व्हीएस न्युज- आळंदी येथील एका पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला चिखली पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन दुचाकी वाहने, हत्यारे, मोबाईल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चिखली पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस स्टेशन च्या हद्दीत गस्त घालत असताना आळंदी रस्ता येथील वडाचा मळा परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुनील शिंदे, नरहरी नानेकर यांना मिळाली. माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने छापा मारून ६ आरोपींसह दोनाल पण मुलांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे १२ मोबाईल, ३ दुचाकी, कोयता, तलवार व दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले.
पोलिसांनी या प्रकरणी, अश्वजीत सुभाष मोरे (वय १९ रा. पुण्यनगरी हौउसिंग सोसायटी, घरकुल चिखली) सचिन विक्रम मस्के (वय २० रा. नवचैतन्य सोसायटी टावर लाइन, मोरेवस्ती, चिखली) ज्ञानेश्वर श्रीराम ढाकणे (वय २० रा. जय गणेश हौसिंग सोसायटी सोसायटी, घरकुल चिखली) साजिद मुमताज खान (वय १९ रा. सिद्धेश्वर सोसायटी घरकुल चिखली) आतिश बलदेव कोरी (वय २० रा. गोकुळधाम हौसिंग सोसायटी, घरकुल चिखली) विकास उर्फ पांग्या जाधव (रा. शरद नगर चिखली) या सर्व आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव,चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे,& पोलीस उपनिरीक्षक भरत चपाईतकर, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, किसन वडेकर, आनंद चव्हाण, सुनील शिंदे, नरहरी नानेकर, संतोष सपकाळ कबीर पिंजारी, आनंदा नांगरे, शंकर यमगर, सुरेश जाधव, विनोद जाधव, सचिन गायकवाड, किशोर धनवडे या& पथकाने केली.
व्हीएस न्युज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएस्सीच्या (संगणकशास्त्र) तृतीय वर्षांच्या ऑबजेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग विषयाची प्रश्नपत्रिका फुटली. शनिवारी दुपारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा-पंधरा मिनिटे आधीच मोबाइलमध्ये आली. ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर येत असल्याचे प्रकार होत असून, विद्यापीठाकडून मात्र प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा करण्यात आला.
बीएस्सीच्या संगणकशास्त्र अभ्यासक्रमातील द्वितीय आणि तृतीय वर्षांची परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली. द्वितीय वर्षांच्या सत्र एक आणि दोनची परीक्षा दुपारी दहा ते बारा, तृतीय वर्षांच्या सत्र तीन आणि चारची परीक्षा दुपारी दोन ते चार या वेळेत पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ांतील विविध केंद्रांवर सुरू आहे.
द्वितीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका सुरू होण्यापूर्वी सव्वानऊच्या सुमारास, तर तृतीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका दुपारी सव्वाच्या सुमारास परीक्षा केंद्रावरून व्हॉट्सअॅपद्वारे मिळू लागल्या. बुधवारी इंटरनेट प्रोग्रॅमिंग आणि शुक्रवारी प्रोग्रॅमिंग इन जावा या तृतीय वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही अशाच पद्धतीने फुटल्या. शनिवारीही तृतीय वर्षांच्या ऑब्जेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा-पंधरा मिनिटे मोबाइलमध्ये मिळाल्याचे विद्यार्थ्यांची सांगितले.
विद्यापीठाची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. विद्यापीठाकडून महाविद्यालयाला ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्यानंतर महाविद्यालयाकडून ती डाऊनलोड करण्यात येते. डाऊनलोड होण्याची वेळ आणि संबंधित महाविद्यालयाचा त्यावर वॉटरमार्क उमटतो. विद्यापीठाच्या माहितीनुसार कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, तशी तक्रारही आलेली नाही, असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला.
चौकशीची मागणी
प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाने केलेल्या उपाययोजना पूर्णत अयशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकारांची दखल घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
व्हिएस न्युज - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे आपण घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवतो आणि स्वतःही नमस्कार करत पेढ्याचा तुकडा तोंडात टाकतो... पण दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरात प्रसाद म्हणून विक्री होणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. त्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येथील पेढे आणि मोदक विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू& केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देशात प्रसिद्ध धृतराष्ट्र आहे. याच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्या वेळी हे भाविक आजूबाजूच्या दुकानांमधून प्रसाद म्हणून पेढे विकत घेतात. हे पेढे प्रसाद म्हणून वाटतात. या पेढ्यांच्या गुणवत्तेबद्दलच्या तक्रारी ‘एफडीए’कडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करून त्यातील पेढे आणि मोदकांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले.
अत्यंत अस्वच्छ वातावरणात हे पेढे तयार केले जात असल्याचेही अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यातून या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे& यांनी दिली. गुजरातच्या खव्यापासून पेढे बनवून ग्राहकांची फसवणूक करू नये, असे आवाहन एफडीएने केले आहे.
अशी केली कारवाई
जय गणेश स्वीट सेंटरमध्ये स्पेशल बर्फीपासून गलिच्छ वातावरणात पेढे तयार करत असल्याचे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना दिसले. त्याच वेळी जय मातादी फोटो फ्रेममध्ये, नारळ व पेढ्यांची किरकोळ विक्री करणाऱ्याने श्रीमंत पेढेवाले यांच्याकडून पेढे खरेदी केल्याचे सांगितले. कमी दर्जाच्या स्पेशल बर्फीमध्ये रंग टाकून अस्वच्छ वातावरणात पेढे तयार केले जात होते. त्यासाठी अन्न परवानादेखील नव्हता, असे तपासणीच्या वेळी दिसून आले.
पेढे विक्रेत्याचा नफा आणि नफाच!!
गुजरात स्पेशल बर्फीपासून हे पेढे तयार केले जातात. गुजरातहून येणाऱ्या बसमध्ये टाकून ही बर्फी पुण्यात येते. ही बर्फी १२० रुपये किलो या दराने खरेदी केली जाते. त्यापासून पेढे तयार करताना त्याला फक्त तूप लावले जाते. त्यानंतर या एक किलो पेढ्याची किंमत ४०० रुपये होते.
दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील कमी गुणवत्तेच्या पेढ्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे. या परिसरातील आठ नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला दिले होते. त्यापैकी दोन स्पेशल बर्फीचे होते. त्यात अपमिश्रित पदार्थ आढळून आला. तर, तीन पेढ्यांचे नमुने खराब आले आहेत. त्या आधारावर या विक्रेत्यांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येत आहे. - संजय शिंदे, सहायक आयुक्त, एफडीए, महाराष्ट्र राज्य
व्हीएस न्युज - अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांचे आदर्श ,महानायक,राजे मल्हाररावजी होळकर यांच्या बाबतीत सोशल मिडीयावर "वाल्याचा वालमीकी व मल्याचा मल्हारराव होळकर" आसे बेताल अपमानजनक टिपणी करणार्या राष्ट्रवादि कॉंग्रेस पाटीॕच्या बेआकल आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
४८तासाच्या आत जितेंद्र आव्हाड यांनी अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांची जाहीर माफी मागावी अशी मागणी गोंदियाचे शिवसेना तिरोडा विधानसभेचे संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले आणि शिवशाही व्यापारी संघांचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी केली आहे.
व्हीएस न्युज च्या प्रतिनिधींशी बोलताना दाखले म्हणाले कि "जितेंद्र आव्हाड यांनी माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाणार आसुन याकामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील".
व्हीएस न्युज - सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मदत करण्याच्या बहाण्याने ३ जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ११ ते १४ सप्टेंबर २०१८ या दरम्यान भोसरी व चंदननगर येथे घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अहमद शेख (वय ३३ वर्ष रा. काटे वस्ती दिघी) विजय हनुमंत ननवरे (वय ३० वर्षे रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०१८ रोजी सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली होती. मुलीच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे, निगडी पोलीस एका हरवलेल्या एका महिलेचा शोध घेत असताना निगडी पोलीसांना एक अल्पवयीन सापडली.
त्या मुलीकडे विचारपूस करून तिला आळंदी पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी पोलिसांनी त्या मुलीकडे चौकशी केली असता मुलगी महिला पोलिस कर्मचारी समोर जबाब देण्याच्या मनस्थिती नसल्याने तिच्या आईला बोलावुन विश्वासात घेवुन ती कोठे गेली व कोणाकडे राहीली याबाबत चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.
ती राहत्या घरातून दि ११ सप्टेंबर रोजी पायी चालत विश्रांतवाडी येथे गेली असता तेथे भेटलेल्या रामचंद नावाचे कार चालकाने कार गाडी मध्ये बसून चंदन नगर येथे चंद्र लॉज नेले व तेथे जबरदस्ती करून अतिप्रसंग केला. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी विमाननगर येथे सोडले. तेथे ओला उबेर कार चालक अब्दुल शेख हा भेटला त्याने चौकशी केली असता तिने सावत्र आई त्रास देत असल्याने घर सोडून आल्याचे सांगितले.
त्यामुळे अब्दुल शेख याने त्याचा मित्र विजय ननवरे राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी याची बायको मयत झाली आहे. त्याच्याकडे जाऊन रहा असे सांगून तिला घेऊन मित्र विजय ननवरे त्याचे घरी सोडले. तेथे विजय नन्नवरे याने देखील तिच्यावर जबरदस्तीनेेेे कोंडून तिच्यावर अत्याचार केला. दि १४ सप्टेंबर रोजी अब्दुल शेख हा भेटण्यास आला असता त्यास अल्पवयीन मुलीने विजय ननवरे याने केलेल्या अतिप्रसंग याबाबत माहिती दिली.
त्यावेळी विजय ननवरे व अब्दुल शेख यांनी चर्चा केली विजय ननवरे हा घराबाहेर गेला असता अब्दुल शेख याने खोलीचा दरवाजा बंद करून त्यानेसुद्धा त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली.
या घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अहमद शेख (वय ३३ वर्ष रा. काटे वस्ती दिघी) व विजय हनुमंत ननवरे (वय ३० वर्षे रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांना अटक केली आहे.आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - चाकणच्या नाणेकरवाडी मध्ये बायको घर सोडून गेल्याने पोटच्या आठ महिन्याच्या मुलाला वडिलांनी पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल सुनार असे ८ महिन्याच्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी चक्र उर्फ राजुचे पत्नी निर्मला सोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पत्नी निर्मला घर सोडून निघून गेली.त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी प्रवीण बब्रुवान झुंजार यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपी वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार (वय २४, रा. ज्योतिबा नगर, नाणेकर वाडी, मूळ रा. नेपाळ) आणि पत्नी निर्मला दोन मुलांसह गुरुवारी भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते.दोन वर्षांची मुलगी आणि आठ महिन्याचा साहिल अस त्यांच कुटुंब,गुरुवारी रात्री उशिरा पत्नी निर्मला आणि आरोपी चक्र उर्फ राजू यांच्यात जोरात भांडण झाले.दोन्ही मुलांना घरी सोडून पत्नी निर्मला घराबाहेर निघून गेली.याचाच राग मनात धरून पती चक्र उर्फ राजू सुरत सुनार याने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकल्याला बाथरूम जवळील पाण्याच्या टाकीत टाकून दिले यात त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेटी देऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पत्नी निर्मला ही या अगोदर अनेक वेळा घर सोडून निघून गेलेली आहे.परंतु या दोघांच्या भांडणात आठ महिन्याच्या चिमुकलीचा जीव गमवावा लागला तर दोन वर्षीय मुलीला पोलिसांना सांभाळण्याची वेळ आहे.दरम्यान निर्मलाचा शोध पोलीस घेत आहेत.
व्हिएस न्युज - पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली झाली असल्याचा आरोप करीत आज पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा कोंढवा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला.या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या मूक मोर्चाचे नेतृत्व मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केले. ते यावेळी म्हणाले, भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कुठला पारदर्शी कारभार आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्ण चौकशीअंती झाला आहे. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. असे असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ही निषेधार्थ बाब असून शासनाचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, मिलिंद गायकवाड यांना न्याय मिळाला नाही. तर भविष्यात जे काही होईल त्याला सर्वस्वी पोलीस यंत्रणा जबाबदार राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी त्यांनी दिला.
काय आहे हे प्रकरण
भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी अचानक बदली करण्यात आली. ही बदली राजकीय दबावामुळे झाली असावी अशी चर्चा पोलीस दलात आणि पुणे शहरात सुरू झाली आहे. या बदली विषयी मिलिंद गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, माझी कोणत्याही राजकीय कारणास्तव बदली झाली नसून मी बदलीचा अर्ज दिला होता. त्यानुसार बदली झाली आहे.
योगेश टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिकारी गायकवाड कोंढवा पोलीस स्थानकात आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेत असताना त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले. याचा व्हिडियो कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिलिंद गायकवाड कोंढवा पोलीस स्टेशन येथे १४ महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. याठिकाणी सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तोवर दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर आज त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी वर्गाला आपण पदभार सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना डोळ्यातील अश्रू पाहून गायकवाड यांनाही अश्रू अनावर झाले.
व्हिएस न्युज - सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे याचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूच्या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू असताना पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी मोबाइल चोरी प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्या तरुणाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे.
अजित कल्लप्पा पुजारी (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरुडमधून अजित पुजारी याला चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. मोबाइल चोरी प्रकरणी त्याच्याकडे चौकशी करताना त्याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले असून हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अजित पुजारीच्या मृत्यूची माहिती कुटूंबियांना समजताच ससून रुग्णालयात एकच गर्दी केली असून पोलिसांच्या मारहाणीतच अजितचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नेमका कशामुळे मृत्यू झाला आहे हे आता शवविच्छदेन अहवालानंतरच समजू शकणार आहे.
व्हीएस न्युज - सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडला.
संतोष दोडके (वय ४३, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी, गणेश (पूर्ण नाव माहिती नाही) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके यांच्या सोसायटीमध्ये गुरुवारी पाणी कमी आले. याची तक्रार घेऊन ते नगरसेवक तुषार कामठे यांच्या विनायकनगर पिंपळे निलख येथील जनसंपर्क कार्यालयात गेले. त्यांनी आपली तक्रार अमोल कामठे याच्याकडे तोंडी केली. रात्री साडेआठच्या सुमारास दोडके घरी जेवण करत होते, त्यावेळी तुषार कामठे यांचा ड्रायवर गणेश याने दोडके यांना सोसायटीच्या पार्किंग परिसरात बोलावले.
पार्किंग परिसरात अमोल, विशाल, प्रतीक आणि त्यांचे काही साथीदार होते. ‘तुम्ही दरवेळेस पाण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन तक्रारी का करता’ असे म्हणत सर्वांनी मिळून संतोष दोडके, त्यांचा मुलगा प्राणिकेत (वय १९) याला देखील मारहाण केली. तसेच दोडके यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. सर्वांनी प्राणिकेत याला तीन ते चार दिवसात ठार मारण्याची धमकी दिली. यावरून दोडके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, वैयक्तिक कारणावरून ही भांडणे झाली असून त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. ही भांडणे माझ्या कार्यालयात झालेली नसून बाहेरच्या इमारतीमध्ये झाली आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करावेत. भांडण केलेले आपल्या कार्यालयातील कर्मचारी नाहीत. विरोधकांकडून माझी बदनामी करण्यासाठी करण्यात आलेले हे षढयंत्र आहे असे स्पष्टीकरण तुषार कामठे यांनी दिले आहे.
व्हीएस न्युज - सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. मात्र त्याआधीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
तृप्ती देसाईंनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्या भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती.
आम्ही शिर्डीला निघणार होतो. त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत. पण त्यानंतरही मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न होतं आहे. अयप्पाच्या भक्तांकडून काही महिलांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाईंना पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची होती.
मोदी शिर्डीत येऊन सुरक्षितपणे साईबाबांचे दर्शन घेणार. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला. आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचे आहे पण तुमचे तुकडे करुन महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे हिंसाचार पसरवणारे आहेत त्यांना भाजपा पाठिंबा देत असताना मोदी गप्प का आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.
व्हिएस न्युज - खेड तालुक्यातील डेनेगावमध्ये राहणाऱ्या भाऊ बहिणीचेलग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून आत्महत्या केली. रंजन गणपत भोपळे (40) तर शैला गणपत भोपळे(38) अशी आत्महत्या केलेल्या भाऊ बहिणीची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ बहिणीचे लग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारच्या सायंकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना विषारी औषधाचा वास आल्याने, हा प्रकार समोर आला. भाऊ-बहीण दोघेच इथे राहत होते. दोघांचे वय वाढत चालले होते, मात्र लग्न ठरत नव्हते. त्यामुळे दोघे नैराश्यात होते, बऱ्याचदा यावर नातेवाईकांसोबत त्यांच बोलणं ही होत असे. आज मात्र या नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्युज - पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 21 ऑक्टोबर) ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव एन. एस. पटवर्धन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातीचे श्वान शहरवासियांना पाहण्याची पर्वणी ठरणार आहे. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113 वी चॅम्पियनशीप स्पर्धा होत आहे. यामध्ये मायनर पपी, पपी, ज्युनियर, इंटरमेडिएट, ब्रेड इन इंडिया, ओपन, चॅम्पियन या गटात स्पर्धा होतील. फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातून मुकुल वैद व संजय देसाई हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. देशभरातून तीनशेहून जास्त श्वानांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणा-या या स्पर्धेत सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे. देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची संधी शहर वासियांना मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, संजय मुत्तुर, विक्रांत भोसले, राजेश जाधव यांनी केले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002