व्हीएस न्यूज - कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली. सचिन अशोक गायकवाड (वय 35 रा. बौद्धनगर पिंपरी) असे या मजुराचे नाव आहे. हा एका मंडप व्यवसायिकाकडे मजूर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये एक घऱगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना सचिन यांच्या हातातील लोखंडी पाईप सोसायटीमधील विजेच्या ट्रान्सफार्मरला लागला. लोखंडी पाईप असल्याने सचिन याला विजेचा जोरदार धक्का बसला. सचिनला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.