व्हीएस न्यूज– मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीची वाट धरली आहे. “ऑक्टोबर हीट’चा अनुभव पिंपरी-चिंचवडमधील नागरिक घेत असताना शहरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
शहरात ढगाळ वातावरण असून, आज (शनिवारी) दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. शहरात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरात ऑक्टोबर हीटचे वातावरण असल्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. परंतु पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील दोन-तीन दिवस शहराच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.