावांची काम करून घेण्याची पद्धतच वेगळी आहे. सेटवरच सीनविषयी माहिती ते देत. त्यांचे म्हणणे असे की सीनची माहिती अगोदर सांगितली, की कलाकार त्यांच्या भूमिकेची एक प्रतिमा मनात तयार करतात. आणि तसेच सेटवर प्रेझेंट होतात. मला काय हवे आहे, ते मला कलाकाराचे डोके रिकामे असताना भरणे सोपे जाते. भाऊराव भूमिका समजावून सांगताना आवर्जून सांगत, की तुला आहे तशीच भूमिका करायची आहे. फक्त भाषेचा लहेजा आत्मसात कर.
मला असे वाटते की बबन हा सिनेमा भाऊराव कर्हाडे या तरुण लेखक आणि दिग्दर्शकाने त्याच्या स्वत:च्या अनुभवाच्या मक्तेदारी बरोबरच तरुणांना जगण्याची एक वेगळी दिशा दाखविणारा, वास्तविक, सांगीतिक, यशासाठी धडपडणार्या, मनापासून प्रेम करणार्या, आयुष्यातले चढ-उतार अनुभवणार्या तरुणाची रंजक कथा आहे. सेटवर सगळे मला म्हातारीच म्हणत असत. ते अजूनही तसेच बोलतात. माझ्या आयुष्यात आलेला हा सरळ, साध्या दिग्दर्शकाबरोबरचा प्रवास खूपच आनंददायी होता. पुढील आठवड्यात प्रदर्शित होत असलेला ‘बबन’ हा चित्रपट सर्वांनी सिनेमागृहात जाऊन आवर्जून पाहावा, असे आवाहन मी करते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002