व्हीएस न्यूज - जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी सकाळी देहुगाव येथे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.
यावेळी उपअधिक्षक तेजस्विनी सातपुते, डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, मंदिराचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे कमिटी, देहूरोडचे निरीक्षक प्रकाश धस, सर्व प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवारी (दि.५ जुलै) रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यापूर्वी पालकमंत्री गिरीष बापट, उपअधीक्षक, डीवायएसपी यांनी बैठका घेतली आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत अद्याप पूर्ण न झालेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.
लाखो भाविक सहभागी होणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या आहे. यासाठी अधिक्षक हक, उपाधिक्षक सातपुते, डीवायएसपी माडगूळकर यांच्यासह सात निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २७० महिला पुरुष पोलिस कर्मचारी आणि १५० होमगार्ड असणार आहेत. या सोबत एसआरपीएफ, दंगा काबू नियंत्रण पथक व इतरही पथके तैनात असणार आहेत.
व्हीएस न्यूज - आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे यांची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भडणातून झाली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफटा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मयत बालाजी कांबळे हे काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाला आले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या बरोबर झटपट केली होती. अजय मेटकरी हा मयत बालाजी कांबळे याचा मावस भाऊ आहे. भांडणानंतर त्याने बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा धमकी दिली होती. त्यानेच भांडणाचा राग मनात धरून नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून केला. अशी फिर्याद घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
व्हीएस न्यूज - मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्या पासून प्रयत्न करत आहे. महासंघानेच सर्वप्रथम या बाबत जनजागृती केली. आरक्षण हा आमचा हक्कच आहे, तो आम्ही मिळवणारच परंतु राज्यातील मराठा समाजातील सर्व युवक युवतींना शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे.
त्यासाठी येणा-या अडीअडचणीवर मात करण्यासाठी राज्यभरातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. वेळोवेळी मराठा समाजाच्या समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आम्ही आमचे ध्येय गाठूच. असे प्रतिपादन अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजीत जगताप यांनी पिंपरी, पुणे येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ, प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी सांगितले की, अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की, मागील वर्षी राज्य सरकारने काढलेला ‘श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची’ अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी. शासऩ फक्त आदेश काढून मोकळे झाले आहे. प्रत्यक्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेताना शाळा महाविद्यालयांकडून संपुर्ण फी भरण्याची मागणी केली जाते. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करते की, चालु शैक्षणिक वर्षी प्रवेश घेताना संपुर्ण फी मागणा-या शिक्षण संस्थां विरुध्द तक्रार करण्यासाठी पुढे यावे. विद्यार्थ्यांची व पालकांची अडवणूक करणा-या अशा शिक्षण संस्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढण्याचे काम केले, मात्र प्रत्यक्षात युवकांना हे कर्ज देण्यासाठी बँकाकडून अनेक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत मागणी व अडवणुक केली जाते. गरजु युवकांनी ऑनलाईन प्रक्रीया पुर्ण करुन अर्ज भरल्यानंतर बॅंक अधिकारी मुलाखतीच्या वेळी आम्हाला शासनाचा आदेश प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे या योजनेखाली कर्ज देण्याचे नाकारतात. पिळवणुक करतात असे निदर्शनास आले आहे. तसेच शेतक-यांना कर्ज मिळवण्यासाठी व कर्जमाफीसाठी बॅंक अधिकारी अडवणूक करतात. माता भगिनींणा छळतात अशा निर्ढावलेल्या अधिका-यांना व त्यांच्या दलालांना वठणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ आवाहन करते की, अशा बँक अधिका-यांना उघडे पाडण्यासाठी मराठा महासंघाकडे तक्रार करावी.
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ त्यांचा योग्य समाचार घेईल. शेतक-यांना व युवकांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करील. तसेच अखिल भारतीय युवक मराठा महासंघ राज्य शासनाकडे मागणी करत आहे की, मराठा समाजाच्या हितासाठी फक्त आदेश काढून उपयोग नाही. तर ३१ मार्च २०१८ पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत किती विद्यार्थ्यांना, किती रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून किती गरजु युवक युवतींना उद्योग व्यवसायासाठी किती रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. याची सविस्तर आकडेवारी नागरीकांच्या माहितीसाठी वेबसाईटवर जाहिर करावी. आमचे असे म्हणणे आहे की, या दोन्ही योजनेचा मराठा समाजातील तरुणांना म्हणावा तसा उपयोग झाला नाही. या योजनेचा सक्षमपणे निधी वापरला जावा म्हणून शासनाने जाहिरात करावी.
प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरात केएसबी चौकातील उड्डाणपुलाखाली असलेला कै. अण्णासाहेब पाटील यांच्या अर्धपुतळा काढून पुर्णाकृती पुतळा उभारला जावा अशीही मागणी केली. तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने प्लॅस्टीक बंदीचा घेतलेला निर्णयाचे अखिल भारतीय युवक मराठा महासंघ स्वागत करत आहे. परंतु कोणतीही पुर्व तयारी न करता हा निर्णय घेतला असल्याचे दिसते. प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी, कागदी पिशव्या बनवणा-या उदयोजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक होते. मात्र असे न करता घाई गडबडीने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे दिसते. यामुळे सामान्य नागरीक व्यापारी उदयोजक सर्वच सभ्रंमावस्थेत आहेत. या बाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रशासन मात्र प्लॅस्टीक उत्पादकांना पाठीशी घालुन सामान्य नागरीकांवर व छोट्या व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. याचा अखिल भारतीय युवक मराठा महासंघ निषेध करत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना कै. अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. या वटवृक्षाचे अनेक शाखा, संस्था संघटनांमध्ये रुपांतर झाले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाला करावी लागली. अशीच मराठा समाजाची सर्व शक्ती एकत्र करुन शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण आम्ही मिळवुच, असा ठाम विश्वास अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी व्यक्त केला.
व्हीएस न्यूज - मान्सूनच्या पावसाची मावळ तालुक्यात जोरदार सुरुवात सुरुवात झाली असून खरीप पिकांच्यासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
मावळ तालुका अतिपावसाचा तालुका असून मावळात प्राधान्याने खरीप पिकेच घेतली जातात. तालुक्यातील 30 हजार एकर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. पावसाची दमदार सुरुवात झाल्याने भात पिकांच्या लागवडीना चांगलाच वेग येणार आहे.
मान्सून पावसाचा जोर पश्चिम पट्यात जास्त असून त्या ठिकाणी भाताच्या पिकांना याचा फायदा होत आहे. मान्सूनच्या पावसाने यावेळी वेळेपूर्वीच सुरुवात केली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली होती. मात्र रविवार, सोमवार पासून पावसाचे पुन्हा पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
मावळच्या पूर्व पट्यातही पावसाचे आगमन झालेले असल्याने खरीप भात पिक तसेच भुईमुग, कडधान्ये, आदी खरीप पिकांच्या पेरण्यांना चांगले वातावरण आहे. मान्सूनच्या पावसाने तालुक्यातील जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. शनिवार आणि रविवार जोडून सुट्या आल्याने मावळत वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटक दुचाकी आणि चारचाकी गाड्यामधून आल्याने काही महत्वाच्या पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी झाली होती.
मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पश्चिम पट्ट्यातील डोंगरी भागात ओढे, नाले, धबधबे भरभरून वाहू लागल्याने पुणे मुंबई कडील पर्यटकांनी मावळात वर्षाविहारासाठी मोठी गर्दी केली होती.
पुणे मुंबई महामार्ग या पर्यटकांनी फुलून गेला होता. महामार्गावरील धबध्ब्यावरहि प्रचंड गर्दी झाली होती. चहा, कॉफी, नाष्टा, भोजन करण्यासाठी पर्यटकांना वाट पहावी लागत होती.
व्हीएस न्यूज - खरोखर आपण ज्येष्ठ आहोत का ? जुनाट बुरसटलेले ज्येष्ठ आहोत हे या पिढीने तपासून पाहावं. जर मुलंबाळ आपल्या अन्न, वस्त्र, निवारा तसेच आजारपणाची काळजी घेत असतील तर संवादसारख्या आपल्या मानसिक गरजांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं कितपत योग्य आहे? निवृत्तीनंतर आपलं मनोरंजन करण्यासाठी वाचन, लिखान, टिव्ही, स्मार्ट फोन, फिरायला जाणं, संगीत आदी माध्यमांतून निवड करून पुढील पिढीवर संवादाच्या गरजेचा भार टाकता कामा नये, असे मत काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
नव्या पिढीला दोष न देता वृध्दांनी आपल्या स्वतःमध्येच बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. नवीन पिढीचा व घरातील आनंदाचे वातावरण कसे राहील, यासाठी ज्येष्ठांनी प्रयत्न करावेत, असेही बकाल म्हणाल.
व्हीएस न्यूज - शिक्षण ही एक साधना आहे, जेवढे तन्मय होऊन तुम्ही ही साधना कराल. तितके चांगले तुम्ही शिक्षण साधक बनाल, असे प्रतिपादन चारित्र्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या आयोजित इयत्ता 10 वीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्य प्रज्ञा पाटील, सुभाष गदादे, मधुरा लुंकड आदी उपस्थित होते. शाळेच्या 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. 75 ते 89 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी माध्यमाचा 98.78 तर इंग्रजी माध्यमाचा 94.91 टक्के निकाल लागला.
अथर्व कुलकर्णी याला 99.80, साक्षी महाजन 97.40 तर श्रेया जगताप हिला 97.20 टक्के गुण मिळविले. श्रावणी कुलकर्णी, सोनिय जगदाळे, श्रृती पिंगळे यांनी गणितात तर अथर्व कुलकर्णी, साक्षी महाजन, प्रथमेश भोजने, ओम महाजन यांनी संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले. तंत्र शिक्षण विभागात अमृता साळुंखे प्रथम आली. सूत्रसंचालन कल्याणी पटवर्धन, वैशाली गायकवाड यांनी केले. अनिरूध्द पुरीगोसावी, नागेश जोशी, राजश्री मराठे आदींनी संयोजन केले.
व्हीएस न्यूज - आपल्या मित्रांना जी शाखा निवडली, त्याचे अनुकरण करू नका. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे. तुम्हाला नावडलेल्या विषयांचा विचार न करता आवडलेल्या विषय घेऊन शाखा निवड केली. तर हमखास यशस्वी व्हाल. पालकांनी देखील आपल्या पाल्यांनी अमुकच शाखा निवडीचा अट्टहास करू नये, असे मत करियर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील दर्शन हॉलमध्ये योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश भोईर यांच्या वतीने करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजक व्हा या विषयांवर उद्योजक व लेखक प्रा. नामदेव जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानच्या वतीने 495 विद्यार्थ्यांना भेट वस्तू व शाखा निवडबाबत पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीराम परबत, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, प्रभाग सदस्य विठ्ठल भोईर, हेमंत हरहरे, रविंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.
नामदेव जाधव म्हणाले, "हल्ली मी माझी आई, वडील, पत्नी, घर व नोकरी याबाबत समाजाची मानसीकता झालेली दिसून येते. नोकरी करण्यापेक्षा मी उद्योजक होऊन इतरांना नोकरी देईल हा संकल्प विद्यार्थी व पालकांनी करावा. विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याच्या ध्येयाच्या मागे लागले तर प्रतिष्ठा व पैसा अपोआप त्याच्या मागे येतो याची खुणगाठ बांधा"
सुरेश भोईर यांनी प्रास्ताविक केले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अंबर चिंचवडे यांनी आभार मानले. विजयकुमार मंजुगडे, पोपटराव पवार, विजयकुमार बोरसे, देवीदास धनवडे, नंदू टकले, प्रज्ञेश भोईर, पांडुरंग भोईर, प्रमोद भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्येक जिल्ह्यात एकच महिला अध्यक्ष असे धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.
या धोरणानुसार पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे यांचे पद रद्द करण्यात आल्याची माहिती सामाजिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत धेंडे यांना गायकवाड यांनी 18 जून रोजी पत्र दिले आहे.
व्हीएस न्यूज - जमीन विकून आईच्या नावावर आलेले पैसे मोठा भाऊ देत नाही, पैसे मागितल्यानंतर भावाने मारहाण केल्यामुळे एका तरूणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी वाकड येथे उघडकीस आली. अविनाश संभाजी पवार (वय-30, रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश हा बेरोजगार होता. त्याला दारूचेही व्यसन होते.
याबाबत वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश माने यांनी माहिती दिली. वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. नागरिकांनी त्याला पालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अविनाश यांच्या खिशात पोलिसांना आधार कार्डसह आदी कागदपत्रे सापडली. त्यानुसार त्यांची ओळख पटविण्यात आली. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचेही आढळले. जमीन विकून आईच्या नावावर आलेले पैसे मोठा भाऊ देत नाही, पैसे मागितल्यानंतर भावाने मारहाण केल्यामुळे अविनाशने आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने काळेवाडीत आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 819 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
काळेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन पुणे झोनचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, अभिषेक बारणे, गोपाळ मलेकर, डब्बू आसवानी, नगरसेविका उषा काळे, कृष्णा बुचडे आदी उपस्थित होते. निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, तसेच सेवादल, साधसंगत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्त संकलनाचे कार्य वाय. सी. एम. हॉस्पिटल रक्तपेढी, ससून हॉस्पिटल रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी केले. रक्तदान शिबिराच्या पूर्वतयारीसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान जनजागृती मोहीम आखण्यात आली होती. यामध्ये पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर या ठिकाणी जाऊन पथनाट्य, दुचाकी फेरी, पदयात्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच घरा-घरामध्ये जाऊन रक्तदानाची प्रेरणा देण्यात आली. संत निरंकारी मंडळाचे पिंपरीचे प्रमुख गिरिधारी मतनानी यांनी सर्वांचे आभार मानले.
व्हीएस न्यूज - अमेरिकेला नोकरीला असलेल्या मुलाकडे जाण्यासाठी घरच्या सर्व मंडळींनी विमानाने भरारी घेतली. विमान अमेरिकेत पोहोचण्याआधीच त्यांचे घर अज्ञात चोरटयांनी फोडले. हा प्रकार कासारवाडी येथे सोमवारी पहाटे घडला. परशुराम जगदाळे आणि नवलू पाटील यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम जगदाळे यांचा मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे. त्याला भेटण्यासाठी परशुराम जगदाळे, नवलू पाटील आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी रात्री अमेरिकेला रवाना झाले. कासारवाडी मधील मेहता चेंबर्समध्ये असलेले त्यांचे घर अज्ञात चोरटयांनी सोमवारी पहाटे फोडले. ते अद्याप अमेरिकेला पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही. घर फोडल्याची खबर त्यांचे नातेवाईक दिलीप जगदाळे यांनी भोसरी पोलिसांना दिली. मात्र, कशाची व किती चोरी झाली आहे, हे समजू शकले नसल्याने अद्याप फिर्याद नोंदविण्यात आली नाही.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002