व्हीएस न्यूज - भोसरीतील गिरीजा लांडगे या ८ वर्षाच्या चिमुकलीने लिंगाणा कडा सर केलाय. हा पराक्रम करणारी ती राज्यातील पहिलीच कमी वयाची मुलगी ठरली आहे. तिच्या या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
भोसरी येथे राहणार्या धनाजी लांडगे यांना ट्रेकिंगची आवड आहे. वडीलांची हिच आवड पाहून गिरीजाने आजवर जवळपास २० किल्ले सर केलेत. गेल्या वर्षी तिच्या वडीलांनी ट्रेकर्स मंडळींना आव्हानात्मक असणारा लिंगाणा कडा सर केला होता. त्यांचा तो व्हिडीओ पाहून गिरीजाने आपणही लिंगाणा कडा सर करू असा हट्ट धरला होता. त्यानुसार घरच्या मंडळींनी देखील तिचा तो हट्ट पूर्ण करण्यास संमती दिली. आणि या अवघ्या ८ वर्षाच्या चिमुरडीने हा कडा सर देखील केला. रायगड, राजगड आणि तोरणा किल्याच्या मध्यभागी असलेला हा लिंगाणा कडा तब्बल तीन हजार फूट उंच आहे. हा कडा सर केल्यानंतर गिरीजाने तेथे ‘लेक वाचवा’ हा संदेश दिला आणि शपथ ही घेतली. हे करताना तिला दडपण होत पण धाडसाने कडा सर केल्यानंतर तिला प्रचंड आनंद झालाय. आता तिने सातारा जवळ असलेला वासोटा किल्ला ट्रेक करण्याचा निश्चय केलाय.