व्हीएस न्यूज - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एक ते दीड गुंठ्यातील बांधकामांना चार ते पाच लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित केल्यास या दंडाच्या रकमेपोटी पालिकेला दीड ते दोन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्यांना दिलासा देणारा नसून, त्यातून शहरातील सर्वसामान्य गरीब माणसाची लूट होणार असल्याचा, गंभीर आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. बांधकाम व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अटीमध्ये अनधिकृत मिळकत धारकांना शास्तीकर पूर्णतः भरावा लागणार असून त्या नंतरच अनधिकृत बांधकाम धारकांचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे 500 कोटी पेक्षा जास्त रक्कम महापालिका शास्तीकारापोटी गरीब नागरिकांकडून वसूल करणार आहे. आजपर्यंत एकही नागरिकांनी या निर्णयाद्वारे बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज केला नाही. शहरामध्ये हजारो अनधिकृत बांधकामे असूनही पन्नास पेक्षा जास्त नागरिकांनी साधी विचारपूस महापालिकेच्या कक्षाकडे केली नसल्याचे, बारणे म्हणाले. त्यामुळे अनधिकृत बांधकाम निर्णयाचे श्रेय घेणा-यांनी प्रथम शास्तीकार पूर्ण माफ करून द्यावा व दंडाची आकारण्यात आलेली रक्कम कमी करण्यात यावी.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सर्वसामान्य नागरिकांना कमी किमतीमध्ये घरे उपलब्ध करून दिली असती तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली नसती. प्राधिकरणाने सर्वसामान्य शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत घेऊन धनिकांना विकल्या व सर्वसामान्य नागरिकांना वा-यावर सोडले. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न जटील झाला. याला पूर्णतःहा शासनच जबाबदार असून आत्ता राज्य शासन अनधिकृत बांधकाम धारकांकडून शास्तीकाराच्या नावाने जुलमी दंड वसुली करत असून हा भुर्दंड अन्यायकारक असल्याचे, बारणे यांनी निवेदनात म्हटले म्हणाले.
प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत मिळकत धारकांना चालू बाजार भावाने विकास शुल्क व दंड भरावा लागणार असल्याने एक एक मिळकतीला लाखोच्या घरात पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाचे बळी अनेक नागरिक ठरणार आहे. आजपर्यंत एकाही अनधिकृत मिळकत धारकाने अर्ज दाखल केला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे या पुढे किती बांधकामे नियमित होतील तो काळच ठरवेल. परंतु राज्य शासनाचा अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा निर्णय हा सर्व सामान्य माणसाला परवडणार नसून गरीब नागरिकांकडून कोट्यावधी रुपये उकळण्याचा हा निर्णय आहे, असा आरोपही खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज – पोलीस मित्र संघ पिंपरी-चिंचवड शहर विभागाच्या वतीने समन्वय कुटुंब सल्ला केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक राहुल जाधव, अश्विनी जाधव, संतोष काळे, सुधीर सोनवणे, डॉ. चंदन दिघावकर, मनिषा कदम, महेश दादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव, सुनील कड, रवींद्र देवरे, राजश्री जायभाय विजय कोटगोंड आदी उपस्थित होते. या केंद्राव्दारे वैवाहिक समस्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, मालमत्ता विषयक फसवणूक, विद्यार्थ्यांचे वर्तन, अभ्यास, करिअर विषयक समस्या आदींबाबत समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येईल.
व्हीएस न्यूज – बालचमूंसाठी विविध उपक्रम घेत पिंपरी-चिंचवड शहरात भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व नेहरुनगर येथील त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर शैलजा मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नगरसेविका अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, उद्यान विभागाचे जोपा पवार, संजय शिंदे, विद्युत विभागाचे रामदास कटके, सुखदेव जाधव, राजेंद्र कुंभार आदींनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यासही उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसदस्य राहुल भोसले,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सहाय्यक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक रमेश भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, प्रवीण बगलाने, उद्यान विभागाचे जोपा पवार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, माऊली इंगळे, सोन्याबापू तरटे, संजय धाडगे आदी उपस्थित होते.
काळेवाडीत बालचमूंचा फॅशन शो…
शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालय काळेवाडी येथे पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून बाल दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर उपस्थित होते. यानिमित्त बालचमूंच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालचमूंनी संत, राष्ट्रपुरुष यांच्यासह फुलपाखरु, परी, मिस इंडिया, शेतकरी अशा विविध वेषभूषा सादर करत उपस्थितांची कौतुकाची थाप मिळवली.
विद्यानंद शाळेत बालजत्रा…
निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये बाल दिनानिमित्त आयोजित केलेल्या बालजत्रेचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. जत्रेचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे कार्यकारी संचालक डॉ. जे. जी. पाटील, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अरुणा अंथोनी आदी उपस्थित होते. यावेळी एकपात्री कलाकार अवधूत कुलकर्णी व साहेबराव जाधव यांनी हास्ययोगाचे महत्त्व ही दोन पात्री लघुनाटीका सादर केली. पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाळणा, मिकी माउस अशी खेळणी व गंमतीदार खेळ होते. तसेच खाद्य पदार्थांचे 16 स्टॉल लावले होते. माध्यमिक शाळेत बॉल उचलणे, पाण्याने भरलेल्या बादलीत नाणेफेक,चॉकलेट चक्र असे गमतीशीर खेळ होते. सुमारे साडेचारशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आता महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. दररोज मिळणारे उत्पन्न अल्पमुदत ठेवींच्या (फिक्स डिपॉझिट) स्वरुपात विविध बॅंकांमध्ये ठेवल्याने त्यातून महापालिकेला 50 कोटी 11 लाख रुपये मिळाले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी महापालिका दररोज मिळणारे उत्पन्न चालू खात्यात जमा करत होते. हे पैसे खात्यांमध्ये निष्क्रिय पडून असायचे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी महापालिकेच्या चालू खात्यातील रक्कम अल्प मुदतठेवींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी महापालिकेच्या दररोजच्या उत्पन्नावर दर महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी लगेच खर्च होत नसल्यामुळे तो विविध बॅंकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातो.
महापालिका बॅंकांमध्ये ठेवत असलेल्या मुदत ठेवींमुळे वर्षाला 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 व्याज मिळत होते. मात्र महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने दररोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात विविध बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयाला पाठबळ दिले. दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्यामध्ये जमा करत असल्याने त्याचा महापालिकेला फायदा होण्याऐवजी संबंधित बॅंकांचा आर्थिक फायदा होत होता. त्यामुळे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला. त्यानुसार महापालिकेच्या चालू खात्यांमधील जमा रक्कम अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात बॅंकांमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विविध बॅंकांकडून ठेवींवर किती व्याजदर देणार याची माहिती मागविली होती. त्यातील जास्तीत जास्त व्याजदर देणाऱ्या बॅंकांमध्ये अल्पमुदतीच्या ठेवी ठेवण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला अल्पमुदत ठेवींच्या माध्यमातून एकूण 50 कोटी 11 लाख 88 हजार 132 रुपये व्याज मिळाले आहे. आजमितीला महापालिकेने विविध बॅंकांमध्ये एकूण 2 हजार 957 कोटी 92 लाख 81 हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवले आहे. त्याच्या माध्यमातून 205 कोटी 83 लाख 13 हजार 727 रुपये महापालिकेला मिळले आहे.
व्हीएस न्यूज – मुलांना विचारी बनवा, हट्ट लगेच पुरवू नका, निर्णयक्षम बनवा, मुलांना वैचारिक अपंग बनवू नका, असा कानमंत्र लेखक मनोज अंबिके यांनी चिंचवड येथे दिला. साहित्य दर्शनच्या वतीने आयोजित केलेल्या वाचक महोत्सवात कानमंत्र – आई बाबांसाठी या विषयावर ते बोलत होते. यावेळी साहित्य दर्शनचे संचालक गणेश लोंढे, रवींद्र कासार आदी उपस्थित होते.
मनोज अंबिके पुढे म्हणाले की, वाढत्या वयात मुलांवर जबाबदारी टाकल्यास त्यांच्यात निर्णय क्षमता येते. त्यासाठी त्यांचे प्रेरणा स्थान बना. मुले जसजसे मोठे होतात तसे ते नियंत्रणाबाहेर जातात. मुलांना त्यांचे मत मांडू द्या. त्यांच्या भावनेचा आदर करावा. त्यांच्यातील आत्मविश्वास दाबू नका. लहानपणी वडील मुलांचे लाड केल्याने ते आवडतात. नंतर त्यांच्यातील बाप बदलत जातो. मग वडिलांना हिटलरचा शिक्का बसतो. याला कारणीभूत वडिलच असतात. मुलांना काय बोलता यापेक्षा कसे बोलता हे महत्त्वाचे आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. मुलांना लक्ष्मी टिकविण्यासाठी सरस्वतीची साधना करायला शिकवा. म्हणजेच ज्ञानी व विचारवंत बनवा. जेणेकरून ते वैचारीक अपंग होणार नाहीत, असे त्यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गंधालीकर यांनी केले. तर आभार गणेश लोंढे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - भोसरी येथील फुलेनगरमध्ये एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.
श्रीदेवी शरणाप्पा पाटोळे (वय-17, रा. फुलेनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रादेवी ही अकरावीमध्ये शिकत होती. काल रात्री तिने घऱातील स्वयंपाक घरात स्कार्फच्या सहायाने गळफास घेतला. आज सकाळी आईने स्वयंपाक घराचा दरवाजा ठोठावला परंतु आतुन काहीच प्रतीसाद मिळाला नाही. त्यामुळे तिच्या आई-वडीलांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज – कार व रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा सोमवारी (दि.13) सकाळी सहा वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 1 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता म्हाळुंगे येथे घडला. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
गोरख महादु कानगुडे (वय 40 रा. म्हाळुगे ता. मुळशी) असे या रिक्षाचालकाने नाव आहे. याप्रकरणी संतोष खांडेकर (वय 27 रा केमसेवस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगुडे हे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने रिक्षा चालवत असताना समोरुन येणा-या कारला त्याची रिक्षा धडकली. यामध्ये कानगुडे गंभीर जखमी झाले. त्यांना तताडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
व्हीएस न्यूज - कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली. सचिन अशोक गायकवाड (वय 35 रा. बौद्धनगर पिंपरी) असे या मजुराचे नाव आहे. हा एका मंडप व्यवसायिकाकडे मजूर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये एक घऱगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना सचिन यांच्या हातातील लोखंडी पाईप सोसायटीमधील विजेच्या ट्रान्सफार्मरला लागला. लोखंडी पाईप असल्याने सचिन याला विजेचा जोरदार धक्का बसला. सचिनला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
व्हीएस न्यूज – महापालिकेतर्फे विकास कामांमध्ये सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. अलिकडच्या काळात बहुतेक विकास कामांमध्ये सल्लागार नेमण्याची पद्धत निर्माण झाली आहे. सल्लागाराकडून कामे न होणे व काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरुन या सल्लागार संस्थांनी कामे केल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासनाकडे प्रत्येक विभागातील सक्षम व तज्ज्ञ अधिकारी असताना अशा प्रकारे सल्लागार नेमणूक कशासाठी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हडिकर यांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाला सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्यास प्रशासनाने शासनाला कळवले पाहिजे.“सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आता चौथा सल्लागार नेमला आहे. पहिल्या तीन सल्लागारांनी काय केले, याचा आयुक्तांनी खुलासा करावा. सर्व्हे करण्यासाठी एक सल्लागार, कामासाठी वेगळा सल्लागार, तर आयुक्त व अधिकारी यांचे पालिकेत काम काय? याचे स्पष्टीकरण द्यावे. झोपडपट्टी निर्मूलन व पुन: विकास, पंतप्रधान आवास योजना व इतर कामे सल्लागार करीत असतील, तर प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बिनकामाचा पगार दिला जातोय का? सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाच्या उधळपट्टीला जबाबदार कोण? आणि का?असे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
…अन्यथा आंदोलन छेडणार!
झोपडपट्टी निर्मूलन, पुन: विकास योजना व पंतप्रधान आवास योजनेबाबत शहरवासीयांत अद्याप संभ्रम आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे दोन ठिकाणच्या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध नाही. झोपडपट्टीतील नागरिकांना व भाडेकरुंना सत्ताधाऱ्यांनी आगामी लोकसभा- 2019 निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भूलथापा देणे सुरू केले आहे. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर रद्द करणे, रिंग रोड बाधितांचा प्रश्न मार्गी लावणे, या ऐवजी महापालिका सल्लागार नेमण्यावर भर देत आहे. आयुक्तांनी याकडे कानाडोळा करू नये व नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पांडुरंग परचंडराव यांनी दिला.
व्हीएस न्यूज - थेरगाव येथील सोळा नंबर बस थांब्याजवळील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.13) सकाळी ऑईल सांडल्याने दुचाकी घसरुन पडू लागल्या. याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासाच्या परिश्रमानंतर हा रस्ता धुवून साफ केला. त्यानंतर या रस्त्यावरुन वाहतूक पुर्ववत सुरु झाली.
डांगे चौक मार्गे जगताप डेअरी, औंध तर औंधकडून डांगे चौक, वाकड, चिंचवडकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता सोळा नंबर बस थांब्याजवळ भुयारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या पुलावर सोमवारी पहाटे एका वाहनातून सुमारे किलोमीटर अंतरावर ऑईलची गळती झाली होती. त्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरुन पडत होती. याची माहिती मिळताच महापालिकेच्या रहाटणी अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर या उड्डाणपुलावर सांडलेले ऑइल धुवून काढले. सकाळी सात ते आठ असे सुमारे एक तास हे काम सुरु होते. सांडलेले सर्व ऑईल धुवून काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. रहाटणी अग्निशमन दलाच्या भगवान यमगर, नामदेव वाघे, जयराम कदम, शाहू वनमाने आणि मारुती गुजर यांनी हे ऑईल धुवून घेतले.
व्हीएस न्यूज - महिला सहकारी कर्मचाऱ्याशी अश्लील बोलून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी, तसेच वाहतूक शाखेच्या प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहून त्याबाबत अधिकाऱ्यांना बेजबाबदार आणि बेशिस्तपणे उत्तर देणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
संपत ज्ञानदेव नागरगोजे असे निलंबनाची कारवाई झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. करण्यात आलेले आहे. काही कारणास्तव पुण्यातून 15 दिवसांपूर्वी चिंचवड वाहतूक शाखेत करण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात नागरगोजे याच्या विरोधात त्याच्या सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे अर्ज करून महिला पोलिसाकडे वाईट नजरेने पाहून, अश्लील बोलून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. तसेच शिवाजीनगर मुख्यालयात वाहतूक कवायत आणि वाहतूक नियमनाबाबतचे महत्त्वाचे प्रशिक्षण आयोजित केले होते.
यासाठी चिंचवड विभागाने नागरगोजे यांची निवड केली होती. मात्र, ते प्रशिक्षणास उपस्थित झाले नाहीत. या प्रकरणाची प्राथमिक आणि विभागीय चौकशी करण्यात आली. प्रशिक्षणास उपस्थित नसल्याबद्दल नागरगोजे यांना वरिष्ठांनी विचारणा केली असता त्यांनी बेजाबदार आणि बेशिस्त उत्तरे दिली. हा प्रकार पोलीस खात्याच्या शिस्तीत बसत नाही, असा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002