व्हीएस न्यूज - थेरगाव येथील सोळा नंबर बस थांब्याजवळील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.13) सकाळी ऑईल सांडल्याने दुचाकी घसरुन पडू लागल्या. याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासाच्या परिश्रमानंतर हा रस्ता धुवून साफ केला. त्यानंतर या रस्त्यावरुन वाहतूक पुर्ववत सुरु झाली.
डांगे चौक मार्गे जगताप डेअरी, औंध तर औंधकडून डांगे चौक, वाकड, चिंचवडकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता सोळा नंबर बस थांब्याजवळ भुयारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या पुलावर सोमवारी पहाटे एका वाहनातून सुमारे किलोमीटर अंतरावर ऑईलची गळती झाली होती. त्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरुन पडत होती. याची माहिती मिळताच महापालिकेच्या रहाटणी अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर या उड्डाणपुलावर सांडलेले ऑइल धुवून काढले. सकाळी सात ते आठ असे सुमारे एक तास हे काम सुरु होते. सांडलेले सर्व ऑईल धुवून काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. रहाटणी अग्निशमन दलाच्या भगवान यमगर, नामदेव वाघे, जयराम कदम, शाहू वनमाने आणि मारुती गुजर यांनी हे ऑईल धुवून घेतले.