व्हीएस न्यूज - फॅब्रिकेशन व्यावसायिकाची हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता सांगवीतील समर्थनगर येथे उघडकीस आला. अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. कैलास रामजी तौर (वय-35, रा. समर्थनगर, नवी सांगवी, मुळ बीड) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तौर यांचा पिंपळे-निलख येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.
याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी कैलास तौर कुटूंबासह बीडला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर रविवारी ते एकटेच सांगवीला आले होते. सकाळी ते कामावर न आल्याने त्यांचा नोकर घऱी आला. घराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. नोकराने दरवाजा उघडून पाहिले. कैलास तौर बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारपुर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, तौर यांच्या घरी आलेल्या कामगाराला पोलीसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात कामगाराच्या पत्नीचे व कैलास तौरचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. यातून कामगाराने तौर यांचा खून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002