व्हीएस न्यूज – चिखलीतील राहुलदादा जाधव स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. परंतु यंदा प्रथमच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना समाजभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कारास उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, माझे एकनिष्ठ कार्यकर्ते राहुल जाधव यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे या पुरस्काराची शोभा वाढली आहे.
महेश लांडगे यांना पुरस्कार प्रदान करताना नगरसेवक राहुल जाधव म्हणाले की आतापर्यंत नेहमीच आमदारांनी समाविष्ट गावांबाबत विकासात्मक पुढाकार घेऊन गावांचा विकास केला तसेच महापालिकेत मानाचे पानही दिले आहे. यामुळेच समाजभूषण या पुरस्काराचे ते मानकरी म्हणून सार्थ ठरतात. कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारिका बोराडे, भिमाबाई फुगे, नगरसेवक सागर गवळी, माजी नगरसेवक शांताराम भालेकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चिखलीच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक राहुल जाधव यांनी दिली.
व्हीएस न्यूज – मोशीमध्ये “पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन ऍण्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे होत असलेल्या “सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात मोशीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विरोध डावलून फेस्टिव्हल घेण्याचा प्रयत्न केल्यास तो उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला.
“सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात चिंबळी, मोई, कुरुळी आणि केळगाव या गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत सनबर्नच्या विरोधात ठराव पारित केला आहे. शहरातील अनेक सामाजिक संघटनांचा त्यास विरोध आहे. हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) करण्यात आलेल्या या आंदोलनात वारकरी सांप्रदायासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सरपंच,तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजप नगरसेवक वसंत बोराटे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर,धनंजय आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे, बजरंग दलाचे प्रखंड मंत्री अर्जुन बोऱ्हाडे, बजरंग दल संयोजक अनिकेत सस्ते, माहिती सेवा समिती चंद्रकांत वारघडे, कुरुळी गाव सरपंच चंद्रकांत बधाले, शाम महाराज राठोड,शिवसेना उपविभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, शिवाजी महाराज नवले, मंगला कांबळे, नारीशक्ती समितीच्या संध्या हिरामण बुर्डे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी भारगरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गणेश भुजबळ, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे प्रवीण नाईक आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
हिंदुत्व जनजागृती समितीचे पराग गोखले म्हणाले की, सरकारने येत्या 15 दिवसांत “सनबर्न’विषयी भूमिका जाहीर करावी. संतांचा वारसा असलेल्या भूमीत युवा पिढीला व्यसनाधीन बनवणाऱ्या “सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रखर विरोध राहील. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या युवाशक्तीचे संवर्धन करत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र शासन“सनबर्न’च्या माध्यमातून युवाशक्तीचे पतन करणाऱ्या उपक्रमाला प्रोत्साहन देत आहे. हे एकप्रकारे पंतप्रधानांच्या धोरणांनाच काळीमा फासल्यासारखे आहे. याविरोधात व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
व्हीएस न्यूज – स्वच्छ भारत अभियान, गांधी जयंती यांसारख्या निमित्ताने संपूर्ण शहरात महापालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. परंतु, शहराचा औद्योगिक परिसर मात्र स्वच्छ भारत अभियानापासून वंचित ठेवण्यात येतो. औद्योगिक परिसराच्या स्वच्छतेकडे महापालिका जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे, असा आरोप पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केला आहे.
औद्योगिक परिसरात कचरापेट्यांची संख्या कमी आहे. तसेच ज्या ठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत, तेथील कचरा देखील नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे औद्योगिक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंगू,मलेरिया, स्वाईन फ्लू यांसारखे आजार पसरण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेकडून मागील काही वर्षांपासून कचरापेट्या वाढविण्यासाठी व वेळेवर कचरा उचलण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी औद्योगिक भागातील कचरा वेळच्यावेळी उचलण्यासाठी घंटागाडी सुरु करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. आरोग्य विभागाकडून हा विषय बारगळला असल्याने संघटनेकडून विद्यमान आयुक्तांसमोर हा विषय मांडला. आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना त्याबाबत सांगितले असता अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगत याबाबत उदासीनता दाखविण्यात आली आहे.
एमआयडीसी पेठ नंबर 7 आणि 10 पीसीएनटीडीए भोसरी या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठले असून पेठ नंबर 10 मधील प्लॉट नं. 30/31 च्या मागील अग्निशमन केंद्रासाठी राखून ठेवलेला भूखंड तर डम्पिंग ग्राउंड झाला आहे. सर्व औद्योगिक परिसरातील कचरा तातडीने उचलून पेठ नंबर 10 मधील डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करावे. अन्यथा लघुउद्योग संघटनेतर्फे महापालिकेच्या कार्यालयात कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी महापालिकेला दिला आहे.
व्हीएस न्यूज – पंचगव्य हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सर्वच गोष्टींत पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले पाहिजे, असे प्रतिपादन लायन्स क्लब जिल्हा उपप्रांतपाल रमेश शहा यांनी प्राधिकरण येथे केले.
निगडीतील पिंपरी-चिंचवड जल शुद्धिकरण केंद्राजवळील विनामूल्य पंचगव्य चिकित्सा शिबिराचे उद्घाटन रमेश शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, विभागीय अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, आनंद गायकवाड, सुधाकर कुमठेकर, विजय आगरवाल, उज्ज्वला कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गोवर्धन अनुसंधान केंद्राचे संचालक विलास शिनगारे यांनी चित्रफितींच्या सहाय्याने पंचगव्य चिकित्सेची माहिती देताना सांगितले की, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या पंचतत्त्वांनी मानवी शरीर बनलेले आहे. देशी गायीपासून जे दूध,तूप, ताक, शेण, मूत्र मिळते त्याच्या एकत्रिकरणातून पंचगव्य तयार होते. अथर्ववेदात नमूद केल्यानुसार पंचगव्य हे परम पवित्र रसायन असून मानवी शरीरात असलेल्या कफ-वात-पित्त या त्रिदोषांच्या असंतुलनातून उत्पन्न होणाऱ्या विविध व्याधींचे निराकरण करण्याची क्षमता पंचगव्यात आहे. पंचगव्य चिकित्सेमुळे स्थूल, सूक्ष्म शरीर आणि आत्मा यातील विकृती दूर करता येतात. देशी गायीपासूनच पंचगव्य मिळत असल्याने देशी गाय ही भारतीय संस्कृतीची केंद्रबिंदू आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राला असाध्य असलेले अनेक रोग समूळ नष्ट करण्याची शक्ती फक्त पंचगव्यात असल्याने भारतीयांनी आता पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे वळले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या संयोजनात प्रवीण लडकत, वनिता लकडे, लायन्स क्लब ऑफ रहाटणी, लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम,लायन्स क्लब ऑफ पिंपरी गोल्ड आणि लायन्स क्लब ऑफ तळवडे यांनी सहकार्य केले. लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे अध्यक्ष संजय लकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) आंतर महाविद्यालय बुध्दीबळ स्पर्धेत सलग तिस-या वर्षी सांघिक विजेतेपद पटकावून हॅक्ट्रीक केली. पुणे जिल्हा क्रीडा विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने लोणिकंद येथील श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघाने सर्वाधिक 28 गुण मिळवून विजय मिळविला. तसेच वैयक्तिक श्रेणीत पीसीसीओईचाच खेळाडू नितीन बदोनी याने 8 गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळविला. तसेच त्याची पुढिल आंतरविभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या संघात निवड झाली.
सांघिक श्रेणीमध्ये पुणे जिल्ह्यातील 48 महाविद्यालयांच्या संघांनी व वैयक्तिक श्रेणीमध्ये 190 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विजयी संघातील खेळाडू सौरभ बेदमुथा, नितीन बदोनी, श्रेयस गायकवाड, संकेत तांबट, प्रमोद थोरात व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
व्हीएस न्यूज – शहरातील रस्ते, गटर्स साफसफाईच्या कामासाठी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांना पुर्वीप्रमाणे प्राधान्याने कामाचे वाटप करावे तसचे मुंबई, दिल्लीच्या ठराविक ठेकेदारांना डोळयासमोर ठेवून काढलेली निविदा रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहर स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे यांनी याबाबत विधीमंडळ गटनेते अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,शहरातील रस्ते, गटर्स यांच्या दैनंदिन साफसफाईचे काम गेल्या 15 वर्षापासून स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांमार्फत सुरू होते. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यातच स्वंयरोजगार सहकारी संस्थांना बाहेर काढण्यासाठी जाचक नियम, अटी लादून निविदेत सहभाग नोदवता येणार नाही, यासाठी षडयंत्र रचण्यात आले. भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्तेच्या जोरावर प्रशासनाला हाताशी धरून सुडबुद्धीचे राजकारण केले जात आहे.
रोजगारापासून वंचित करण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. भाजप पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक वागणुकीपासून स्वयंरोजगार सेवा संस्थांची सुटका करावी, असे झोंबाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाच्या पिंपरी चिंचवड आगारातर्फे 13 ऑक्टोबरपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता यातील बहुतांशी गाड्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून सुटणार आहेत.
दिवाळीनिमित्त एसटीच्या वल्लभनगर येथील बसस्थानकाबरोबरच प्रवाशांचा वाढता ओघ आणि प्रतिसाद पाहता भक्ती-शक्ती चौकातूनही या जादा गाड्या सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. 13 ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 16, 17, 18 व 19 ऑक्टोबर या दिवाळी सणाच्या मुख्य दिवसासाठी दररोज दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत ही प्रवाशी सेवा सुरू राहणार आहे.
या जादा गाड्या बीड, चिपळूण, खेड, कोल्हापूर, लातूर, उमरगा, सांगली, नाशिक आदी मार्गावर धावणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील गर्दी टाळण्यासाठी बाह्यवळणमार्गे या गाड्या रवाना होणार आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार अधिक जादा गाड्या देखील उपलब्ध करून देण्यात येणार असून या गाड्यांचे ऑनलाईन आरक्षण पिंपरी-चिंचवड बसस्थानक, तसेच शहरातील एसटीच्या विविध अधिकृत आरक्षण केंद्रावर सुरू आहे. एसटी महामंडळाच्या रिझर्वेशन ऍपवरही ही सुवधिा उपलब्ध असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज – मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीची वाट धरली आहे. “ऑक्टोबर हीट’चा अनुभव पिंपरी-चिंचवडमधील नागरिक घेत असताना शहरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
शहरात ढगाळ वातावरण असून, आज (शनिवारी) दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. शहरात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरात ऑक्टोबर हीटचे वातावरण असल्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. परंतु पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील दोन-तीन दिवस शहराच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
व्हीएस न्यूज – सांगवी ते किंवळे आणि वाकड ते नाशिक फाटा बीआरटी रस्त्यावरील बसथांब्यांवर नियुक्त खासगी सुरक्षारक्षकांनी तीनमहिन्यांचे रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी पिंपरीत गुरूवारपासून उपोषण सुरू केले होते. मात्र, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना करून सुरक्षा रक्षकांचे एक महिन्याचे वेतन दिले. तसेच, उर्वरित दोन महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे सुरक्षारक्षकांनी आंदोलन मागे घेतले.
या सुरक्षार क्षकांना सावळे यांच्या हस्ते वेतनाचे धनादेश वाटप करण्यात आले. सांगवी ते किवळे आणि वाकड ते नाशिक फाटा हे दोन बीआरटी रस्ते सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेने विकसित केलेल्या या दोन रस्त्यांवर पीएमपीमार्फत बससंचलन केले जाते. दोन्ही बीआरटी रस्त्यांवरील बसथांब्यांच्या सुरक्षेचे काम पीएमपीने मुंबईतील शुभम एचपी सिक्युरिटी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला दिले आहे.
या ठेकेदाराने बसथांब्यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, या सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. तसेच,कायद्यानुसार त्यांच्या “पीएफ’ची रक्कमची जमा केली जात नाही. यावेळी रिपब्लिकन वाहतूक आघाडीचे अजिज शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगर तेली समाज वधू-वर मेळावा समितीतर्फे राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा दि.४ नोव्हेंबरला कै. उखर्डू लोढू चौधरी (बागुल, कुसुंबेकर) नगर, आहेर गार्डन, वाल्हेकर वाडी, चिंचवड, पुणे येथे होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक विभाग तेली समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष श्यामकांत ईशी यांनी केले आहे..
यासाठी वधू-वरांनी दि.२०ऑक्टोबरपूर्वी अर्ज भरुन पाठवावेत. यासाठी श्यामकांत ईशी शिरपूर, गोपाळ चौधरी धुळे, नयन चौधरी नंदुरबार, नरेंद्र चौधरी अमळनेर,वामनराव चौधरी पारोळा, दीपक चौधरी शिंदखेडा, प्रा. उमेश चौधरी शिंदखेडा, ज्ञानेश्वर चौधरी जळगाव, ईश्वर चौधरी शिरपूर, भाऊसाहेब चौधरी धुळे, राजेंद्र चौधरी शिरपूर,महेश चौधरी, दुर्गेश चौधरी, आशिष चौधरी, प्रकाश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष श्यामकांत ईशी, मेळावा संयोजन समिती अध्यक्ष विश्वनाथ चौधरी, अशोक जिरापुरे, गंगाधर हाडके, सुभाष चौधरी, पी. टी. चौधरी, निंबा चौधरी, दिलीप चौधरी, पी. टी. चौधरी, संयोजक दिलीप चौधरी यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज – जगदगुरु महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांची जोपासना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जगदगुरु महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
महर्षी वाल्मिकी चौक, अशोकनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, नगरसदस्य शितल ऊर्फ विजय शिंदे, संदिप वाघेरे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, निकीता कदम, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बैद, माजी नगरसदस्य अरुण टांक, छाया साबळे, अस्पायर नॉलेज ऍण्ड स्कूलचे संस्थापक संजय गांधी, अखिल वाल्मिकी समाज महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष सोनाथ बैद, अखिल वाल्मिकी समाज, पिंपरीचे अध्यक्ष राजु परदेसी, उपाध्यक्ष ग्यानचंद बेद, दिलीप मोटा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दयानंद सोनटक्के उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी शिक्षित झाले पाहिजे. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाच्या माध्यमातुन समाज जागृती केली. समाजाच्या उन्नतीसाठी महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरीने मदत केली जाईल, असे ही ते म्हणाले.
यावेळी कवीराज संघेलिया, गणेश क्षिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार महापौर नितीन काळजे व महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बैद यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक राजेश बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी तर आभार किशोर केदारी यांनी मानले.
व्ही एस न्युज:श्रुती प्रसन्न धारणे (वय 32, रा. प्रतिकनगर तळेगाव), असे मयत महिलेचे नाव आहे. श्रुती या आंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात लिपीक म्हणून कामाला होत्या. त्यांचे पती कामानिमित्त दोन दिवसांपासून बाहेर गावी गेले होते. ते आज सकाळी घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी घराच्या गॅलरीतील काच फोडून घरात प्रवेश केला असता प्रकार उघडकीस आला. श्रुती यांना मुलबाळ नव्हते तसेच घराचे हप्ते फेडणे अशा घरगुती गोष्टीचा तणावातून गळफास घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002