व्हीएस न्यूज - प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास आणि हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करण्यात कायम पुढे असणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम होय. त्यांच्या आकस्मित निधनाने राज्यातील राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहिली. माजी मंत्री कै.पंतगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी पिंपरीतील कामगार भवन, नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस शहरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, एमआयएम, मनसे आदी पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापुर, सांगली भागातील नागरिक उपस्थित होते. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसेवक बाबू नायर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, एमआयएमचे शहराध्यक्ष अकिल मुजावर, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी, गिरीजा कुदळे, विद्या नवले, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, शाम आगरवाल, लक्ष्मण रुपनर, प्रदिप गायकवाड, तसेच राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, बाबा कांबळे, संग्राम तावडे, रामदास मोरे, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, सज्जी वर्की, संभाजी मुळीक आदी उपस्थित होते. सचिन साठे म्हणाले की, तरुण पणात पिंपरीत शिक्षकाची नोकरी करताना विद्यापीठाचे स्वप्न पाहुण ते पुर्णत्वाला नेऊण त्यांनी अविरत लोकसेवा केली. भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात लाखों नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा व हजारों युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. मला निवडणुकीत अपयश आल्यानंतर सर्वप्रथम फोन करुन समाजसेवा सुरु ठेवण्यासाठी मानसिक पाठबळ डॉ. कदम यांनी दिली. श्रध्दांजली वाहताना बाबू नायर म्हणाले की, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात शैक्षणिक सुविधा व विस्तार वाढविण्यासाठी डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. कदम हे राजकारणात सक्रीय असताना देखील मंत्री पदावर असताना समाजकारणाला महत्व देणारे नेते होते. मारुती भापकर म्हणाले की, सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शिष्टमंडळासह डॉ. कदम यांना भेटण्याचा योग आला. त्वेषाने बैठकीला जाणारे शिष्टमंडळ डॉ. कदम यांची ते प्रश्न सोडविण्याबाबतची भुमिका पाहुण हसत खेळत आनंदाने बाहेर पडत असत.
व्हीएस न्यूज - येथील एसटी कॉलनी शेजारील मुख्य बस स्थानकात सुरु करण्यात असलेल्या पाणपोईचे उद्घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उन्हाच्या झळा वाढल्या असून बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरातील संतोष कांबळे, राकेश कांबळे यांच्या प्रयत्नातून पाणपोई उभारण्यात आली. बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे वाहक-चालक, प्रवासी व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यावेळी रामभाऊ देशपांडे, प्रकाश दिवार, आप्पा कांबळे, राकेश कांबळे, देवराम माकर, विलास वाघ, मुरली देवरे, बाळू कांबळे, शिवलिंग सरोदे, मुकुंद शिनगारी, गणेश गायकवाड, असलम शेख आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - दापोडी येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मुर्ती स्थापनेचा 94 वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तीन दिवस विविध कार्यक्रम झाले. यावेळी दिपक कुदळे यांच्या हस्ते महापुजा झाली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. सोपान भाडळे, भंडारी, सुभाष बोधे, सुधाकर कणसे आदी उपस्थित होते. यामध्ये दैनंदिन कार्यक्रम काकड आरती, महिला भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर तसेच ह.भ. प. राजेंद्र जोशी यांच्या हस्ते कलशपुजन, डॉ. धनंजय पाटील, ह. भ. प. सुरेश महाराज किंडरे यांच्या हस्ते विणापुजन आदी कार्यक्रम पार पडले. ह. भ. प. गणेश महाराज कार्ले यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. या सर्व कार्यक्रमासाठी विजय काटे, ह. भ. प. बाळासाहेब शितोळे यांचे सहकार्य लाभले.
व्हीएस न्यूज - शिक्षणाची गुणवत्ता समाजातील सर्व घटकांवर अवलंबून असते. संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी व पालक हे चार घटक एकत्रितपणे काम करून शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेऊ शकतात, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित पदवीग्रहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माळी बोलत होते. विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्याना डॉ. माळी यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. सत्यम सानप, डॉ. सदाशिव मेंगाळ, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सुरेश थरकुडे, स्वप्नाली सोनवणे, प्रा.योगिता शिंदे, श्रीकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. माळी म्हणाले, शिक्षणाची इमारत ही चार खांबावर उभी असते, त्यातील विद्यार्थी हा एक प्रमुख घटक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करताना जिद्द, चिकाटी आणि अविरत परिश्रम घेणे गरजेचे असून, त्याशिवाय पर्याय नाही. आज नोकरी व व्यवसायिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती पात्रता धारण करून आपले ध्येय गाठले पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वर्तमानातील ज्ञान ग्रहण केले पाहिजे. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपण प्राप्त केलेल्या पदवीचा जीवन जगण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असेही डॉ. माळी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. बाळसराफ म्हणाले, प्रत्येक विध्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो, त्याचा शोध घेऊन आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या जबाबदारीची जाणीव होणार आहे. शिक्षण आणि रक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना एकवेळ चांगली गोष्ट करता आली नाही, तरी चालेल; परंतु त्यांनी वाईट गोष्ट करू नये, असे आवाहनही डॉ. बाळसराफ यांनी केले. दरम्यान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, मुकुंद खळदे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उत्तम प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार डॉ. सत्यम सानप यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजमध्ये 4 ते 11 मार्च या काळात सुरक्षा सप्ताह पार पडला. या सप्ताहात मशिनशॉप विभागास अपघात विरहीत काम केल्याबद्दल शून्य अपघात पारितोषिक कंपनीचे जर्मनी येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ. पीटर फेल्डस यांच्या हस्ते आणि थिसेनक्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलई दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात देण्यात आले. यावेळी कंपनीचे तांत्रिक उत्पादन संचालक सुहास तलाठी, राजेंद्र नागेशकर, रामचंद्र वाईंगडे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष गावडे यांनी केले. आभार उदय शिंदे यांनी मानले.
व्हीएस न्यूज -हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त विश्व श्रीराम सेना पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी आकुर्डी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आकुर्डी फोर्स मोटर्स कंपनीसमोरील मनपा उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर भरणार असून या रोजगार मेळाव्यात 8वी, 10 वी पास नापास, पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांनी आपला बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी सकाळी 9 वाजता याठिकाणी उपस्थित रहावे. उत्पादन, फार्मसी, फायनान्स, बीपीओ, कॉलसेंटर, आयटी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बॅकिंग, ग्रीकल्चर, सिक्युरीटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या बेरोजगार मेळाव्याचा जास्तीतजास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये सहाजणांनी कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. या प्रकरणातील सर्व आरोपींना हत्यारांसह पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. करण धरमसिंग वाल्मिकी (वय-19, रा. निगडी), प्रशांत नंदकुमार बहुले (वय 19, रा. निगडी), मंगेश सुरेश जाधव (वय 19, रा. निगडी), चंद्रकांत अनंत माने (वय-24, रा. चिंचवडगाव), निखील रामदास साळवे (वय 21, रा. निगडी), प्रतिक आनंद जाधव (वय 23, रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बालाजी वंगवाड (वय 23, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथील जे. के. ऑनलाईन सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत सेंटरची तोडफोड करून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सांगवी पोलीस ठाण्याचे तपास पथक सांगवी परिसरात गस्त घालत असताना पिंपळे सौदागर मध्ये पवना नदीच्या शेजारी काशिदपार्क जवळ आर्मीच्या मोकळ्या मैदानात सर्व आरोपी बसल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करत सापळा रचून लोखंडी कोयत्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, तपासी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस हवालदार सुरेश खांडेकर, गिरीश राऊत, रोहिदास बोऱ्हाडे, नितीन दांगडे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, हेमंत गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांनी केली.
व्हीएस न्यूज - आलिशान बसमधून इंदौरकडून पुण्याकडे आणण्यात येणारा 25 लाखांचा गुटखा गुरूवारी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध विभाग आणि गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात आली. विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा 25 लाख रुपयांचा गुटखा, 80 लाख रुपये किंमतीच्या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुटखा माफिया श्रीकांत चांदेकर आणि राजेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. (यूपी 75, एटी 4677) आणि (यूपी 75, एटी 4678) या क्रमांकाच्या दोन आलिशान बसगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेला सर्व माल निगडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे. ही कारवाई एफएसओ अधिकारी संतोष जाधव, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त नरगुडे, संजय दळवी यांच्या टीमने केली.
व्हीएस न्यूज - वाढदिवसाला तलवारीने केक कापणे बर्थडे बॉयसह त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. बर्थडे बॉय सुरज खंडू काटेसह दहा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुरज खंडू काटे (वय-28, रा. पिंपळे सौदागर) या तरुणाचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्थडे साजरा करताना सुरजने तलवारीने केक कापला. वाढदिवसाचे फोटो सुरजने फेसबुकवर टाकले. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानुसार आरोपींनी शस्त्रबंदीचा आदेश न पाळता त्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या वाढदिवसाला भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह त्याचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या पिंपळे सौदागर परिसरात लिनियर गार्डन वेगाने विकसित केले जात आहे. या लिनियर गार्डनमध्ये ‘लॅबिरींथ प्लाझा’ उभारणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिलेच ‘लॅबिरींथ प्लाझा’ पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर मध्ये होणार असल्याची माहिती नगरसेवक नाना काटे यांनी दिली.
नगरसेवक नाना काटे म्हणाले की, आकर्षक आणि अत्याधुनिक सुविधायुक्त लॅबिरींथ प्लाझाची उभारणी या परिसरात होत आहे. लॅबिरींथ प्लाझाचा आकार वर्तुळाकार असणार असुन साधारण ३०० स्के.फुट जागेमध्ये असणार आहे. त्यामध्ये एक बिंदु असुन त्याची रचना चांगल्या प्रकारे केली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी लॅबिरींथ प्लाझा उपयोगी ठरणार आहे. लॅबिरींथ प्लाझा मुळे तणावमुक्ती,मन प्रसन्न होणे, रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होणे, हृदय निरोगी राहते, रक्तदाब कमी राहतो असे विविध फायदे सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
अमेरीका, सिडनी, कॅनडा, सिंगापुर या ठिकाणी लॅबिरींथ प्लाझा असुन आता भारतामध्ये प्रथमच पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे होणार आहे असेही नगरसेवक नाना काटे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, महाराष्ट्राची पहिली जॉइंट कमिशन इंटरनँशनल (जेसीआय), अमेरिका आणि एनएबीएचएक्रीडीटेड हॉस्पिटल यांनी १९ आणि २० फेब्रुवारी रोजी २ यशस्वी अवयवांचे प्रत्यारोपण केले आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे आणि ग्लोबल हॉस्पिटल येथील डॉक्टर्सच्या संयुक्त टीमने पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडली.
आजारी असलेले दाते या दोघीही अनुक्रमे वय ४२ आणि ४६ वर्ष या पुण्यातील गृहिणी होत्या ज्यांना मोठ्या प्रमाणावर मेंदूत रक्तस्त्राव होऊन मेंदूतील स्टेम पेशींचे कार्य थांबून मृत्यू आला. दीर्घ समुपदेशन केल्यानंतर दोन्हीही कुटुंब परिस्थितीला समजू शकली आणि त्यांनी अवयव दानाची इच्छा व्यक्त केली. या उदात्त हेतूमुळे यकृताचा गंभीर आजर आणि किडनीचा शेवटच्या स्तरावरील आजार असलेल्या गरजू रुग्णांसाठी दोन यकृत आणि चार किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी उपलब्ध अन्यथा त्यांचा आजार बळावला असता.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये ज्यांना यकृत लाभले त्या ५४ वर्षाच्या सांगलीच्या गृहिणी होत्या तर दुसरे ६० वर्षाचे मुंबईतील पुरुष होते. दुसरीकडे किडनीचा लाभ २० वर्षाच्या विद्यार्थिनी असलेल्या मुलीला आणि ३७ वर्षाच्या आयटी व्यावसायिकाला झाला. एक किडनी नाशिकच्या हॉस्पिटलला तर दुसरी पुण्यातल्या हॉस्पिटलला देण्यात आली. हे सर्व वाटप विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) सल्ल्याने करण्यात आले.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे म्हणाल्या की “मेंदू मृत झालेल्या रुग्णांकडून दान केलेले अवयव प्राप्त करणे हे लोकांमध्ये झालेल्या व्यापक जनजागृती आणि आदित्य बिर्ला क्रिटीकल केअर टीमच्या सदस्यांनी प्रभावित कुटुंबाच्या केलेल्या सखोल समुपदेशन यामुळे शक्य झाले. “जानेवारी २०१६ पासून हॉस्पिटलमध्ये संभावित दात्यांच्या कुटुंबियांचे योग्य समुपदेशन झाल्याने पाच मृत व्यक्तींचे अवयव दान बघायला मिळाले आहे.परिणामस्वरूप सहा यकृत, आठ किडनी आणि एक हृदय प्राप्त होऊ शकेल. अलीकडे बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला यकृत प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळाली आहे आणि हॉस्पिटल दान केलेले अवयव प्राप्त करणे आणि प्रत्यारोपण या दोन्ही गोष्टी अविरतपणे करत राहील.”. आदित्य बिर्ला हॉस्पिटलला अवयव प्राप्त करणे आणि किडनी प्रत्यारोपण यसाठी २००७ पासून मान्यता आहे आणि अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमात ते अग्रभागी आहे.
व्हीएस न्यूज - आपल्या न्याय मागण्यासाठी नाशिक ते मुंबईतील विधानभवनावर २०० किलो मीटर लांबचा पल्ला पायीवारी करून मोर्चा काढणा-या शेतक-यांना भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवाद्याची उपमा दिली आहे. शेतक-यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे विधान अत्यंत निषेधार्ह असून महाजन यांनी शेतक-यांचा अवमान केले आहे. त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वर्षा जगताप यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने नाशिक ते मुंबईतील विधानभवनावर २०० किलो मीटर लांबचा पल्ला पायीवरी करून मोर्चा काढला. या मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक उन्हाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असताना या मोर्चेक-यांना सत्ताधारी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवादीची उपमा दिली आहे.
शेतक-यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी माओवाद शेतकरी आंदोलनातून डोकावत असल्याचे, संतापजनक विधान त्यांनी केले आहे. महाजन यांनी राज्यातील बळीराजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी. त्यांच्या वक्तव्याच्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करत आहे. राज्य सरकार हे शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देणे, शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून शेतक-यांची चेष्टा करत आहे. भाजप सरकारला गर्दी व आंदोलन केल्यानंतरच नेहमी जाग येणार का?सरकार म्हणून काय नैतिक जबाबदारी आहे की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002