व्हीएस न्यूज – पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांनी विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आढळून आल्यास, पंश्चिम बंगाल सरकार त्यावर योग्य कारवाई करेल, असे म्हटले आहे.
पार्थ म्हणाले, की गोपनीयरित्या शाळांची माहिती आम्ही एकत्रित केली असून उत्तर बंगालमध्ये यात साधारणपणे १२५ शाळा शिक्षण विभागाची परवानगी न घेताच सुरू असल्याचे निदर्शनास आले असून हे आम्ही चालू देणार नाही. यानंतर राजकीय मदतीच्या सहाय्याने काही शाळा न्यायालयात गेल्या आणि आता त्यांना राज्य शिक्षण विभागाची ना हरकत घेतल्या शिवायही सुरू राहण्याची परवानगी मिळाली आहे. पण अशा शाळांविरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच ठेऊ आणि वेळ पडल्यास सर्वोच न्यायालयापर्यंतही जाऊ, असेही पार्थ म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत शाळांना लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या १२५ शाळांसह एकूण ४९३ शाळांवर शिक्षण विभाग लक्ष ठेऊन आहे.
व्हीएस न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने रजनीकांतची पत्नी लता रजनीकांत यांना मीडियावन ग्लोबल एंटरटेनमेंट या कंपनीने तीन महिन्याच्या आत कर्जाची परतफेड केली नाही तर हे कर्ज लता यांना भरावे लागेल असा आदेश दिला असून मीडियावन ग्लोबल एंटरटेनमेंट या कंपनीच्या लता रजनीकांत या संचालिका आहेत.
रजनीकांत आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘कोचाडियान’ या चित्रपटासाठी मीडियावन ग्लोबल एंटरटेनमेंट कंपनीने बंगळूरुतील अॅड ब्यूरो एडवर्टाइजिंग या कंपनीकडून १४.९० कोटींचे कर्ज घेतले होते. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्यावर अद्यापही ६.२० कोटींचे कर्ज बाकी आहे. मागील तीन महिन्यांपासून अॅड ब्यूरो एडवर्टाइजिंग द्वारा दाखल करण्यात आलेली याचिका प्रलंबित होती. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. कंपनीने उर्वरित रक्कम तीन महिन्याच्या आत परत करावी अन्यथा ही रक्कम रजनीकांतची पत्नी लता रजनीकांत यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लता रजनीकांत यांच्याकडून म्हणणे मांडल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी ३ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - भारतीय जनता पक्षासाठी वाईट बातमी आहे. पक्षाने एकाच दिवशी आपले दोन आमदारांना गमावले. राजस्थानच्या नाथद्वारा मतदारसंघाचे आमदार कल्याणसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील नूरपूरचे आमदार लोकेंद्र सिंह यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ४१ वर्षीय लोकेंद्र यांची कार सीतापूर येथे एका ट्रकला धडकली. अपघात इतका भीषण होता की त्यात लोकेंद्र सिंह यांच्याबरोबर त्यांचे दोन सुरक्षारक्षक आणि ट्रक चालकाचाही जीव गेला. राजस्थानमधील आमदार कल्याणसिंह प्रदीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उदयपूर येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
व्हीएस न्यूज – एकीकडे भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढत आहे तर दुसरीकडे काही लोकांना देशाचा हा विकास खुपत आहे. ती म्हणूनच लोकं चुकीचा इतिहास मांडून द्वेष पसरवत असल्याचा आरोप सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी संघ व भाजप नेत्यांना तुम्ही संघटनेपेक्षा स्वतःला मोठे समजू नका, असा इशाराच दिला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाराणसीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीराच्या पाचव्या दिवशी भाजप व संघ नेत्यांना संबोधित केले. भागवत म्हणाले, भारतात पूर्वी हिंदू व मुस्लीम असा भेदभाव कधीच नव्हता. सुखाने दोघेही एकत्र नांदत होते. पण १९०५ मध्ये इंग्रजांनी मुस्लीम लीगची स्थापना करत भेदभाव निर्माण केला. त्यावेळी समाजात द्वेष पसरवण्यात आला आणि तेच काम अजूनही काही लोक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारतात असंतोष पसरवणाऱ्या शत्रूंपासून लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढत असून या विकासामुळे अनेक जण नाराज आहेत. म्हणूनच खोटा इतिहास मांडून ही मंडळी द्वेष पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संघ व भाजप नेत्यांना यावेळी भागवत यांनी कानपिचक्याही दिल्या. संघात व्यक्ती हा संघटनेपेक्षा मोठा नाही. संघ स्वयंसेवकामुळेच घडत गेला आणि अशीच वाटचाल यापुढेही सुरु राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने मान- अपमान, यश- अपयश याचा विचार न करता लक्ष्य प्राप्त करणे हेच एक ध्येय ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
व्हीएस न्यूज – राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला असून, तो येत्या एक-दोन दिवसांतच जाहीर केला जाईल. राज्य सरकारच्या तिजोरीवर या निर्णयामुळे १०० कोटीचा बोजा पडणार आहे. ही वाढ १ जुलै, २०१७पासून लागू होणार आहे. राज्य सरकारच्या १९ लाख कार्यरत आणि निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार वर्षातून दोनदा महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ वा घट करते. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १३६ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. नव्याने मिळणाऱ्या वाढीव भत्त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना १४० टक्के महागाई भत्ता मिळेल. राज्याच्या तिजोरीवर यामुळे दरमहा सुमारे १०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मुख्य सचिवांनी याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, त्यास अर्थमंत्र्यांनीही संमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच येत्या एक-दोन दिवसांत हा निर्णय जाहीर होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांना पे बँड आणि ग्रेड पे याच्या १३६ टक्के महागाई भत्ता सध्या मिळतो. १ जानेवारी, २०१७ पासून महागाई भत्त्यात झालेली वाढ ऑगस्ट, २०१७मध्ये लागू झाली. त्यामुळे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमधील थकबाकी अद्याप सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणे बाकी आहे.
व्हीएस न्यूज – सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक राज्यात गारपिटीच्या नुकसानीचा पंचनामा करताना शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली. पण शेतकऱ्यांना ही मदत देण्यासाठी घातलेल्या अनेक जाचक अटीमुळे सराईत गुन्हेगारांसारखी अपमानास्पद वागणूक मिळत आहे.
कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात पंचनामा करताना शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढण्याचा प्रताप केला असून सराईत गुन्हेगाराच्या हातात ज्याप्रकारे त्याच्या नावाची पाटी देतात त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या हातात पाटी देत फोटो काढले आहेत. मुळात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची शहानिशा करण्यासाठी आधार कार्डसह इतर पर्याय उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांच्या हातात नावाची पाटी देऊन त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. प्रशासनाने केलेल्या या प्रतापानंतर शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल हे मात्र अनुत्तरितच आहे. शेतकऱ्यांना पारदर्शक कारभाराचा नाहक त्रास होत असून यातून सरकारला काय साध्य करायचे आहे ? असे आता शेतकरी विचारात आहे.
व्हीएस न्यूज – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदार संघ असलेल्या मूल येथे योगगुरू रामदेव बाबा यांच्या ३ दिवशीय योग शिबिराला सुरुवात झाली. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी भल्या पहाटे शिबिरात हजेरी लावत योगा केल्यामुळे अर्थमंत्र्यांचा हा राजकीय योगा तर नाही ना, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मूल हा मतदार संघ आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्या योग शिबिराचे त्यांच्या मतदार संघात आयोजन करण्यात आल्याने या शिबिरात भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले आहेत. भल्या पहाटे अर्थमंत्र्यांनीही शिबिरात हजेरी लावत योगा केला. त्यामुळे परिसरात याबाबत हा राजकीय योगा तर नाही ना, अशा चर्चेला उधाण आले आहे.
व्हीएस न्यूज - भारताचा माजी कप्तान न शैलीदार डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीनं विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. एका मुलाखतीत सौरवनं म्हटलंय की विदेश दौऱ्यात कौहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकांमध्येही भारत विजयी होईल यात शंका नाही. मी महेंद्र सिंह ढोणी व राहुल द्रविडला बराच काळ कप्तान म्हणून जवळून बघितलं आहे, परंतु कप्तान कोहली ज्या सातत्यानं फलंदाजी करतो ते मी याआधी कधीही बघितलेलं नाही अशा शब्दांमध्ये सौरवनं विराटचं कौतुक केलं आहे.
स्वत:च उदाहरण समोर ठेवून तो कप्तानपदाला साजेशी खेळी करतो असं सांगताना गांगुलीनं अफ्रिकेविरोधात विराटनं फटकावलेल्या तीन शतकांचं उदाहरण दिलं. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया असे दोन दौरे आता भारतीय संघ येत्या काऴात करणार आहे. भारतीय संघ तयारीसाठी दोन्ही देशांमध्ये काही काळ आधीच जाणार आहे, तर त्यांनी दोन चार सराव सामने मालिका सुरू होण्यापूर्वी खेळावेत असा सल्ला गांगुलीनं दिला आहे. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कप्तानांपैकी एक असलेल्या सौरवनं कोहली हा निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा कोहलीच्या नावावर असून 2018मध्येही तो याबाबतीत आघाडीवर आहे.
कोहली हा भारताची क्रिकेटमधली ओळख बनत आहे. काही बाबतीत तो मी, तेंडुलकर व द्रविडपेक्षाही वेगळा असल्याचं मत गांगुलीनं व्यक्त केलं आहे. गेली काही वर्षे कोहली फॉर्ममध्ये असून शुक्रवारी त्यानं 35 वे एकदिवसीय शतक झळकावलं. दोन संघांमधल्या एकदिवसीय मालिकेत 500 धावा फटकावणारा तो पहिला फलंदाजही ठरला आहे. कोहलीनं एकदिवसीय मालिकेतील सहा सामन्यांमध्ये तीन शतकं व एक अर्धशतक झळकावलं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीच्या नावावर 56 शतकं आहेत. त्यात कसोटीतल्या 21 व वन डेमधल्या 35 शतकांचा समावेश आहे.
सर्वाधिक शतकांच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर असून त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर (100), रिकी पाँटिंग (71), कुमार संगकारा (63) व जॅक्विस कॅलिस (62) आहेत. कोहलीचं वय अवघं 29 असून त्याच्यासमोर भरपूर काळ व संधी आहेत, ज्यामुळे तो तेंडुलकरच्या विक्रमापर्यंत पोहोचू शकेल.
व्हीएस न्यूज - भारतीय बनावटीचे विमान आता महाराष्ट्रात तयार होणार आहे. कॅप्टन अमोल यादव यांच्याशी राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्रात करार केला आहे. ३५ हजार कोटींचा हा करार असून यात अमोल यादव यांना पालघर जिल्ह्यात १५७ एकरची जागा दिली जाणार आहे. विमान बांधणीच्या या उद्योगातून तब्बल १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
मूळचे साताऱ्याचे आणि सध्या मुंबईकर असलेले कॅप्टन अमोल यादव यांनी १९९८ मध्ये ‘थर्स्ट एअरक्राप्ट’ कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा पहिला प्रयत्न फसला. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता यादव यांनी २००३ मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात २००९ मध्ये सहा आसनी विमाननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला. यादव यांनी आता १९ आसनी विमानाची निर्मिती सुरू केली आहे. या प्रयत्नाची दखल घेत राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत यादव यांच्या कंपनीशी करार केला आहे. पालघर येथे विमानबांधणी प्रकल्पासाठी १५७ एकर जागा मिळणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत ही जागा दिली जाईल. या प्रकल्पातून १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या करारासाठी अमोल यादव यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केला पाठपुरावा…
वांद्रे- कुर्ला संकुलात भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात परवानगी नसतानाही यादव यांनी महत्प्रयासाने आपले विमान प्रदर्शनात मांडले. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या विमानाला मान्यता मिळण्याठी वर्षभर सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. यानंतर विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) यादव यांच्या विमानावर मान्यतेची मोहोर उमटवली.
व्हीएस न्यूज - जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अरुण जे. सन्याल आणि १८ वर्षीय पार्थिक नायडू यांच्यासह एकूण सहाजणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी २०१८च्या आऊटस्टॅंडिग स्टेम (STEM) पुरस्करांसाठी ही नावे निवडली आहेत. स्टेम (STEM) म्हणजेच, विज्ञान (science), तंत्रज्ञान (technology),अभियांत्रिकी (engineering) आणि गणित (mathematics).
पुरस्कारासाठी निवड झालेल्या सन्याल यांनी यकृत रोग निदान आणि उपचार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले आहेत. तर, १८ वर्षीय पार्थिक नायडूने कर्करोगाच्या ३डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. STEM ने व्हर्जिनियातील कुटुंबांना आणि आमच्या अर्थव्यवस्थेला दिलेल्या योगदानाला हे पुरस्कार अधोरेखित करतात. त्यामुळे अथक परिश्रम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये व्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या पुरस्कार्थींचा मी आभारी आहे, असे गव्हर्नर नॉर्थम यांनी सांगितले.
पुरस्कारासाठी निवड झालेले सन्याल हे ‘फॅटी लिव्हर डिजिसेस’ (NASH) मधील तंत्र आणि त्याचे परिणाम यावर आणि मेटॅबोलिक सिंड्रोमची वाढती व्याप्ती आणि जागतिक परिणामांची ओळख करण्याचे निरीक्षण करत आहेत. या निरीक्षणाबद्दल त्यांची व्हर्जिनियातील ‘आऊटस्टँडिंग साइंटिस्ट’ या पुरस्कासाठी निवड करण्यात आली आहे. तर वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिक नायडूने कर्करोगाच्या ३डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्यामध्ये DNALoOPR नावाचे कॉम्प्युटींग टूल तयार करण्यात आले असून, ते सध्या वापरात असलेल्या उपकरणांपेक्षा कर्करोगजन्य डीएनएच्या जैव पध्दतींचे वेगवान, कमी खर्चिक आणि अचूक विश्लेषण करते. या संशोधनाबद्दल त्याची स्टेम आऊटस्टँडिंग पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पार्थिक सध्या स्टँडफर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.
व्हीएस न्यूज - दिल्लीच्या मुख्य सचिवांना आम आदमी पार्टीच्या आमदारांनी धक्कादायक केल्याचे वृत्त बिनबुडाचे असल्याचे सांगत आपने ते फेटाळले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त टाइम्स नाऊनं दिलं होतं. त्याबाबत बोलताना अंशू प्रकाश भाजपाच्या तालावर नाचत असून असे हास्यास्पद आरोप ते करत आहेत असं आपनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
आधीच्या वृत्तानुसार अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी एका बैठकीसाठी अंशू प्रकाश गेले होते. यावेळी आपच्या दोन आमदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याचा प्रकाश यांचा दावा आहे. प्रकाश भाजपाच्या तालावर नाचत असून भाजपानं विरोधा करताना खूपच खालची पातळी गाठली असल्याचा आरोप आपनं केला आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर तसेच अन्य अधिकारी यांच्या माध्यमातून भाजपा सरकार आपशी घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप आपनं केला आहे.
मुख्यमंत्री व आपच्या दोन आमदारांविरोधात मुख्य सचिवांवर शारीरिक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरकारी अधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त एनडीटिव्हीनं दिले आहे. आपनं प्रकाश यांचा दावा फेटाळला आहे तसेच प्रकाश यांनीच असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला आहे. “आधारची अमलबजावणी अयोग्य झाल्यामुळे दिल्लीतल्या अडीच लाख कुटुंबांना गेल्या महिन्यात शिधा मिळालेला नाही. जनतेकडून स्थानिक आमदारांवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आमदारांना उत्तर देण्यास आपण जबाबदार नसल्याचे सांगत मुख्य सचिवांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तसेच त्यांनी काही आमदारांविरोधात वाईट भाषा वापरली आणि कुठलंही स्पष्टीकरण न देता अंशू प्रसाद निघून गेले,” आपनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
तर दिल्लीच्या प्रशासकीय सेवा संघानं याप्रकरणी बैठक बोलावली असून आम आदमी पार्टीच्या आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. दरम्यान, काँग्रेसनेही आपवर या प्रकाराबाबत टीका केली असून आपचे नेते गैरव्यवहारात गुंतल्याचा आरोप केला तसेच अशा प्रकारच्या गुंडागर्दीची काय गरज होती असा सवाल विचारला आहे.
व्हीएस न्यूज - हिंदू धर्माला अधिकाधिक सुरक्षित करायचे असेल तर त्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रहिताच्या भावनेने अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा, असे वक्तव्य करुन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली. मुलांना जन्माला घालण्यापूर्वी त्यांचे पालनपोषण कसे करावे, याची चिंता जर पालकांना असेल तर ती आमच्यावर सोडा. पाच वर्षांपर्यंत तुम्ही सांभाळा, नंतर त्यांचा सांभाळ आम्ही करू व राष्ट्रहितासाठी त्याला तयार करू. किंबहुना माझा जीवन संकल्पच राष्ट्रभक्त मुलांना निर्माण करणे हा आहे, असेही त्या म्हणाल्या.
सिडकोतील संत तुकाराम नाटय़गृहात शिवजयंती व राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाचे कै. जनुभाई रानडे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावरील व्याख्यानात त्या सोमवारी बोलत होत्या. व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे नेते संजय बारगजे, वीरुपाक्ष शिवाचार्य स्वामी, नवनाथ महाराज आंधळे, अंबरीश महाराज, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शेरकर, राजीव जहागीरदार, विभाश्री दीदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचा संदर्भ घेत प्रज्ञासिंह यांनी स्त्री शक्ती किती महत्त्वाची असून एखाद्या राष्ट्राची पुढील पिढी निर्माणासाठी तिचे योगदान अधोरेखित करणारी उदाहरणे देत राष्ट्रहितासाठी मुलांना जन्म देण्याबाबतचे विधान केले. पद्मावत चित्रपटात हजारो स्त्रियांनी प्राणाची आहुती दिल्याच्या प्रसंगाचा अर्थ सांगताना राणी पद्मावतीने स्त्रियांना आपले शील रक्षण करण्यासाठी अग्नित उडय़ा घेण्याचे आवाहन केले होते, असेही त्या म्हणाल्या.
हिंदू राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर संख्यात्मक वाढ झाली पाहिजे. भगवान ने मुँह दिया तो दाना भी देगा, एवढा ‘त्यांचा’ विश्वास असतो, आपण मात्र एक किंवा दोनचवर थांबतो आहोत,असे त्यांनी सांगितले. कमी संख्येच्या घरातील मुलांना घरात एकलकोंडेप्रमाणे राहावे लागत असून त्यातून अलिकडे आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जात असल्याच्या घटना घडल्या जात आहेत.
मिशनरीज आणि मदरशांमध्ये धर्माभिमानी शिक्षण दिले जाते. त्यातून आमच्या संस्कारांना क्षीण केले जाते. अशा शिक्षणाची आम्हाला गरज नाही. ना आम्हाला मदर शिकवणारे शिक्षण पाहिजे ना मदरशांमधील, असे सांगत साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्या शिक्षणामध्ये राष्ट्रहित जोपासणारी मूल्ये नाहीत, असे मत करून त्याविषयी खंत व्यक्त केली.
संघ ही राष्ट्रभक्ती रुजवणारी संघटना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी कशी व का केली, याची माहिती देऊन साध्वींनी संघ म्हणजे राष्ट्रभक्ती भिनलेली संघटना असल्याचे सांगितले. संघ प्रचारकाचे काम शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच सुरू असते, असेही त्या म्हणाल्या. पद्मावतसारख्या विषयावर चित्रपट बनवून व्यावसायिक हित पाहून भावनेशी खेळले जात असल्याचा आरोप केला.
काँग्रेसवर टीका….
आपल्याकडे भावनांचा केवळ आईच्या मृत्यूनंतर मुलाला थेट पंतप्रधान बनवले जाते तेव्हाच विचार केला जात असल्याचे सांगत राजीव गांधी यांचे उदाहरण म्हणून प्रज्ञासिंह यांनी नाव घेतले. आम्हाला भगवे आतंकवादी ठरवण्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी, अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002