व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनासह आता सारी आजाराचे संकट ओढावले आहे. एका महिलेमध्ये सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात सारीची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचे समोर आलं आहे. औरंगबाद, हिंगोली, पिंपरी चिंचवड येथे सारी आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.
औरंगाबादमध्ये दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू
औरंगाबादमध्ये सारी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दहा दिवसात तब्बल 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाला आहे. 29 एप्रिल ते 7 मार्च या दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाल्याने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामधील एक रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह होता.
हिंगोलीत 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू
हिंगोली शहरातील एका 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर या युवतीच्या घरातील आठ जणांना हिंगोलीच्या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे.
सारी आजार म्हणजे काय?
सेवीअर अॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस अर्थात सारी आजाराची लक्षणं ही कोरोना सारखीच आहेत. यामध्ये रुग्णाला सर्वसाधारणपणे 38 अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणिश्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं असतात. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे.
दरम्यान, पिपरी चिंचवडमध्ये आता एकूण 22 कोरोना रुग्ण झाले आहेत. यातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. गेल्या बारा तासाच्या आतच 2 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
व्हिएस न्युज - मास्क न वापरणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील ३० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून कलम १८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, चिखली, सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत. आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांचा आकडा हा २६ वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्यात. करोना हा संसर्गजन्य असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत तब्बल ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अनेक नागरिक हे सार्वजनिक ठिकाणं जसे बँका, भाजी बाजार, किराणा, मेडिकल दुकानांमध्ये जाताना मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता पोलिसांनी कारवाई केल्याने किमान पोलिसांच्या कारवाईने तरी नागरिक मास्क वापरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
व्हिएस न्युज - आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारी पुण्यातील 'मोड्यूल इनोव्हेशन्स' नावाची स्टार्टअप कंपनी कोविड -19 च्या निदानासाठी 10 ते 15 मिनिटांची चाचणी तयार करत असून त्याला विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसहाय्य मिळत आहे.
यूसेन्स (USense) नावाचे याच कंपनीचे प्रमुख उत्पादन असून त्यातील पूर्वसिद्ध संकल्पनेचा वापर करून आता ही कंपनी nCoVSENSEs (TM) तयार करत आहे. कोविड-19 चा सामना करताना मानवी शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज म्हणजेच, प्रतिपिंडांचा झटपट शोध घेण्यासाठी याचा उपयोग होईल.
सध्या भारत ज्या टप्प्यावर आहे, त्याचा विचार करता बहुसंख्यांच्या चाचण्या करणे, आता आत्यंतिक महत्त्वाचे आहे. या झटपट चाचणी साधनामुळे, रुग्णांमधील संसर्गाची खात्रीशीर निश्चिती करता येईल. तसेच, एखादा संसर्गित रुग्ण बरा झाला का, किंवा कसे, त्याचप्रमाणे, संसर्गाची स्थितीही समजू शकेल.
सध्याची रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पोलीमेरास चेन रिऍक्शन (RT-PCR) ही पद्धत सर्वोत्कृष्ट असली तरी ती महागडी व वेळखाऊ आहे, तसेच त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. तर या नवीन झटपट चाचणीमुळे या अडचणीवर कार्यक्षम पद्धतीने व कमी खर्चात तोडगा निघू शकतो.
“या चाचण्या म्हणजे, PCR वर आधारित खात्रीलायक तंत्राला पर्याय ठरू शकत नाहीत, हे खरे, मात्र प्रतिपिंडे शोधून काढण्यावर आधारित असणाऱ्या या चाचण्या बहुसंख्य लोकांच्या झटपट तपासण्या करण्यासाठी जगभर वापरात आहेत. संख्येने मर्यादित असणाऱ्या PCR यंत्रांवरील भार हलका होण्यास यामुळे मदत होते. तसेच, धोरणे ठरवणे, निर्णय घेणे अशा कामांनाही हे तंत्र सहाय्य्यभूत ठरते.”- असे मत, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मा
शरीरात विषाणूजन्य संसर्गाचा शिरकाव होताच तयार होणाऱ्या IgG आणि IgM या प्रतिपिंडांचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेली ही nCoVSENSe चाचणी, ‘स्पाईक’ प्रथिनांविरोधात काम करते. त्यामुळे ती खासकरून कोविड-19 च्या निदानासाठी उपयुक्त ठरते. ये
2 ते 3 महिन्यांत राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यावर ही चाचणी प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचा या कंपनीचा विचार आहे. या आजारातून लोक बरे झाले का, हे ठरवण्यासाठी भविष्यातही याचा उपयोग होऊ शकतो. विमानतळ, रेल्वेस्थानके, रुग्णालये, अशा अनेक ठिकाणी प्रवासी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी हे वापरल्यास, भविष्यात पुन्हा संसर्ग उफाळण्याचा धोका आपण टाळू शकतो. सदर तंत्रज्ञानाची व्यवहार्यता सिद्ध झाली आहे, तथापि, त्या उत्पादनाची उपयोगिता आणि स्पष्टीकरण देणारा प्रोटोटाईप अद्यापि बाकी आहे.
व्हिएस न्युज - एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया केली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारन्टाईन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपर चिचंवड मधील एका खाजगी रुग्णालयात दि. ३१ मार्च रोजी एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे डॉक्टरांनी त्याचे सॅम्पल कोरोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले.
हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता ही माहिती त्याने डॉक्टरांपासून लपवून ठेवली. या रुग्णाचा अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. डॉक्टरांनी रुग्णाच्या आईकडे या संदर्भात चौकशी केली त्यावेळी हा रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजर असल्याची माहिती समोर आली.
डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये तो कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यांसह इतर डॉक्टरांनाही ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या ४० डॉक्टरांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला डॉक्टरांनी या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री विचारली असता त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी कोणीही बोलायला तयार नव्हते. ताप आल्यानंतर त्याच्या आईने दिल्लीला जाऊन आल्याचा खुलासा केला. या ४० पैकी ३० जण हे रुग्णालयातील स्टाफ तर १० डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सर्वांचे सॅपल्स पाठवण्यात आले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्या रिक्षाचालकांवर शस्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
व्हिएस न्युज - करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. पण मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. मातोश्री सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी सोशल डिस्टनसिंगची काळजी घेत पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी, काळेवाडी फाटा, वाकड, थेरगांव, पिंपरीगांव,तापकिर मळा,रहाटणीगांव, परिसरात घरोघरी धान्याचे वाटप केले.
या उपक्रमाबाबत माहिती देत गणेश आहेर म्हणाले की, कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले आहे व त्याचा वाढता संसर्ग रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. घरातील राशन अल्प असल्यामुळे या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे . परंतु, अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले.
अन्न-धान्याचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी कष्टकऱ्यांच्या घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे.
संकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी यथा शक्ती मदत करावी असे आवाहन मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष गणेश आहेर.,नवनाथ (माऊली) जाधव, गणेश पाडूळे,गोरख पाटील, निलेश भोरे, रविकिरण घटकार, शिल्पाताई आनपण, संजय गायके, बाळासाहेब गायकवाड, नरसिंग माने, आधिकराव भोसले, गणेश वाळूंज, मारुती म्हस्के, दत्ता गिरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच समाजकंटकांना कलम 144 चे महत्व माहीत नाही की कोरोना विषाणू ला अटकाव करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरातील काही परिसरातील नागरिकांचा वावर दिसून येत आहे चौकातील तरुणांचे घोळके धावत्या रिक्षा विनाकारण दुचाकीवर भटकणारे तरुण नेहमीप्रमाणे आजही रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत शहरात नागरिकांची गर्दी जर अशीच राहिली तर कोरोना विषाणूला रोखणे हाताबाहेर जाईल अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी संचारबंदी देखील लागू केली आहे. तरीही मुख्यतः निगडी,दापोडी,पिंपरी,भोसरी,काळेवाडी या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.
'कलम 144' म्हणजे काय…?
>सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केली जाते.
>पाच किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असं म्हणतात.
>कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतात.
>जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा न्यायदंडाधिकारी देत असतात.
>कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते.
>जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.
>या आदेशाचा कालावधी हा दोन महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये, कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा जमावबंदी लागू केली जाऊ शकते.
>परंतु अत्यावश्यक काळात जर राज्य सरकारला वाटले तर याची अंमलबजावणी सहा महिन्यापर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.
व्हिएस न्यूज -करोना व्हायरसच्या संकटामुळे पुणे शहरातील व्यापाऱ्यांपाठोपाठ सलून मालकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुण्याच्या मार्केट यार्डातील ‘फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजारा’बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
“करोना व्हायरसच्या संकटामुळे शुक्रवार दिनांक 20 मार्च 2020 व शनिवार दिनांक 21 मार्च 2020 रोजी फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे बंद असेल. तसेच, 31 मार्च 2020 पर्यंत दर बुधवारी व दर शनिवारी संपूर्ण बाजार स्वच्छतेसाठी बंद केला जाईल”, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनकडून देण्यात आली आहे. आडते असोसिएशन व दोन्ही कामगार संघटना यांची आज, दिनांक 18 मार्च 2020 रोजी तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरातील व्यापारी पेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवार (१७ मार्च) ते गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, औषधे, किराणामाल विक्रेते वगळून बहुतांश व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. शहरातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, शनिपार,अप्पा बळवंत चौक, फडके हौद चौक, भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेल्या या भागात शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील व्यापाऱ्यांनी बंद ठेवला असला तरी उपनगरात मात्र सर्वत्र व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते.
व्हिएस न्यूज -शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील एखादा जवान देशासाठी शहीद झाल्यास त्या कुटुंबीयांना आधार म्हणून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून याबाबतचे धोरण ठरवण्याची संपूर्ण कार्यवाही करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. पालिका सभेत त्यावर अंतिम मान्यतेचे शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा संख्येने सैनिकी कुटुंबीय राहतात. शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने ते शहरात स्थायिक झाले आहेत. जम्मू काश्मीर, लेह-लडाख यासह देशाच्या विविध ठिकाणी, कठीण परिस्थितीत सीमेवर हे जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धर्तीवर पिंपरी पालिकेकडून सैनिक तसेच शहिदांच्या परिवारांना आर्थिक मदत केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील जवान देशासाठी शहीद झाल्यास त्या कुटुंबाला अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
या मदत निधीचा उपयोग त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्हावा, सैनिकी परिवाराचे मनोबल वाढावे, जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान राखला जावा, असा हेतू या मागे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
व्हिएस न्यूज -मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत (जायका) उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या निविदा चढय़ा दराने आल्यानंतरही राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाने त्यातील एक निविदा मंजूर करावी, यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खर्च आवाक्यात नसतानाही आलेल्या चारपैकी एका निविदेला मंजुरी देण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कामे करण्यासाठी महापालिकेने ४५० कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. मत्स्यबीज केंद्र, हडपसर, मुंढवा, भैरोबा नाला, नायडू रुग्णालय आणि नरवीर तानाजी वाडी या ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान येथील जायका कंपनीकडून ९८० कोटी रुपयांचे वित्तीय साहाय्य मंजूर झाले आहे. जायका कंपनीबरोबर करार करताना प्रकल्पाचा वाढीव खर्च महापालिकेला करावा लागणार आहे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पाला ९८० कोटींपुढे जायकाकडून कोणतीही आर्थिक मदत होणार नाही.
पहिल्या टप्प्यात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा चढय़ा दराने आल्या आहेत. चार निविदांचाच अतिरिक्त खर्च साडेपाचशे कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय भूसंपादनाचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे हा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे या निविदा रद्द करण्याची भूमिका महापालिकेने घेतली होती. मात्र राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाने यासंदर्भात महापालिकेवर दबाव टाकला आहे. त्यामुळे महापालिकेनेही एक पाऊल मागे घेतले असून एका निविदेला मान्यता देण्याची हालचाल सुरू केली आहे.
जायका प्रकल्पासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत आढावा बैठक झाली. चार टप्प्यापैकी एका टप्प्यातील निविदा चौदा टक्के वाढीव दराने आली आहे. ही निविदा दहा टक्क्य़ांपर्यंत खाली आल्यास त्याला मान्यता मिळू शकते आणि प्रकल्पाचा निधीही परत जाणार नाही, असे राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून महापालिकेला सांगण्यात आले. त्यानुसार चौदा टक्के कमी दराने आलेल्या निविदेसंदर्भात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी संबंधित ठेकेदारा कंपनीशी चर्चा करणार आहेत. दहा टक्के दराने कामे करण्याची सहमती ठेकेदाराने दर्शविल्यानंतर तसे पत्र प्राधिकरणाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या निविदेला तातडीने मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. मुळातच सर्व निविदा जादा दराने आल्या आहेत. एका टप्प्यातील कामासाठी दहा टक्के जादा दराने काम देण्यात येणार असले तरी त्यातून पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होणार आहे. त्यामुळे निविदा मंजुरीवरूनही वाद होण्याची शक्यता आहे.
निधीपरतीची भीती
निविदा चढय़ा दराने आल्यानंतर त्या रद्द करण्याची मान्यता पालिकेने राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाकडे मागितली होती. मात्र त्या वेळी पालिकेने त्यांच्या स्तरावर हा निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले. त्यानंतर या निविदा मान्य कराव्यात, अशी भूमिका प्राधिकरणाकडून घेण्यात आली. निविदा मान्य न झाल्यास निधी परत जाईल, अशीही भीती घालण्यात आली आहे.
व्हिएस न्यूज- पिंपरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालय तसेच संशोधन केंद्र व पुणे स्रीरोग प्रसूती शास्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ.डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी. डी पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, संचालिका डॉ स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ यशराज पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदशनाखाली मोफत कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी (पॅपस्मिअर टेस्ट) स्तनांच्या कर्करोगाची तपासणी (मॅमोग्राफी टेस्ट) मुख कर्करोग तपासणी (ओरल कॅन्सर), हाडांची ठिसूळता तपासणी तसेच विशेष कर्करोग व स्रीरोग आणि दंत व मुखरोग तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन मोफत करण्यात आले.
या शिबिराच्या उदघाट्न कार्यक्रमास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, पिंपरी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, स्रीरोग व प्रसूतीशास्र विभाग प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे,स्रीरोग प्रसूती शास्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाळके, कर्करोग तज्ञ् डॉ. दक्षा निराळे, दंत व मुखरोग तज्ञ् डॉ. खरे आदी उपस्थित होते. या शिबिरात एकूण १६० महिलांनी तपासणी केली.
"या धावपळीच्या युगात चौवीस तास कार्यरत राहणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्यबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे खास करून पोलीस महिलांसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने हे कर्करोग निदान व उपचार शिबीर आयोजित केल्याबद्दल पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी आभार मानले व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. स्रियांच्या आरोग्यबाबत डॉ जे एस भवाळकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. हेमंत देशपांडे यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक व आभार मानले. डॉ. विद्या गायकवाड, डॉ. चंद्रकांत मडकर, डॉ. मधुकर शिंदे, डॉ. नूतन वंजारे, डॉ. शिल्पा क्षीरसागर, डॉ. प्रताप फरांदे, डॉ. अमेय चुग तसेच पुणे स्त्रीरोग प्रसूती शास्त्र संघटनेचे डॉ. पराग बिनीवाले, डॉ. मंगल वाणी तसेच स्त्रीरोग व प्रसूती विभागातील तीस निवासी डॉक्टरांनी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
व्हिएस न्यूज - 'आम्ही पुणेकर' सह जिजामाता पुरस्कार वितरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले होते आयोजकांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आली यात राइस अँड शाईन कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्री पाटील यांना बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समितीच्या वतीने कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
यावेळी पं.वसंतराव गाडगीळ, सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे, प्रकाश देवळे, आयोजक हेमंत जाधव, मनोज पंडित, अमोल शुक्ला, अमर निंबाळकर, संतोष फुटक, तेजस गाडवे, सचिन गुरव, भैया आढाव, आदी उपस्थित होते.
" मला पहिल्या पासून शेतीची आवड होती. शेतकऱ्याचे दुःख मला बघवत नव्हते. जो समज होता की शेतीमधून पैसा मिळत नाही हा समज चुकीचा ठरवायचा होता. यातूनच मी शेतीकडे फुल व फलोत्पादन व्यवसायाकडे वळले माझ्या कंपनी मध्ये ९८ टक्के महिला कार्यरत असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. फक्त पाच महिलांपासूनचा हा प्रवास आज हजार महिला कंपनीत कार्यरत आहे. आजच्या परिस्थिती महिलांनी आपल्यातील कुवत आधी समजली पाहिजे आपण काय करू शकतो त्यादृष्टीने स्वप्न पहा आपल्या ध्येया पर्यंत पोहोचा यासाठी भक्कम आत्मविश्वास गरजेचा आहे. सद्यस्थितीत महिलांनी सावधगिरीने राहिले पाहिजे." अशी भावना डॉ भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केली.
आजच्या काळातील महिला सक्षम आहेत. पण त्यांच्याकरीता संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रगतीच्या मार्गावर जाण्याकरीता अनेक वाटा आहेत. मात्र, त्या वाटा महिलांना माहित व्हायला हव्यात. सक्षम असलेल्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या महिलांना मदतीचा हात द्यायला हवा. महिलांसाठी प्रतिकूल परिस्थिती हीच प्रेरणा असते, असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी व्यक्त केले.
शकुंतला काळे म्हणाल्या की, महिलांचे सन्मान होणे हे गौरवास्पद बाब आहे. परंतु सन्मानासोबतच त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल, अशा संधी देखील उपलब्ध व्हायला हव्या. मुलगा-मुलगी असा भेद न मानता, मुलींचा जन्म आपण आनंदाने स्विकारायला हवा. सक्षमीकरणाची भावना प्रत्येक स्त्री च्या मनात असणे गरजेचे आहे.
दिलीप देशमुख म्हणाले की,आज महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न महत्वाचा आहे. दिल्ली, कोपर्डी, हिंगणघाट सारख्या घटना आज घडत आहेत. या घटना जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत महिला सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वत:ची सुरक्षा स्वत: करायला शिकले पाहिजे. महिला सक्षम आहेत, आता सुरक्षित होण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे टपाल विभागातर्फे माय स्टँम्प अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विशेष टपाल टिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे मनपा शाळेतील गरजू विद्यार्थींना 50 सायकल वाटप, स्थायी व फिरते सुसज्ज आधुनिक स्वच्छतागृह उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच महिलांना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. प्राजक्ता कोळपकर यांनी सूत्रसंचालन केले.
व्हिएस न्यूज -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये मिसळ खात असणाऱ्या तरुणाला खेचत बाहेर काढून त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रशांत भालेकर असे आहे. प्रशांत हा त्याच्या काही मित्रांबरोबर विकास नगर किवळे परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये मिसळ खात बसला होता. त्याचवेळी आरोपी रोहित ओव्हाळ, डॅनी तांदळे आपल्या अन्य दोन साथीदारांसहीत हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी रोहित आणि त्याच्या मित्राला खुर्चीसहीत हॉटेलबाहेर खेचत आणलं. बाहेर या चौघांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर एकाने प्रशांतवर तलवारीने वार केले. त्यानंतर बराच वेळ या चौघांनी दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केलं. हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.
हा सर्व धक्कादायक प्रकार हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झाला आहे. या सीसीटिव्ही फुटेज आधारे पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये चारही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहित, डॉनीबरोबर रोण्या फजगे आणि आदित्य कोटगी या दोन जणांचा समावेश आहे.
हल्लेखोरांना आर्म अॅक्ट आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002