व्हीएस न्यूज – उपचारासाठीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रमोद व्यंकटेश तेलगु, वय-१९, रा-शीतळा नगर देहुरोड, उमेश आदीनारायण बोया, वय-१९, योगेश धनराज द्रविद, वय- २२ असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ७३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ९० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर २२० क्रमांक एम.एच.१४/ एफ.डब्लू.४४६० निळ्या रंगाची गाडी जप्त केली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी उमेश शिवाजी कदम वय- ३०, रा.संत सावता माळी मंदिराजवळ भुमकर चौक, वाकड, हा तरुण शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांच्या स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.१२/ जे.डब्लु. ७१८७ वरुन सुर्या हॉस्पीटलची ३ लाख २३ हजार १०७ रुपयांची रोख व एक चेक बँगेत घेवून भरण्यासाठी एसबीआय व एचडीएससी बँक बाणेर रोड, पुणे येथे जात असताना सकाळी १०.३० वाजता आयकॉन टॉवर बिल्डींगमधील एसबीआय बँक शाखेसमोर पायऱ्यांवर आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कमेसह बॅग पळवून नेली होती. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेचा तपास सुरु असताना पोलिसांनी आरोपींना चतुःश्रृंगी, हिंजवडी, वाकड या परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपींकडून २ लाख ७३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर गाडी जप्त केली. दरोडे प्रतिबंधक पथकातील पोलिस हवालदार पाटील, सय्यद, काटम, पोलिस नाईक कदम, गायकवाड, सुर्वे, गाणते, जाधव यांनी ही कारवाई केली. घटनेचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.
व्हीएस न्यूज - पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 58 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसका मारून तोडून नेली. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता स्पाईन रोड चिखली येथे घडला.
हेमंतकुमार नारायणन (वय-39, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या पत्नीसोबत गुरूवारी सायंकाळी स्पाईन रोडवरून जॅग्वार कंपनीसमोरून जात होते. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 58 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवरील उघड्या हौदात पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे 26 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी ठेकेदारास दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष शंकर पवार (वय-3) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ठेकेदार संग्राम होकर्णे (रा. भोसरी), महेश पवार (रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज धोत्रे (वय-47, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची रहाटणी येथे बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवरील पाण्याच्या उघड्या हौदामध्ये पडून आयुषचा 26 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्याचे पोलीस तपास निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांनी ठेकेदारासह दोघांवर मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - जून्या भांडणाच्या रागातून दोन जणांनी एका तरुणाच्या डोळ्यावर सिमेंटच्या 'पेव्हिंग' ब्लॉकने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री मधुबन कॉलनी भोसरी येथे घडली.
राजेंद्र सुरेश ननावरे (वय 28), किरण कुंडलिक शितोळे (वय 30 , दोघे रा. मधुबन कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. याबाबत गोविंद वामन गुत्तापल्ले (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आणि आरोपींची जुनी भांडणे आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य आहे. जून्या भांडणाचा राग मनात धरुन शुक्रवारी आरोपींनी गोविंद याच्या डोळ्याच्या उजव्या बाजूस सिमेंटच्या 'पेव्हिंग' ब्लॉकने बेदम मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक एन. जे. जगदाळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी बिजलीनगर येथील बसस्टॉप जवळ घडली होती.
प्रदीप जावनलाल चौधरी (वय 19 रा. कुंजीर वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी वर्तुल शर्मा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे 18 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या बहिणीला बसमध्ये बसवून बिजलीनगर रस्त्यावरून पायी येत होते. दुचाकीवर साथीदारासह आलेल्या चौधरीने त्यांना अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून नेला.
पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र तयार करून तपास सुरु केला. या प्रकरणातील आरोपी हा काकडे पार्क येथील डोके उद्यान परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रक्कम व मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - भर दुपारी चोरट्याने महिलेला घरात कोंडून चोरी केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी पिंपरी, संत तुकारामनगर येथील नंदनवन कॉलनीत घडला होता. या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
योगेश प्रकाश देवकर ( वय-20 रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी सुधाकर ढुमणे (वय 47 रा. पिंपरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी फिर्यादी ढुमणे यांच्या आई या एकट्याच घरात असताना दुपारी बाराच्या सुमारास एक अनोळखी इसम त्यांच्या घरात घुसला. त्याने फिर्यादीच्या आईला चाकुचा धाक दाखवला व घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर चोरट्याने घरातील घड्याळ,सोन्याची पोतसह 14 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्याने घराला बाहेरुन कडीही लावली.
भोसरी पोलिसांनी मिळालेल्या वर्णनावरुन चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून 5 ग्रॅमचे सोन्याचे मणी, मनगटी घड्याळ एक चाकु एसा एकूण 14 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, काळुराम लांडगे, पोलीस हवालदार महादेव धनगर, पोलीस नाईक विनायक म्हसकर, जाधव, गणेश हिंगे, पोलीस शिपाई आव्हाळे, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, समीर रासकर, नितीन खेसे, सागर भोसले यांनी केली.
व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवर बिगारी काम करणाऱ्या महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षितेची साधने न पुरविल्याबद्दल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ताथवडे येथे घडला.
लक्ष्मी शिवराय पुजारी (वय-45, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार जितेंद्र वाधवाणी, सय्यद नबिलाल नायकवाडी, शब्बीर बागवाण यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ताथवडे येथील जिंजर हॉटेलच्या पाठीमागे बांधकाम साईट सुरू आहे. हा साईटवर पुजारी या बिगारी काम करतात. त्यांचा सहाव्या मजल्यावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार संगिता गोडे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी खेळ खेळले पाहिजेत, खेळातून शरीर सुदृढ राहते, खेळ विद्यार्थ्यांना घडविते. खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळ खेळला पाहिजे. कोणत्याही खेळाडूला कमी समजू नये. समोरच्या खेळाडूला कमी समजाल तर तुमचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील अनेक शाळांमध्ये मैदाने नाहीत. मैदाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळावेत, असे मत स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित चौथ्या स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडाज्योत पेटवून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरीगावात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेविका कोमल मेवाणी, स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशनचे राज्य सचिव सुनील शिंदे, पिंपरी चिंचवड व्यापारी आघाडीचे जयदेव डेंबरा, भाजप पुणे जिल्हा कार्यकारणीचे सदस्य कमल कलकाणी, डॉक्टर आघाडीचे डॉ. महेश पेशवानी, असोसिएशनच्या योगा विभागाच्या प्रमुख मनाली देव, नेहुल कुदळे, शिक्षण विभागप्रमुख दीपाली शिंदे, अमर कापसे आदी उपस्थित होते.
संदीप वाघेरे म्हणाले, ”मुलांनी खेळले पाहिजे. खेळल्यावर मुले अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढते. मुलांना खेळण्यासाठी पिंपरीगावात आता एकच मैदान आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी लवकरच पिंपरीगावात पाच मैदाने विकसित करणार आहे. अॅथलेटिक्स, खो-खो हे खेळ खेळण्यासाठी त्या मैदानाचा उपयोग केला जाणार आहे.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन गेल्या चार वर्षांपासून कार्य करत असून ही संस्था स्वदेशी आहे. त्याची निर्मिती भारतीय आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहे. परंतु, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत. मुलींकडून स्पर्धा प्रवेश शुल्क घेतले जात नाही. मतिमंद मुलांचा असोसिएशन संपूर्ण खर्च करते, असे राज्य सचिव सुनील शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी नगरसेविका कोमल मेवाणी यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, योग स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
रविवारी (दि.३) पिंपरीगावातील बी.जी.आडवाणी धर्मशाळेत दुपारी १२ ते १ यावेळेत स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी दौंडकर यांनी केले.
व्हीएस न्यूज - शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजपा सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांच्यामधील राजकीय ‘आखाडा’ आता रंगात आला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ‘शिरुरचा खासदार’ असे फ्लेक्स उभारुन आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी खासदार गटाला खुले आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस भोसरीसह शिरुर लोकसभा मतदार संघात विविध उपक्रमांनी मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. वास्तविक, आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र, फ्लेक्स आणि विविध प्रसारमाध्यमांतील जाहिरांतींमध्ये आमदार लांडगे यांच्या नावाचा उल्लेख ‘भावी खासदार’, मंत्रीसाहेब, शिरुरचा खासदार…असा करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडूक डोळ्यांसमोर ठेवून आमदार लांडगे यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांच्यासह शिवसेना, काँग्रेस तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार लांडगे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पाठींबा दिला आहे. त्यामुळे सहाजिकच आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार लांडगे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक महामार्ग, रिंगरोड, रेड झोन, बैलगाडा शर्यत, कचऱ्यापासून विजनिर्मिती प्रकल्प, औद्योगिक प्रश्न आदी विकासकामांवरुन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्या अनेकदा मतभेद झाले आहेत. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेवून आमदार लांडगे यांनी नवखे असतानासुद्धा खासदारांना चांगलेच आव्हान दिले आहे. वास्तविक, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेच आमदार लांडगे यांना ताकद दिली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचा वाटा मोलाचा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार लांडगेंना ताकद…
शिरुर लोकसभा मतदार संघासाठी सध्यातरी भारतीय जनता पक्षासह सर्वपक्षीय आढळराव पाटील यांच्या विरोधकांसमोर एकही प्रभावी चेहरा नाही. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील हे स्वत: लोकसभा निवडणुकीसाठी जोखीम घेणार नसल्याचे सांगितले जाते. आढळराव यांना खुले आव्हान देण्याची तयारी आमदार लांडगे यांनी ठेवली आहे. त्यामुळे भविष्यातील तजवीज म्हणून भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी आमदार लांडगे यांना ‘प्रमोट’ केले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, बैलगाडा शर्यतीवरील आंदोलनाचा रोख राज्य सरकारवर येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत आमदार लांडगे यांनी ‘पेटा’ विरोधात एल्गार पुकारला होता. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही आमदार लांडगे यांना कायम झुकते माप दिले आहे.
व्हीएस न्यूज - जागतिक एड्स दिनानिमित्त मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात आज पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच परिसरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. मोरवाडी प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पथनाट्य आणि एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सिंबायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगचे डॉ. दिपक शेठी, सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे, प्रतिक कांबळे, कोमल शिंदे, रेखा इंगळे, ओमकार गायकवाड, नवनाथ भोसले, आण्णा लुकर, नाजिमा पठाण, शोभा झोंबाडे, मंदा चांदणे, सविता धुमाळ, कल्पना साळवे, सविता ओव्हाळ, राणी पवार, विंदू ओव्हाळ, सलिमा शेख, असिना शेख, रहिमा शेख, आत्मा शेख आदी उपस्थित होते.
पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात एड्स जनजागृती रॅली काढली. ”याद रखे..सुरक्षा जीवन का अर्थ है’, सुरक्षा के बीना सब व्यर्थ है”, ”HIV असे जेथे जीवनाचा नाश तेथे”, ”एड्स दिवस पर खाओ कसम, सुरक्षित बनाएँ यौन संबध”, ”जो सुरक्षा से दोस्ती तोडेंगे…वह एक दिन दुनिया भी छोडेंगे”, ”यौन संबंध जब-जब कंडोम तब-तब”, ”एड्स आजाराचा द्वेष करा, एड्स झालेल्या व्यक्तीचा नको”, ”सुरक्षित रहा, सतर्क रहा…तुमच्यासाठी, समाजासाठी”, ”विवाह में रहे वफादार, तब एचआयव्ही, एड्स के कभी न होंगे शिकार”,”सही और पूर्ण जानकारी..दूर रखें एड्स की बिमारी”, ”कंडोमचा वापर करा, एड्स टाळा” अशा संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेतले होते.
रॅलीनंतर लालटोपीनगर मध्ये पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून एड्स कसा होता, कोणाला होतो. त्याची माहिती दिली. सोबत राहिल्यावर, हात मिळविल्यावर, एका ताटात जेवल्यावर एड्स होत नाही. त्यामुळे एड्स झालेल्या व्यक्तीचा मत्सर करु नये, असा संदेश दिला. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्ताद्वारे, दूषित रक्त असलेल्या इंजेक्शन सुई वापरल्याने, आईकडून बाळाला किंवा स्तनपानाद्वारे आणि टॅटू काढताना जर ते साहित्य दूषित असेल तर त्यातूनही एड्स होऊ शकतो, अशी माहितीही विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिली.
यावेळी बोलताना नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या की, एड्स झालेल्या नागरिकांचा द्वेष करू नये. एड्स झालेले लोक तणावात असतात. त्यांची हेळसांड, तिरस्कार करू नये. तुसड्यासारखी वागणूक देऊ नये. सोबत राहिल्यामुळे, जेवल्यामुळे किंवा हातात-हात मिसळल्यामुळे एड्स होत नाही. परंतु, त्याचा गैरप्रचार करण्यात येत आहे. झोपडपट्टी परिसरात एड्सची जनजागृती करणे गरजेचे आहे. या परिसरातील लोकांना त्याबाबत जास्त माहिती नसते. त्यामुळे या परिसरात एड्सची पथनाट्यातून माहिती देण्यात आली. तसेच जनजागृती करण्यात आली.
व्हीएस न्यूज - भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोरून जाणाऱ्या एका मोटारीला जोरदार धडक दिली. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रकांत सोपान डोंगरे (वय 38 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून भोसरी येथील महामार्गाच्या पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगाने जात असताना समोरून जाणाऱ्या मोटारीला (एमएच 14 एफसी 1822) धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सातच्या सुमारास केएसबी चौकात घडली. संतोष मारुती मुंढे (वय 28 रा. बीड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा पिंपरीच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना केएसबी चौकातील उड्डाणपुलावर त्याच्या दुचाकीची ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष हा एका खासगी सेक्युरीटी कंपनीमध्ये कामाला होता. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002