व्हीएस न्यूज - राज्यसभेवर असलेल्या रेखा, सचिन तेंडूलकर आणि उद्योजक अनु आगा याची मुदत ३ एप्रिल रोजी संपत आहे. विशेष म्हणजे हे तिघेही महाराष्ट्राचे आहेत. त्यांची जागा आता कुणाला मिळणार याची उत्सुकता वाढत चालली असताना राज्यसभेत खराब रेकोर्ड असलेल्या रेखाच्या जागी खिलाडी अक्षयकुमार याची वर्णी लागेल असे खात्रीलायक वृत्त आहे. अक्षय कॅनडाचा नागरिक आहे. त्याच्या निवडीत नागरिकत्वाची अडचण आलीच तर अक्षयच्या सासूबाई डिम्पल याची निवड होईल असे सांगितले जात आहे. डिम्पल गुजराथी आहेत आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या आहेत.
कला, संस्कृती, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांची राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या शिफारसीनुसार होणारी निवड लक्षात घेऊन अनेकांनी आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या जगावर अल्पी वर्णी लागावी म्हणून उद्योजकांसह लेखक, कलाकार प्रयत्नशील असून काही जणांनी त्यासाठी मोठी रक्कम मोजायची तयारी दाखविली आहे असेही सांगितले जात आहे. अक्षयकुमार, जुही चावला आणि गजेंद्र सिंग याची नावे रिकाम्या होत असलेल्या तीन जागांसाठी चर्चेत आहेत. अक्षयकुमार महिला शौचालय मोहीम, शहीद जवान फंड, स्वच्छता अभियान यामुळे आघाडीवर आहे तर जुही गुजराथी पती जय मेहतामुळे चर्चेत आहे. गजेंद्र सिंग याना संघाची पसंती आहे. या स्पर्धेत वहिदा रेहमान, आशा पारेख, अनुपम खेर, सुरेश ओबेराय, सलीम, जॅकि श्रॉफ, मधुर भांडारकर याचीही नावे घेतली जात आहेत.
व्हीएस न्यूज – आता जास्तीत जास्त ५० रुपये शुल्क माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर लागेल. तसेच प्रति पान ५ रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालय, विधानसभा, विधानपरिषद, तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार असून हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे. विविध उच्च न्यायालये आणि छत्तीसगड विधानसभेसह काही संस्थांच्या आरटीआयसंदर्भातील नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर हा आदेश देण्यात आला आहे. काही संस्था आरटीआय अर्जासाठी आणि फोटोकॉपींसाठी मोठे शुल्क आकारत होत्या. न्यायालयात ‘कॉमन कॉज’ या एनजीओने एक याचिका दाखल केली होती. यात, अर्जदारांना माहिती कळू नये म्हणून आरटीआय अर्जांसाठी मोठे शुल्क घेऊन त्यांना निराश केले जाते, असे म्हटले होते. केंद्र सरकारच्या नियमानुसार आरटीआय अर्जासाठी केवळ १० रुपये शुल्क आहे. तर तर कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसाठी केवळ २ रुपये एवढेच शुल्क आहे.
व्हीएस न्यूज – भारताने अमेरिका आणि इस्त्रायलसोबत आपल्या दहशतीने जगभरात थैमान घातलेल्या ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटेशी मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे. याचा चांगला उपयोग होईल, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे.
जगाला इसिसने आव्हान दिले असून इसिसचे जगात ज्या ठिकाणी अस्तित्व असेल त्यांचे ते मनसुबे उधळून लावण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलसोबत भारताने एकत्र यायला हवे. संख्याबळ आपल्याकडे आहे, अमेरिका आधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असून इस्त्रायलकडे सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे. या तीनही गोष्टी एकत्र आल्यास एक ताकदवान दल तयार होईल. इसिसचा त्यामुळे ज्या कुठल्या देशात तळ असेल तेथे आपले सैन्य पाठवण्यात संकोच करता कामा नये, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - संरसंघचालक मोहन भागवत यांनी सोशल मीडियामुळे माणूस आत्मकेंद्री आणि अहंकारी होतो, असे मत मांडले आहे. सोशल मीडियापासून मी सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे असून दुष्परिणामांमुळेच लांब असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत नागपूरमध्ये झालेली प्रतिनीधी सभा, सोशल मीडिया, संघाच्या शाखा अशा विविध विषयांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडले. तुम्ही अॅप्स, सोशल मीडियाकडे कसे बघता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. भागवत यावर म्हणाले की, ते एक उपयोगी साधन आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे, पण एका मर्यादेपर्यंत. तुम्ही त्याचा वापर संघटनेत एक सुविधा म्हणून करु शकता. पण सोशल मीडियाचा वापर करताना आधी त्याचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही सोशल मीडियामुळे आत्मकेंद्रीत आणि अहंकारी बनता. ‘मी’पणा तुमच्या प्रत्येक गोष्टीत झळकू लागतो. समाजाचा मी एक भाग असून समाजासाठी थांबण्याची गरज नसल्याची भावना मनात येते. फेसबुक तर अगदी ‘फेस’च आहे, असे त्यांनी सांगितले. संघाचे फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट आहे. पण माझे नाही. ना भविष्यातही मी सोशल मीडियावर येईन. राजकारणातील मंडळींना फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट जास्त उपयुक्त ठरते. पण त्याचा वापर करताना त्यांना सावधही राहावे लागते, असे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - अत्यावश्यक सेवा कायद्यातून अंगणवाडी सेवक आणि सेविकांना मागे घेण्याचा तूर्तास निर्णय झालेला नाही. पण ६० वर्षांवरून अंगणवाडी सेवकांच्या निवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्यांनी ही घोषणा अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यांना उत्तर देताना केली.
हा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ५ वर्षांनी कमी केल्याने सेविकांमध्ये असलेल्या नाराजीची भावना पाहता घेतल्याचे त्यांनी सष्ट केले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आवश्यक ती वाढ करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती. अंगणवाडी सेविकांचे मानधन आधीच वाढवल्याची माहिती यावर त्यांनी सभागृहात दिली. अगोदरच अंगणवाडी सेविकांचे मानधन चारवरून साडेसहा हजार रुपये प्रति महिना एवढे वाढवण्यात आले आहे. तसेच मेस्मा या अत्यावश्यक सेवा कायद्यातून अंगणवाडी सेविकांना वगळण्याबाबत तूर्तास तरी कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांना अत्यावश्यक सेवांमध्ये आणण्याबाबत उच्च न्यायालयात आम्ही प्रतिज्ञापत्र दिले आहे. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये न आणल्यास मुलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होईल,असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.
व्हीएस न्यूज – विद्यार्थ्यांनी दादर - मांटुगादरम्यान रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली असून विद्यार्थी रेल्वे रुळावर रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात उतरले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करत रेल्वे रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडून रुळावरुन हटण्यास नकार दिला.
शेकडो विद्यार्थी अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. आम्ही रेल्वेकडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आम्ही रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. पोलिसांचे पथक रेल रोकोचे वृत्त समजताच घटनास्थळी पोहोचले. आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण विद्यार्थी आक्रमक होत रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजल्यापासून आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी आहेत. आधी रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
व्हीएस न्यूज - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जनलोकपाल आंदोलनावर शिष्टाई अखेर निष्फळ ठरली असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. महाजन केवळ मंत्री आहेत. दिल्लीतील बॉसच्या हातात सूत्र असल्यामुळे चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घ्या, असे अण्णा यांनी म्हटले आहे.
अण्णांनी आंदोलनाला रामलीला मैदानावर परवानगी मिळाल्याने चलो दिल्लीचा नारा दिला. अण्णांनी यावेळी लोकशाही देशाचा कारभार चार जण पाहत असल्याचा आरोप केला. तर हुकूमशाहीकडे देश कसा वाटचाल करत आहे, हे आंदोलनात सांगणार असल्याचे अण्णा म्हणाले.
कोणते विधेयक अधिवेशनात मांडणार ते अगोदर सांगा, असेही अण्णांनी बजावले. वेळ कमी पडत असल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवा, असेही अण्णांनी सुचवले. आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. पत्रांना उत्तर देण्यासाठी परदेशी दौर्यातून पंतप्रधानांना सवड नसेल किंवा ईगो असेल, असा टोलाही अण्णांनी लगावला. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर रामलीला मैदानावर होणाऱ्या मोदी सरकारविरोधातील आंदोलनावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
व्हीएस न्यूज - लग्नाच्या आमिषाने आपल्यावर गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळने बलात्कार केल्याचा आरोप एका २२ वर्षीय युवतीने केला आहे. या प्रकरणी निकाळजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निकाळजेने आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत, तसेच शिक्षणाचा खर्च करु, असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला, असा आरोप नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या एक युवतीने केला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नवी मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केले आहे.
पोलिसात युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती २०१४मध्ये कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना तिच्यावर दीपक निकाळजेची नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचे आमिष निकाळजेने दाखवले. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला,असाही आरोप आहे. लग्नाची मागणी या मुलीने केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने पोलीस तक्रार करु नये म्हणून दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे. टिळकनगर पोलिसात तरुणीने १८ मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ २ कडे वर्ग केला आहे, अशी माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली.
व्हीएस न्यूज - काश्मीरच्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झुंज घेताना ९ गोळ्या अंगावर झेलून जबर जखमी झालेले सीआरपीएफचे कमांडंट चेतन चीता देशसेवेच्या कामावर पुन्हा रुजू झाले असून त्यांनी कोब्रा बटालियन मध्ये पोस्टिंग मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ही बटालियन नक्षलीविरोधी कारवाया पार पाडते.
१४ फेब्रुवारी रोजी काश्मीर मध्ये दहशतवाद्यांबरोबर अटीतटीची झुंज घेताना चीता याच्या डोळ्यात, मेंदूत, दोन्ही हात, खांदे, कमरेत ९ गोळ्या लागल्या होत्या. अत्यवस्थ अवस्थेत त्यांच्यावर एम्स मध्ये उपचार सुरु असताना ते कोमात गेले होते. दीड महिना कोमात राहिल्यावर मृत्यूशी यशस्वी लढा देऊन ते बाहेर आले आणि वर्षभरात बरे होऊन कामावर रुजू झाले आहेत. त्याना १५ ऑगस्ट ला शांती काळातले दुसरे मोठे गॅलंट्री अवार्ड कीर्तीचक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. चीता यांना सध्या सीआरपीएफच्या कार्यालयात काम दिले जाणार आहे कारण अजूनही ते पूर्णपणे फिट नाहीत त्यामुळे त्यांची इच्छा असली तरी त्यांना आघाडीवर मोर्चा सांभाळण्यासाठी पाठविले जाणार नाही असे समजते.
व्हीएस न्यूज – बँकांना टोप्या घालण्याचे सत्र सुरूच असून आता आणखी एक बँक घोटाळा समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी अॅक्सिस बँकेच्या तक्रारीवरुन एका खासगी कंपन्यांच्या तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. या खासगी कंपनीचे नाव पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड असे असून, बँकेला तब्बल चार हजार कोटींचा चुना कंपनीने लावल्याचा आरोप होत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भंवरलाल भंडारी, प्रेमल गोरागांधी आणि कमलेश कानूनगो यांना अटक केली आहे. ही कारवाई अॅक्सिस बँकेच्या तक्रारीनंतर करण्यात आली.
दरम्यान, बँकेचे अधिकारी देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. अॅक्सिस बँकेच्या तक्रारीत अमिताभ पारेख, राजेंद्र गोठी, देवांशु देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोरडानी यांच्याही नावांचा समावेश आहे. यातील अमिताभ पारेख यांचे २०१३ सालीच निधन झाले आहे. दुसरीकडे पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेडविरोधात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओवरसिस बँकेनेही यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सीबीआय कंपनीचा कसून तपास करत आहे. पारेख अॅल्यूमिनेक्स लिमिटेड ही कंपनी रियल स्टेट डेव्हलपर्सकडे फंड डायव्हर्ट करत असल्याचा बँकेचा आरोप आहे.
व्हीएस न्यूज - गेली लोकसभा निवडणूक भाजपबरोबर लढविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या साथीने लढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. खासदार राजू शेट्टी यांच्या या निर्णयाने पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.
शेट्टींनी काही महिन्यांपूर्वीच भाजपशी मैत्री सोडली होती. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा यापूर्वीच केली आहे. शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले. भाजपला झटकल्यानंतर शेट्टी यांनी त्यांचे एके काळचे कट्टर शत्रू शरद पवार यांच्याशी चांगलेच जुळवून घेतल्याचे मानले जाते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशीही हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात भाजपविरोधात भरभक्कम आघाडीला आकार देण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.
शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेने २०१४ मध्ये भाजपशी युती केली होती. परंतु त्यांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातच त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत हे मंत्री झाल्यानंतर तर पक्षामध्ये चांगलीच दुफळी माजली. तेव्हापासून शेट्टी भाजपविरोधात गेले होते.
व्हीएस न्यूज - मराठा बटालिन (काली पाचवी) च्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ३०० सैनिक पत्नींचा विशेष सन्मान पिंपळेगुरव येथील निळुफुले नाट्यगृहात करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार लक्ष्मण जगताप युवामंच आणि शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अश्विनी लक्ष्मण जगताप या होत्या. अश्विनी जगताप यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
अश्विनी जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित ३०० सैनिक पत्नींना साडी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, गिरीजा शितल शिंदे उपस्थित होते. यावेळी कर्नल अमनमोहन यांना भक्ती शक्तीचे प्रतिक संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आभार नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मानले. तर सुत्रसंचालन पिंपरी चिंचवड भाजप सोशल मिडीया अध्यक्ष रणजित इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश कवटेकर, रणजित इंगळे आणि सागर वाडीया यांनी विशेष परिश्रम घेतले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002