व्हीएस न्यूज –सर्वोच्च न्यायालयाने रजनीकांतची पत्नी लता रजनीकांत यांना मीडियावन ग्लोबल एंटरटेनमेंट या कंपनीने तीन महिन्याच्या आत कर्जाची परतफेड केली नाही तर हे कर्ज लता यांना भरावे लागेल असा आदेश दिला असून मीडियावन ग्लोबल एंटरटेनमेंट या कंपनीच्या लता रजनीकांत या संचालिका आहेत.
रजनीकांत आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘कोचाडियान’ या चित्रपटासाठी मीडियावन ग्लोबल एंटरटेनमेंट कंपनीने बंगळूरुतील अॅड ब्यूरो एडवर्टाइजिंग या कंपनीकडून १४.९० कोटींचे कर्ज घेतले होते. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्यावर अद्यापही ६.२० कोटींचे कर्ज बाकी आहे. मागील तीन महिन्यांपासून अॅड ब्यूरो एडवर्टाइजिंग द्वारा दाखल करण्यात आलेली याचिका प्रलंबित होती. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. कंपनीने उर्वरित रक्कम तीन महिन्याच्या आत परत करावी अन्यथा ही रक्कम रजनीकांतची पत्नी लता रजनीकांत यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लता रजनीकांत यांच्याकडून म्हणणे मांडल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी ३ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.