व्हीएस न्यूज: पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू टीव्ही शोमध्ये सहभागी झाल्यावरुन वादाच्या भोवऱ्यात असताना, ते आता नव्या वादात सापडले आहेत. सिद्धू यांचे दोन अकाऊंट आयकर विभागाने सील केले आहेत. आयकर परताव्याची बिले देताना, नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेक गोष्टी लपवल्याचा आरोप होत आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ मध्ये त्यांनी कपड्यांवर २८ लाख रुपये खर्च केले होते. तर प्रवासावर ३८ लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती. याशिवाय,इंधनावर १८ लाख, कर्मचाऱ्यांचे पगार ४७ लाख रुपये खर्च केले होते. यासंदर्भात सिद्धू यांना आयकर विभागाने तीन वेळा नोटीस पाठवल्या होत्या. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने दोन अकाऊंट सील करण्याची कारवाई केली. आयकर विभागाने सील केलेल्या खात्यांमधून ५८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दुसरीकडे आपल्यावरील सर्व आरोप सिद्धू यांनी फेटाळले असून त्यांच्या मते, गेल्या दहा वर्षात आयकर परताव्याची बिले सादर करताना कोणतीही चूक केली नाही. जी बिले २०१४-१५ची सादर केली, त्यावरील कर भरलेला आहे. तसेच, आपली अनेक देणी बाकी, असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.