व्हीएस न्यूज – स्वच्छता हे परमेश्वरी तत्त्व असल्याने त्याचा सर्व अन्न व्यावसायिकांनी अवलंब करत आपला व्यवसाय वाढवा, असे आवाहन अन्न व औषध मंत्री गिरीष बापट यांनी केले.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अन्न व्यावसायिकांची एक दिवसाची अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेला महपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, अन्न प्रक्रीया समिती सदस्य आनंद चोरडीया, पिंपरी चिंचवड हॉटेल रेस्टॉरण्ट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे सहाय्यक आयुक्त सं. भा. नारागुडे, अ. गो. भुजबळ, सं. पां. शिंदे व शहरातील व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पल्लवी दराडे यांनी ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल व रेस्टॉरण्टमध्ये व्यावसायिकांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्ट्रीट व्हेंडर व हॉटेल, रेस्टॉरण्ट अशा अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अन्न पदार्थाच्या दर्जासोबतच स्वच्छतेस प्राधान्य देण्याची सूचना करत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त संपत देशमुख यांनी अन्न सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेदरम्यान गिरीष बापट यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी प्रस्ताविक केले. संतोष सावंत यांनी सुत्रसंचालन केले.
आयुक्त हर्डीकर यांची माहिती, स्वीडनचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात पालिकेला भेट देणार
व्हीएस न्यूज – प्रदुषणविरहीत सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन घनकचरा संकलन व त्याचे विघटन व्यवस्थापन करण्यासाठी स्वीडनची राजधानी स्टॉकहोल्ममध्ये राबवलेली संकल्पना पिंपरी-चिंचवडमध्ये राबवता येऊ शकते. त्यासाठी नेमके काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी स्वीडन येथील शिष्ठमंडळ पुढील महिन्यात पिंपरी-चिंचवडला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान स्वीडन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील करार करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
आयुक्त हर्डीकर मागील आठवड्यात स्वीडन देशातील स्टॉकहोल्म शहरात स्मार्ट सिटीविषयक परिषदेसाठी केले होते. या दौऱ्यावरून पतल्यानंतर त्यांनी सोमवारी (दि. 27) पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, आयुक्त हर्डीकर म्हणाले की, स्वीडन येथील स्टॉकहोल्ममध्ये एकंदरीत ग्रीन सिटी तयार करण्यावर भर दिला आहे. पर्यटन स्थळे विकसित करण्यात आली आहेत. 4 हजार 500 हेक्टर भूखंडावर गार्डन वजा फॉरेस्ट तयार केले आहे. स्मार्ट सिटी साकारण्यासाठी स्वीडन सरकारचा इंधनविरहित मोटारींचे उत्पन्न करण्यावर संशोधन सुरू आहे. प्रदुषण रोखण्यासाठी सायकल चालविणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर संशोधन चालू आहे. इलेक्ट्रीक बसेस सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. प्रत्येक गोष्टीतून वीज वाचविण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.
घनकचरा सुका, ओला आणि मिक्स अशा तीन वेगवेगळ्या स्वरुपात संकलीत केला जातो. दैनंदीन संकलीत कचरा मोठ्या कंटेनरमध्ये भरला जातो. कंटेनरची रचना अत्याधुनिक पध्दतीची आहे. त्यामधून कचऱ्याची दुर्गंधी बाहेर येत नाही. कचरा डेपोमध्ये वेगवेगळ्या कचऱ्यातील टाकाऊ परंतु वापरण्यायोग्य वस्तुंचा संचय करून त्यापासून कचरा डेपोची रचना केली आहे. ग्रीन बॉण्ड सरोवर केले आहेत. नदी पात्रालगत हिरवळ विकसित केली आहे. मॅक्स स्केपींग तयार केले आहे. याचा प्रयोग आपण स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये करू शकतो, कारण आपल्याकडे रस्ते मोठे आहेत, आणि पुरेशी जागाही उपलब्ध आहे. यासंदर्भात पाहणी करण्यासाठी स्वीडनचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात शहराला भेट देणार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्वीडन यांच्यात काही विकासकामे करण्यासाठी करार होईल, अशी माहिती हर्डीकर यांनी दिली.
नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे- आयुक्त
स्वीडन सरकार ग्रीन सिटीअंतर्गत विकास प्रकल्प राबविताना जनमताला प्राधान्य देते. नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव केल्याशिवाय कोणताही प्रकल्प मार्गी लागत नाही. तेथील नागरिकांचेही स्वीडन सरकारला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते. त्यामुळे चांगले प्रकल्प साकारले जातात. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. एखादा प्रकल्प राबविताना विरोधही केला जातो. तर, काही ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली जाते. ज्या ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळते, त्याठिकाणी चांगले प्रकल्प राबविताना अडचण निर्माण होते. याकरिता शहराच्या विकासाचे व्हीजन ठरविताना या गोष्टींचा विचार व्हायला हवा, असेही आयुक्त हर्डीकर सांगितले.
माजी आमदार दिलीप मोहिते यांचा सल्ला
व्हीएस न्यूज – आमदार महेश लांडगे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघातून खासदार होण्यापेक्षा राज्यात मंत्रीपद घेवून भोसरीसह राज्यातील लोकांची सेवा करावी, असा सल्ला खेडचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते-पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे कोणती भूमिका घेणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आमदार लांडगे यांनी वाढदिवसानिमित्त भोसरीतील गावजत्रा मैदानावर जोरदार शक्तीपदर्शन केले. यावेळी सुमारे 25हजार चाहत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार लांडगे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला खेडचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते-पाटील यांनीही आवर्जुन उपस्थिती दर्शवली. यावेळी मोहिते-पाटील बोलत होते.
दिलीप मोहिते-पाटील म्हणाले की, भोसरीकरांनी आमदार लांडगे यांचे बालपण पाहिले आहे. आता भोसरीकर दादांचे मोठपणही पाहत आहेत. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि लोकांचा हा अफाट पाठिंबा कायम ठेवण्याची जबाबदारी माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांची आहे. आमदार लांडगे खेडचे जावई आणि भाचेही आहेत. त्यामुळे केवळ भोसरीच नाही, तर लांडगे खेडचेही आमदार आहेत. त्यामुळेच आळंदी आणि खेड परिसरात भोसरीपेक्षा जास्त “फ्लेक्स’आमदार लांडगे यांचे लागले आहेत.
दरम्यान, दिलीप मोहिते-पाटील आणि आमदार लांडगे यांच्यामध्ये “गुुरु-शिष्य’ असे नाते आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी दिलेल्या गुरूमंत्राचा आमदार लांडगे गांभीर्याने विचार करणार यात तिळमात्र शंका नाही. त्यातच या कार्यक्रात मंगलदास बांदल यांच्याह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार लांडगे नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे पिंपरी-चिंचवडसह शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील नेता दिल्लीत मोठा होत नाही…
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह शिरुर परिसरात आमदार लांडगे लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. पण, माझे अनेक मित्र खासदार होवून दिल्लीत गेले आहेत. ते नेहमी सांगतात, तुम्ही विधानसभा लढवा…मंत्री व्हा, पण खासदार होवून दिल्लीत येण्याचा प्रयत्न करु नका. कारण, महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत मोठे होवू दिले जात नाही, अशी खंतही दिलीप मोहिते यांनी व्यक्त केली. तसेच, आमदार लांडगे यांनी खासदारकी न लढवता, राज्यात मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याला पहिली पसंती द्यावी. पक्षीय भेद न ठेवता आम्ही कायम त्यांच्या सोबत खंबीरपणे राहणार आहोत, असा विश्वासही मोहिते-पाटील यांनी यावेळी दिला आहे.
व्हीएस न्यूज - आई घरात नसताना पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या एका नराधमाने 14 वर्षीय मुलीची छेड काढत तिचा विनयभंग केला. हा प्रकारवाकड येथे घडला. अण्णा कांबळे (रा. वाकड), असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार आहे.
पीडितेची आई परिसरात धुणी भांडी करण्याचे काम करते. काही दिवसांपूर्वी आई कामावर गेल्यानंतर अण्णा कांबळे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरातआला व त्याने पीडितेची छेड काढली. या घटनेची पीडितेने आईला माहिती दिली. माहिती मिळताच आईने वाकड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रारदाखल केली आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्यूज - भरधाव मोटारसायकलची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला. तसेचमोटारसायकलस्वारही जखमी झाला. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावर चहोली फाटा येथे घडली. मोटारसायकल चालकावर दिघी पोलीसांनी गुन्हा दाखल केलाआहे.
शुभम संतोष जाधव (वय 24 , रा. आळंदी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रोहन घोडसे (वय 23, रा. आळंदी) याने दिघी पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश विठ्ठल साळुंखे (वय 40, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन आणि शुभम हे 26नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. चहोली फाट्याजवळ भरधाव आलेल्या साळुंखे याच्या मोटारसायकलची दुचाकीलाजोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने जाधव याचा मृत्यु झाला. तर मोटारसायकल चालक साळुंखे हासुद्धा जखमी झाला. फौजदार टोके तपासकरत आहेत.
व्हीएसन्यूज- लष्करात वाहन चालक पदावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाकडून अडीच लाखाची रोकड, शैक्षणिक कागदपत्रे घेऊन नोकरी न लावताफसवणुक केल्याचा प्रकार वाकडमध्ये उघडकीस आला आहे.
गोपाळ पाचंगे (वय 25, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत भाऊराव पाटील असे गुन्हा दाखल केलेल्याआरोपीचे नाव आहे. 10 जुलै पासून वाकड येथील पटेल गॅरेजवर हा प्रकार घडला आहे. आरोपी पाटील याने पाचंगे यांना लष्करात वाहन चालक पदावरनोकरी लावतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे आणि अडीच लाखाची रोकड घेतली. नोकरीचे नियुक्तीपत्रही पाठवले. मात्र,चौकशीत पाचंगे यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे तपास करत आहेत.
------------------
व्हीएस न्यूज - मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून पेन्शनचे काम करून देण्याच्या बहाण्याने महापालिकेतील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला एकाने तीनलाख रूपयांना गंडा घातला . हा प्रकार मुंबई-पुणे महामार्गावर पिंपरी महापालिकेसमोर घडला आहे.
याप्रकरणी, डॉ. भास्कर काळू बच्छाव (वय 67, रा. वास्तुउद्योग कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पराग संतोष डिंगणकर(वय-38, रा. शिक्षकनगर, कोथरूड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. डॉ. बच्छाव हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतून वैद्यकीय अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. 15 मार्च 2017 पासून आरोपी डिंगणकर याने डॉ. बच्छाव यांना आपली मंत्रालयात ओळख असल्याचे सांगितले. तुमचेपेन्शनचे काम करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून तीन लाख रूपये घेतले. मात्र, पेन्शनचे काम न करता डॉ. बच्छावयांच्या पैशाचा अपहार करून त्यांची फसवणुक केली. सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - तमाशा कलावंत व लोककला क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ लावणी नृत्यांगना छाया खुटेगावकर यांना देण्यात येणार आहे. लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी गायिका नंदा सातारकर यांना व कै.पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे यांनी दिली.
कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने गेली २० वर्षे हा पुरस्कार दिला जातो. शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार १५००० रुपये, डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार १०००० रुपये व बाप्पुसाहेब जिंतीकर पुरस्कार ५००० रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दुपारी १ ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रवेशिका मोफत उपलब्ध आहेत. महिलांच्यासाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आली आहे. विजयता व कल्याणी नगरकर, रेश्मा व वर्षा परितेकर, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट अशा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी येथील वॉर्ड क्रमांक २०(नेपाळी बाजार ,डेक्कन होंडा,क्रोम मॉल ) या परिसरात मध्ये कचऱ्या बाबत जनजागृती अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे 'ह ' प्रभागातील आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड,संभाजी गायकवाड ,सुखपाल जिनवाल आणि कामगार यांनी कचऱ्या संदर्भात मोरवाडी चौक ते बीफ मार्केट रेल्वे पूल पर्यंत प्रत्येक दुकानातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील कचरा म्हणजेच प्लास्टिक पिशव्या ,चहाचे कप,वेस्ट भाजी पाला व उरलेले जेवण हे रस्त्यावर आणि गटारात न टाकता डस्टबिन मध्ये जमा करावा असे प्रबोधन केले .जेणे करून रोग राईला प्रतिबंध लागेल. माहिती व प्रबोधन करतानाच ह्या सर्व परिसरची स्वछता केली. या परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले....Read More
व्हीएस न्यूज - महाराष्ट्रातील तमाम जनतेचे कुस्तीवर मनापासून प्रेम आहे. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे म्हणून प्रशिक्षक परिश्रम घेतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र केसरी,हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद या मल्लांना मासिक मानधनाची योजना सुरू केली. महाराष्ट्र ऑलिंम्पिकचा अध्यक्ष या नात्याने देखील मी कुस्तीचे जगभर नाव लौकिक वाढावे म्हणून काम करीत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे सौदागर येथे सांगितले.
एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा झाली. यामध्ये महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ किलो) गादी विभागात खुल्या गटात रहाटणीच्या पै. किशोर नखाते याने भोसरीतील हर्षवर्धन माने वर १२ विरुध्द २ असा भारंदाज डावावर तांत्रिक गुणांनी विजय मिळविला. महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ किलो) माती विभागात खुल्या गटात रहाटणीच्या पै. वैभव तुपे याने पिंपळे सौदागरच्या पै. कानिफनाथ काटेला बांगडी डावावर चितपट करुन विजय मिळविला. गादी विभागातून निवड झालेला पै. किशोर नखाते हा चालू वर्षीचा महाराष्ट्र युवा केसरी आहे. तो पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे सराव करीत आहे तर माती विभागातून निवड झालेला पै. वैभव तुपे हा एचए तालीम येथे सराव करीत आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २० ते २४ डिसेंबर २०१७ ला (भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आणि नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत रविवारी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. पै. किशोर नखाते विरुध्द पै. हर्षवर्धन माने यांची गादी विभागातील महाराष्ट्र केसरी खुला गटातील अंतिम सामना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावण्यात आला.
व्हीएस न्यूज – दारु पिण्यास पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून दोघांनी दोन तरुणावर लोखंडी कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री साडेनऊ वाजता घडली.
ओमकार बाळू सरोदे व सागर खळगे (दोघे रा. काळेवाडी) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनिल नागनाथ बनपट्टे (वय 28, रा. ओंकार कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ सचिन बनपट्टे याला दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र सचिनने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने संगनमताने सचिन याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. यावेळी फिर्यादी सचिन यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही आरोपींनी वार केले. यामध्ये सचिनच्या डाव्या कानाच्यावर तर फिर्यादीच्या हातावर वार करण्यात आले आहेत. तसेच या भांडणात इतर व्यक्तिंनाही आरोपीने जखमी केले आहे. वाकड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – पुण्याला जाणाऱ्या रेल्वे खाली सापडून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन येथे घडली. दरम्यान, अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या तळेगाव रेल्वे स्टेशनमधील दोन लेनच्या मध्ये पुण्याला जाणाऱ्या अज्ञात एक्सप्रेस गाडी खाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. उंची 5फूट 2 इंच, चेहरा गोल, अंगाने सडपातळ रंग नीम गोरा, लांब काळे केस, असे या महिलेचे वर्णन आहे.
तिच्या अंगात गुलाबी रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा सलवार, कानावर पिवळ्या धातुची कर्णफुले, बोटात 2 अंगठ्या, पायात पैंजण, असा पेहराव आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.वरील वर्णनाच्या महिलेला ओळखणाऱ्या व्यक्तिने पुणे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002