व्हीएस न्यूज - आता एप्रिल महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार होणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकारांना दिल्यामुळे संभाव्य नावांच्या चर्चेबरोबर कोणाकोणाला डच्चू मिळणार याचेही आडाखे बांधले जात आहेत.
केंद्र व राज्यातील भाजप प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे हा कदाचित निवडणुकीपूर्वीचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. या वेळी मंत्रिमंडळात आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. जागावाटपानुसार भाजपकडे ३० तर शिवसेनेकडे १२ मंत्रीपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे. त्यामुळे हा विस्तार फक्त भाजपचाच असेल. त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
व्हीएस न्यूज - मुंबई महापालिकेच्या अभियंत्यास भाजप आमदार अमित साटम यांनी शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून पण शिवीगाळ केल्याचे आमदार साटम यांनी नाकारले आहे. या ऑडिओ क्लिपमधील केवळ सुरुवातीचा आवाज आपला असून नंतरचा आवाज दुसऱ्या असल्याचे म्हटले आहे.
आपल्याविरोधात घोटाळेबाज अभियंत्याचा हा कट असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. कोणतीही तक्रार याबाबत दाखल झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तर पैसे उकळण्यासाठी आमदार अमित साटम यांनी धमकी दिल्याचा दावाही अभियंत्यांनी केला आहे. साटम यांनी के-पश्चिम वॉर्डमधील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या आरोपाबाबत आमदार साटम यांनी म्हटले आहे की, फोन संभाषणातील सुरुवातीचा आवाज आपला असला, तरी शिवीगाळ ऐकू येत असलेला संभाषणाचा भाग एडिट किंवा मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आलेला आहे. पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून दहा महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुने असावे. असे कोणतेही संभाषण झाल्याचे आपल्या आठवणीत नाही, असेही साटम यांनी म्हटले आहे.
आपले अभियंते पवार यांच्याशी चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण विधानसभेत ५० हजार कोटींचा बिल्डिंग स्कॅम बाहेर काढला होता. त्याबाबत चौकशी सुरु असून लोकायुक्तांकडे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे निर्णय होण्याआधी माझी बदनामी करुन दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - २ एप्रिलला डॉक्टरांनी पुकारलेला देशव्यापी संप तात्पुरता मागे घेतला असून डॉक्टरांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत दोन एप्रिलला बैठक आहे, त्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
डॉक्टरांनी नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावरुन संपाचे हत्यार उपसले होते. हे विधयक सरकारने राज्यसभेत मांडलं, पण त्यावर चर्चा होऊ शकली नाही. या विधेयकात संसदीय समितीने सरकारला काही बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातील काही सरकारने मान्य केल्या. त्यानुसार केंद्रीय कॅबिनेटने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून आयुर्वेदीक ब्रिजकोर्स वगळला, एमबीबीएस परिक्षात एक्झिट परिक्षा केली. पण देशभरातील डॉक्टर केंद्र सरकारच्या या निर्णयावर समाधानी नाहीत. या विधेयकात डॉक्टरांनी आणखी बदल सुचवले आहेत. त्यांनी या मागणीसाठी दोन एप्रिलला संपाचा इशारा दिला होता. पण तो आता तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. डॉक्टरांचे शिष्टमंडळ दोन एप्रिलला आरोग्यमंत्र्याची भेट घेणार आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल.
व्हीएस न्यूज: पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू टीव्ही शोमध्ये सहभागी झाल्यावरुन वादाच्या भोवऱ्यात असताना, ते आता नव्या वादात सापडले आहेत. सिद्धू यांचे दोन अकाऊंट आयकर विभागाने सील केले आहेत. आयकर परताव्याची बिले देताना, नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेक गोष्टी लपवल्याचा आरोप होत आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ मध्ये त्यांनी कपड्यांवर २८ लाख रुपये खर्च केले होते. तर प्रवासावर ३८ लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती. याशिवाय,इंधनावर १८ लाख, कर्मचाऱ्यांचे पगार ४७ लाख रुपये खर्च केले होते. यासंदर्भात सिद्धू यांना आयकर विभागाने तीन वेळा नोटीस पाठवल्या होत्या. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने दोन अकाऊंट सील करण्याची कारवाई केली. आयकर विभागाने सील केलेल्या खात्यांमधून ५८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दुसरीकडे आपल्यावरील सर्व आरोप सिद्धू यांनी फेटाळले असून त्यांच्या मते, गेल्या दहा वर्षात आयकर परताव्याची बिले सादर करताना कोणतीही चूक केली नाही. जी बिले २०१४-१५ची सादर केली, त्यावरील कर भरलेला आहे. तसेच, आपली अनेक देणी बाकी, असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - सध्या राजकीय वर्तळात आणि अधिवनेशनात उंदीर आणि चहापाण्याचा मुद्दा गाजत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याच मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. टीव्हीवर चहापानाचा खर्च किती येतो यावर चर्चा ऐकली. ४ वेळा मी मुख्यमंत्री झालो पण मला एवढे चहापाणी लागले नसल्याचा टोमणा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
त्याचबरोबर पवार यांनी यावेळी विकासकामात कपातीचा विचार असता कामा नये, असे परखड मांडले. या सगळ्याबाबतीत शिक्षक प्रतिनिधींसहीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. शासनाचा १३०० शाळा बंदीचा निर्णय पटसंख्येवर आधारित आहे. पटसंख्या विषय दुर्लक्ष करण्यासारखी नाही. पण पटसंख्या कुठे आणि कशी बघावी याचे तारतम्य असायला हवे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - फेसबुकनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या अमेझॉनला आपल्याच देशात जोरदार झटका दिला आहे. अमेझॉनविरुद्ध अमेरिकेत ‘टॅक्स ट्रिटमेंट’ गरजेची असल्याचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेझॉनची मार्केट व्हॅल्यू डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर काही मिनिटांतच जवळपास ४५ अरब डॉलर (२.९० लाख करोड) घसरली.
सीएबीसीच्या एका रिपोर्टनुसार, आपल्यापेक्षा लहान व्यवसायांना अमेझॉन नुकसानीत ढकलत असल्यामुळे शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्सना मोठे नुकसान सोसावे लागत असल्यामुळे अमेझॉनवर नवा टॅक्स लावला जाऊ शकतो. अमेझॉनच्या शेअर्समध्ये झालेली घरसण आणि कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी झाल्याने अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडिक्सनुसार, त्यांची संपत्ती सध्या जवळपास ३.५ अरब डॉलर्सने (२३ हजार करोड रुपये) घटली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अद्याप अमेझॉनविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, यापूर्वीही ट्रेजरी सेक्रेटरी स्टीवन म्युशिन यांनीही अमेझॉनवर सेल्स टॅक्स लावण्याची शिफारस केली होती.
व्हीएस न्यूज - नाशिक महापालिकेने काँग्रेस कमिटीला मालमत्ता कर थकविल्याने जप्तीची नोटीस बजावली असून जवळपास २६ लाखांचा मालमत्ता कर काँग्रेस कमिटीने थकविल्यामुळे जप्तीची नोटीस बजाविण्यात आली. दरम्यान शहरातील करबुडव्यांचे धाबे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दणाणले आहेत. नाशिक काँग्रेस कमिटीने तब्बल २६ लाखांचा मालमत्ता कर गेल्या काही वर्षांपासून थकविला असल्यामुळे नाशिक पालिकेच्या वतीने काँग्रेस कमिटीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील २१ दिवसात थकबाकी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करून कर वसूल करणार असल्याचे बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये सांगितले असल्यामुळे काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील ८०० ते ९०० थकीत मालमत्ता कर बुडव्यांना नोटीस बजावली होती. पण याकडे काही लोकांनी दुर्लक्ष केल्याने दोन दिवसात शहरातील तब्बल ३९४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. येत्या २१ दिवसांत संबंधित लोकांनी मालमत्ता कर न भरल्यास सर्व मालमत्तांचा लिलाव करून महापालिका कर वसूल करणार असल्याचे सांगितले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मात्र महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
व्हीएस न्यूज – पॅन कार्ड व आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याच्या मुदतीत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) ३० जूनपर्यंत वाढ केली असून सध्याच्या ३१ मार्चपर्यंतच्या अंतिम मुदतीत कर खात्यातील धोरण बनवणाऱ्या मंचाने ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याचा आदेश जारी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आधार जोडणी संदर्भात विविध सेवादात्यांना अंतिम मुदतीत वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. सरकारतर्फे पॅन क्रमांक आधारशी जोडण्यासाठी देण्यात आलेली ही चौथी मुदतवाढ आहे. शासनाने आयकर भरण्यासाठी व नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे.
व्हीएस न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार’च्या डेटा सुरक्षेवर चिंता व्यक्त करत ‘आधार’चा डेटा आधारची नोंदणी करताना केंद्रचालक कॉपी करु शकतो. याशिवाय आधार सक्तीचा धडाका खासगी कंपन्यांनीही लावला असून त्या देखील ‘आधार’चा गैरवापर करु शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय घटनापीठासमोर आधार सक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्या. चंद्रचूड मंगळवारी झालेल्या सुनावणीत म्हणाले,सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमधून अजूनही ‘आधार’चा डेटा सुरक्षित राहील हे सुनिश्चित झालेले नाही. या डेटाचा गैरवापर होऊ नये एवढेच आमचे म्हणणे असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. व्यावसायिक कामासाठी नागरिकांच्या खासगी माहितीचा वापर केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ला फटकारले असून तुम्ही नागरिकांच्या माहितीचा गैरवापर होणार नाही, असे सांगता. पण आधार नोंदणीचे काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. केंद्रचालक या संस्था नोंदणी करताना‘आधार’चा डेटा त्यांच्याकडे कॉपी करुन ठेवू शकतात, असे न्यायालयाने नमूद केले.
व्हीएस न्यूज – आपल्या ५० टक्क्यांहून जास्त लोकसभा खासदारांचा पत्ता भारतीय जनता पक्ष कट करु शकते. हा निर्णय भाजप खासदारांनी आपल्या मतदारसंघ आणि सभागृहात केलेल्या कामगिरी तसेच सोशल मीडियावरील उपस्थितीच्या आधारावर घेतला जाऊ शकतो. एका ज्येष्ठ भाजप नेत्याने ‘द वीक’ सोबत केलेल्या चर्चेमध्ये सांगितले आहे की, लोकसभा खासदारांच्या कामगिरीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा दोघेही घेत असून ते खासदारांच्या कामगिरीवर असंतृष्ट आहेत. २०१९च्या निवडणुकीवेळी उमेदवारांची निवड कामगिरीच्या आधारावरच केली जाणार आहे.
पूर्व भारतात भाजपचे निवडणूक धोरण आखण्यात महत्त्वची भूमिका बजावणा-या या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ज्येष्ठ नेत्यांसोबत मिळून पक्ष खासदारांची भेट घेतली. त्यांनी यावेळी खासदारांना स्पष्टपणे कामगिरी केली नसेल, तर तिकीट मिळेल याची आशा ठेवू नका असे सांगितले आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारांची निवड करण्यासाठी काही अटी ठेवल्या असून त्यानुसारच तिकीट वाटप केले जाणार आहे.
याबाबत भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे ज्यांनी आपल्या मतदारसंघात भरघोस काम केले आहे. त्याचबरोबर आपल्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय योजना योग्य पद्धतीने लागू केल्या आहेत आणि सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह आहेत अशांनाच प्राथमिकता दिली जाणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असण्याचा अर्थ म्हणजे त्याचे लाखांमध्ये फॉलोअर्स आहेत.
व्हीएस न्यूज - परीक्षा संपल्या की सुट्टीच्या कालावधीत गावाकडे जाण्यासाठी बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला आहे. यंदापासून परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपले हा वर्षांनुवर्षीचा प्रघात बंद होणार आहे. या वर्षी वार्षिक परीक्षा झाली तरीही शाळेला कागदोपत्री सुट्टी लागेपर्यंत मुलांना शाळेत जावे लागणार असल्यामुळे एप्रिलच्या मध्यावर दरवर्षी बंद होणाऱ्या शाळा चक्क १ मेपर्यंत मुलांसाठी सुरू राहणार आहेत.
दरवर्षी वार्षिक परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असते. पण हे वेळापत्रक यंदापासून बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. १ मे पर्यंत पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. मुलांसाठी या कालावधीत विविध उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.
व्हीएस न्यूज - आमिर खानचा महाकाव्य महाभारतावर आधारित चित्रपट साकारण्याचा ड्रीम प्रोजेक्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आमिर खान सुमारे १ हजार कोटींहून अधिक बजेट असलेल्या या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. पण सध्या याच गोष्टीवरून ट्विटरवर ‘महाभारत’ सुरू झाले आहे. आमिर मुस्लिम असतानाही महाभारतावर आधारित चित्रपटात कृष्णाची भूमिका का साकारावी, असा प्रश्न फ्रॉन्सवा गॉटीयार या फ्रेंच पत्रकाराने उपस्थित केला. जावेद अख्तर यांनी त्याच्या या प्रश्नावर ट्विटरवर सडेतोड उत्तर दिलेच, पण त्याच्या ट्विटवर अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
फ्रॉन्सवा गॉटीयारने आमिर मुस्लिम असतानाही त्याने पवित्र आणि प्राचीन अशा महाभारतावर आधारित चित्रपटात भूमिका का साकारावी? पुरोगामी विचारांच्या नावाखाली मोदींच्या भाजपचीही विचारसरणी काँग्रेसप्रमाणेच होत आहे का? कोणा हिंदू कलाकाराला मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात मुस्लिम भूमिका साकारण्याची परवानगी देतील?, असा सवाल उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधले. जावेद अख्तर यांनी त्याच्या या ट्विटचे उत्तर देत लिहिले, बेशिस्त माणसा… पीटर ब्रूक्सच्या निर्मितीत फ्रान्समध्ये या महाकाव्यावर आधारित साकारलेली कलाकृती तू पाहिली नाहीस का? असे विकृत विचार पसरवण्यासाठी तुमच्या देशात कोणती विदेशी एजन्सी पैसे देते हे मला माहित करुन घ्यायचे आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002