व्हीएस न्यूज - भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा गंभीर जखमी होऊऩ मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.
गणेश शंकर सगर (वय-23, रा. मानाजी बाग, भोईर वस्ती, खडकी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचे नातेवाईक रामेश्वर मर्ढेकर (वय-27) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास गणेश दुचाकीवरून जात होता. निगडीतील अंकुश चौकात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गणेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. फौजदार वाघमारे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - फॅब्रिकेशन व्यावसायिकाची हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता सांगवीतील समर्थनगर येथे उघडकीस आला. अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. कैलास रामजी तौर (वय-35, रा. समर्थनगर, नवी सांगवी, मुळ बीड) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तौर यांचा पिंपळे-निलख येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.
याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी कैलास तौर कुटूंबासह बीडला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर रविवारी ते एकटेच सांगवीला आले होते. सकाळी ते कामावर न आल्याने त्यांचा नोकर घऱी आला. घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. नोकराने दरवाजा उघडून पाहिले. कैलास तौर बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारपुर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, तौर यांच्या घरी आलेल्या कामगाराला पोलीसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात कामगाराच्या पत्नीचे व कैलास तौरचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. यातून कामगाराने तौर यांचा खून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा (पीसीएनटीडीए) च्या निवासी भूखंड सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 38 भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील 23भूखंडांच्या लिलाव प्रक्रियेत 719 इच्छुकांनी भाग घेतला आहे. त्यांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी सुरू झाली असून कोणी कोणत्या भूखंडासाठी किती रक्कम भरली याची माहिती मंगळवारी (दि. 21)जाहीर होणार आहे.
पीसीएनटीडीएने 2011 नंतर शिल्लक निवासी भूखंडाचा लिलाव यंदा आयोजित केला आहे. काही भूखंड मागास घटकांसाठी राखीव आहेत. पीसीएनटीडीएकडे सध्या दोनशे हेक्टर जागा विकासासाठी उपलब्ध आहे. त्यातीलच काही अविकसित निवासी भूखंड लिलावाद्वारे 99 वर्षांच्या भाडेकराराने देण्यात येणार आहे. या भूखंडांसाठी साडेबारा टक्क्यातील पात्र शेतकरी आग्रही होते. परंतु, तांत्रिक कारणांमुळे ते देता येणार नसल्याचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्यात पेठ 1, 2, 4, 18, 19, 25 आणि 27 अ मधील 23 आणि पेठ 18 मधील 14 भूखंडांचा लिलाव होणार आहे. भूखंड क्रमांक 686 साठी सर्वाधिक 72 इच्छुकांनी आणि प्रभाग एक मधील 368क्रमांकाच्या भूखंडाला अवघ्या दोन जणांनी लिलाव अर्ज (बीड फॉर्म) भरले आहेत. पहिल्या टप्प्याचा लिलाव 21 मार्चला जाहीर होईल. त्यानंतर पुढच्या टप्प्याचा लिलाव जाहीर केला जाणार आहे. रडीरेकनरनुसार लिलावातील सर्व 38 भूखंडांची मूळ किंमत सुमारे 22 कोटी आहे. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता लिलावात सहभागी झालेल्यांनी तिप्पट, चौपट दराने मागणी केली आहे. यातून चाळीस ते पन्नास कोटींच्या आसपास महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबियांसाठी राबविण्यात येणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करण्यात येणार आहे. आता अधिकारी,कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा खासगी विमा कंपनीमार्फत काढला जाणार आहे. त्यासाठी खासगी विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटूंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटूंबिय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना 1 सप्टेंबर2015 पासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कुटूंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 7400 कर्मचारी असून कर्मचारी आणि अवलंबितांची संख्या सुमारे 35 ते 40 हजार एवढी आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून एकूण 3 हजार 400 सेवानिवृत्तांपैकी 1हजार 175 सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांची संख्या 2 हजार 350 एवढी आहे. या योजनेवर महापालिकेचा सुमारे 30 कोटी रूपये खर्च होतो.
महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी 12 जून 2017 रोजी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुमारे 10 कंपन्यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विमा लागु करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांच्या सुचनेनुसार क्रिसील संस्थेकडे विनंती प्रस्ताव (रिक्वेस्ट टू प्रपोजल) तयार करण्यासाठी पाठविण्यात आला. क्रिसीलकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याला आयुक्तांनी 9 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. त्यानुसार, इच्छूक विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार थरमॅक्स लि. चिंचवड येथे थरमॅक्स कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक मतदानाद्वारे संपन्न झाली. या निवडणुकीकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल एकमताने निवडून आला.
यावेळी बोलताना केशवराव घोळवे म्हणाले की, सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं. हा विजय सत्याचा असत्यावर झालेला विजय आहे. हा विजय कारखान्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय आहे. ही कमिटी यापुढे कंपनी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामगारांच्या हिताचे संवर्धन करणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून थरमॅक्सचे प्रवीण खेसे तर निवडणूक कमिटी म्हणून प्रकाश जोध, शत्रुघ्न गोडगे, एम. एस. राखुंडे, बी. जे. सपकाळ यांनी काम पाहिले. केशवराव घोळवे यांनी कंपनी हित जोपासत कामगारांप्रती दिलेले योगदान, अहोरात्र कष्ट करून कामगारांच्या कल्याणासाठी झटत असताना कुटील कटकारस्थान करून अशा चांगल्या कामगार नेत्यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. कामगारांना मागील तीन वर्षे सतत दहशतीमध्ये ठेवण्यात आलेले होते. याचीच चीड कामगारांच्या मनात खदखदत होती. त्याचे परिणाम म्हणून कामगारांनी केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनल निवडून देत पुन्हा एकदा केशवरावांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, अशा भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी शिवशंभो फाउंडेशन शाहूनगर येथे फटाक्यांचा आतषबाजीमध्ये गुलाल उधळून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कामगारांनी सर्व उमेदवारांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले. श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, मारुती जगदाळे, संतोष कणसे यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
केशवराव घोळवे यांच्या पॅनल मधील विजयी उमेदवार व त्यांना मिळलेले मतदान –
महेंद्र पासलकर (224), मिलिंद बायस्कर (224), प्रदीप तरटे (223), संदीप ठाकूर (221), सुशील मिरगल (220), विश्वास पोळ (218), किशोर सोमवंशी (215), संजय देशमुख (215), एकनाथ उगले (215), राजेंद्र पाटील (214), भीमराव धस (208).
व्हीएस न्यूज - अण्णासाहेब मगर बँक व्यवस्थापन व सेवक यांच्यामध्ये वेतनकरार संपन्न झाला. या वेतनकरारामध्ये सेवकांना भरघोस वेतनवाढ झाल्याचे बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी जाहीर केले. त्यामुळे बँकेच्या सेवकांचा गुढी पाडवा गोड झाला आहे.
वेतनकरार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीसाठी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने हा वेतनकरार बँकेने एकूण पाच वर्षासाठी केला आहे. या वेतन करारामुळे सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वेतनकरारामध्ये सर्व सेवकांना समान न्याय देण्याचा बँकेने प्रयत्न केला आहे. करारानुसार सेवकांना पद व सेवा ज्येष्ठतेनुसार किमान चार हजार तर कमाल सोळा हजार रुपयांपर्यंतची वेतनवाढ मिळणार आहे. त्याचा लाभ ७७ सेवकांना होणार आहे. हा सर्वसमावेशक करार असल्याचे नंदु लांडे यांनी नमूद केले.
या करारावर व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष नंदकुमार लांडे, उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, संचालक अँड. घनशाम खलाटे, शंकर मेटकरी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. तसेच सेवकांचे प्रतिनिधी म्हणून संध्या द्विवेदी, तुषार मखामले, आदिनाथ देवकर, सरिता लुंकड, जयेश फुगे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संचालक मनोज बोरसे, गणेश पवळे, राजेश सस्ते, विजय गवारे, दीपक डोळस, लालचंद राठोड, सुलोचना भोवरे, सविता मोहरुत, सोनल लांडगे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रस्त्यावर गाडी पुढे मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एका गुन्हेगारावर टोळक्याने गोळीबार केला आहे. यामध्ये जखमीला दोन गोळ्या लागल्या असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयवंत चितळकर हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चितळकर हा त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्यावेळी एक कार तेथून जात होती. मात्र रस्त्यावर दुचाकी असल्याने कारला अडचण होत असल्याने कार चालकाने दुचाकी काढण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी झाली. कार चालक निघून गेला आणि त्याच्या इतर साथीदाराना घेऊन आला. त्यावेळी मारामारी झाली आणि एकाने चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याला दोन गोळ्या लागल्याची शक्यता आहे. त्याच्यावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.
व्हीएस न्यूज – गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विश्व श्रीराम सेना या सामाजिक संस्थेच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथील मनपाच्या उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये नोकरी महोत्सव पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या.
पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील अनेक मान्यवर कंपन्या, आयलेटल ग्लोबल सर्व्हिस, जेनियम कन्सस्टंट लि., यशस्वी ग्रुप, चिंचवड, ऍबसोर्स बायोलॉजिक, रिलायन्स एच आर सर्व्हिस, युवा शक्ती फाऊंडेशन, युरेका फोर्ब्स, फ्लॉश विंग मायक्रोनिक्स इंडिया, टीम प्लेस सर्व्हिस, ऐक्य ह्युमन कॅपिटल, एएसपी ऑल सर्व्हिस, ऍडिको इंडिया, अर्स मॅनेजमेंट यासारख्या कंपन्यांचे अधिकारी यावेळी उमेदवारांच्या मुलाखतींसाठी उपस्थित होते. पात्रतेच्या निकषांवर बेरोजगार तरूण तरूणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच तरुणांना नोकरी मिळल्याने गुढी पाडव्याचा दिवस सोन्याचा दिवस ठरला. विश्व श्रीराम सेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत तरूणांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याबद्यल समाधान व्यक्त केले. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना श्रीरामाची फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे प्रवक्ते प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, दिलीप गोसावी, तुकाराम बिराजदार व विश्व श्रीराम सेनचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. सतोष पाचपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
व्हीएस न्यूज – पदवी ही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे फलित असून पदवीधारकांनी व्यापक नीतीमूल्यांच्या भानाने सतत जागरुक राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तमराव जाधव, शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल साळुंखे, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलासकुमार पगारिया, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा. पांडुरंग भास्कर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.हनुमंत शिंदे, डॉ. ललितकुमार धोका, डॉ.प्रशांत गदिया, कल्पेश पगारिया आदी उपस्थित होते.
राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत, डॉ. अशोककुमार पगारिया यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी ध्वजसंचलन केले. प्रा. प्रवीण म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले, डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी ‘घर चलो अभियान’ राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत.
याकरिता प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट घरोघरी जाऊनविकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्द्तीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. घर चलो अभियनाचे माध्यमातून शहरामधील १३०० बूथचे मजबूतीकरण करण्याचा निर्धार शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी सर्व पक्ष पदाधिकारी व नगरसेवक यांना दिली आहे.
चलो अभियनाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख समन्वक म्हणून जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच मंडलाध्यक्ष अमोल थोरात – प्राधिकरण चिंचवड, संजय मंगोडेकर – चिंचवड स्टे. दापोडी, बाबू नायर – किवळे थेरगाव, माऊली थोरात – सांगवी काळेवाडी, प्रमोद निसळ – निगडी चिखली, सारंग कामतेकर – भोसरी चर्होली, राजेश पिल्ले – युवा मोर्चा, उमा खापरे – महिला मोर्चा, सदाशिव खाडे – अनूसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार, सचिन पटवर्धन – उर्वरित आघाड्या अशाप्रकारे विभागांचे समन्वक असणार आहेत. घर चलो घर अभियनामध्ये खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, अमर मुलचंदानी,यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक सामिल होणार आहेत.
भाजपचा येत्या ६ एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे. तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे शहर पदाधिका-यांना उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदा, नोकरी, शिक्षणानिमित्त मराठवाड्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. तथापि, लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा चिंचवड स्टेशनला करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यामार्फत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाव्दारे केली आहे. दाखले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणुन ओळखले जाते. या शहरात उद्योग, नोकरी, शिक्षण, रोजगारासाठी मराठवाड्यातील उदगीर, लातुर, नांदेड, बिदर, अमरावती, धाराशिव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. हे नागरिक लातुर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस व बिदर-मुंबई छत्रपत्ती शिवाजी महाराज र्टमिनस सुपर एक्सप्रेस या रेल्वेने आल्यानंतर त्यांना पुणे रेल्वे स्टेशन अथवा लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरावे लागते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी या दोन्हीही सुपर एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड स्टेशन येथे थांबा करण्यात यावा अशी मागणी दाखले यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - जमिनीच्या वादातून शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटकाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत सिमेंटचा गट्टू फेकून मारला. ही घटना बोपखेल येथे घडली. मंगला सदाशिव घुले (वय 43, रा. मारूती मंदीराजवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ ज्ञानेश्वर घुले (वय 20), सविता पांडुरंग घुले (वय 41), पांडुरंग घुले (वय 45), मंदार ज्ञानेश्वर घुले (वय 19, सर्व रा. बोपखेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला घुले या शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटक आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून मंगला घुले यांनी 2008 साली न्यायालयात दावा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घुले या घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपींनी मंगला घुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. ऋषभ याने त्यांना 'तु केस मागे घे, अन्यथा तुला खलास करून टाकू', अशी धमकी दिली. तसेच सिमेंटचा गट्टू मंगला घुले यांना फेकून मारला. फौजदार प्रमोद कठोरे अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002