शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळणार मोफत सुविधा
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभागात शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्घाटन सीडॅकचे तांत्रिक अधिकारी चंद्रकांत दुधटमल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई आयआयटीच्या समन्वयक विद्या कदम, प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. या सेंटर विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर यांनी सांगितले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीटी धोरणानुसार आणि मुंबई आयआयटीच्या सहयोगाने स्पोकन ट्युटोरीयल अंतर्गत पीसीसीओईच्या हे सेंटर उभारण्यात आले आहे. या ‘फॉस’ (FOSS - FREE OPEN SOURCE CENTER) सेंटरमध्ये पिंपरी चिंचवड शहरात शिकणा-या अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत सर्व सुविधा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेणा-या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देखिल देण्यात येईल. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटरच्या सी, सी++, जावा, पायथॉन, पीचपी, लिनकम, लायब्ररी ऑफीस, स्कायलॅब यासारख्या अनेक सेल्फ लर्निंग प्रोग्रॅमींगचा अभ्यास करता येईल. अशी माहिती प्रा. फुलंबरकर यांनी दिली.
यावेळी प्रा. स्वाती शिंदे यांनी फॉस सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभियानाची माहिती दिली. हे सेंटर उभारण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा. वैशाली कुल्लोली, आभार प्रा. सचिन जाधव यांनी मानले.
व्हीएस न्यूज - राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील एनडीए सरकारबाबत देशभरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून आगामी काळात गुजरातसह देशभरातील सर्व निवडणूकांत मतदार राजा भाजपाला घरी बसवेल. त्यांच्या परतीचा प्रवास नांदेड महापालिका निवडणूकीच्या निकालापासून सुरु झाला आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी केले. कॉंग्रेस भवन पुणे येथे शुक्रवार (दि. 3 नोव्हेंबर) रोजी डेविस डेनी देवदास यांची कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली. यावेली आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक समाज मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन नायर, पुणे शहर अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष पॉल जोसेफ, मेरी डिक्रुज, जॅकलिक फोरस्टर, रफीक मुल्ला, जावेद शेख,
अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, भाऊसाहेब मुगूटमल, मंदार भंगारी, जय सावंत, सिध्दार्थ वानखेडे, आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने मागील तीन वर्षांत अल्पसंख्यांक, ओबीसी व मागासवर्गीय समाजावर अन्याय केला आहे. या समाजाच्या विकासासाठी केलेली आर्थिक तरतूद वेळोवेळी कमी करुन इतर ठिकाणी वापरली आहे. या समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकाबरोबर जोडून त्यात दरवर्षी वार्षिक वाढ द्यावी. अशी तरतूद युपीए सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय नियोजन समितीचे सदस्य खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली होती. याकडे दुर्लक्ष करुन एनडीए सरकारने व राज्य सरकारने शिष्यवृत्तीत वाढ न करता त्यासाठी केलेली तरतूद दुसरीकडे वापरली आहे हि अल्पसंख्यांक, ओबीसी व मागासवर्गीय समाजाची फसवणूक आहे. असाही आरोप नदीम मुजावर यांनी केला.
व्हीएस न्यूज - लोकजनशक्ती पार्टी आणि भीमपूत्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि परिसरात चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सोशल मीडियावर येथील अस्वच्छतेबाबत ‘पोस्ट’व्हायरल झाली होती. त्यामुळे शनिवारी (दि. 4) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे, भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप, अरुण मैराळे, दत्ता गोडसे, ज्ञानेश्वर बोरकर, दिनकर ओव्हाळ, संजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर बोराटे, शरद कांबळे, अनिल काकडे, प्रकाश अरसुमुळ, राज साबळे, अंकुश सागर, सुनील घबाळे, मनोज टिगोटे आदी या वेळी भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप आदी या वेळी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 82 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल 4 कोटी 82 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या सात महिन्यांत करण्यात आली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वेने केलेल्या विविध कारवाईची माहिती प्रशासनाने दिली. यामध्ये रेल्वेत गैरमार्गाने प्रवास करणाऱ्या 77 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 94लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 12 हजार 500 प्रवासी हे क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेत असल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 11 लाख 33 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिली.
गेल्या सात महिन्यांपैकी ऑक्टोबरमध्ये सर्वात जास्त कारवाई करुन दंड आकरण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये 33 हजार 58 प्रकरणांमध्ये तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षी याच महिन्यात 31हजार 201 जणांवर कारवाई करुन 1 कोटी 75 लाख 65 हजार दंड जमा करण्यात आला होता. या कामगिरीबद्दल रेल्वेचे पुणे विभाग प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी रेल्वेच्या तिकीट तपासणीस विभागाचे कौतूक केले आहे.
म्हणून केली जाते कारवाई
रेल्वे प्रशासनाच्यावतीने अशाप्रकारची कारवाई सतत केली जात असते. काही वेळा विशेष मोहीम राबवून प्रत्येक प्रवाशांचे तिकिट तपासणी केली जाते. विशेषत: लोकल ट्रेन तसेच मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. यामध्ये मग विनातिकीट प्रवासी आढळतात. अनेक वेळा फ्लॅटफॉर्म तिकीट नसतानासुध्दा अनेकजण दिवसभर निरनिराळ्या फ्लॅटफार्मवर फिरत असतात. अशा फुकट्यांना जरब बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बेवारस आणि भिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांच्या चौकांत सिग्नलवर अनेक भिकारी किंवा व्यंगाचे सोंग घेऊन वस्तू विकणारी बहुतांश मुले दिसतात. त्यामुळे मुलांकडून भीक मागणे हा धंदा झाल्याने वाहन चालकांना त्यांचा त्रास होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई महामार्गावरील प्रमुख चौकात पिंपरी आंबेडकर चौक, मोरवाडी, आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात देखील अशाच प्रकारे भिकारी आणि त्यांची लहान मुले देखील सिग्नल लागल्यावर जीव धोक्यात घालून गाड्यांमध्ये फिरून भीक मागताना दिसत आहेत.
मोरवाडी चौक या ठिकाणी सिग्नल लागल्यानंतर वाहन चालकांना त्रास देणे हे भिकाऱ्यांचे नेहमीचे चित्र आहे. यामध्ये संपूर्ण शरीर रंगविलेली चार ते पाच वयोगटातील लहान मुले आणि एक अपंग व्यक्ती ही धोकादायक पद्धतीने भीक मागत असतात. दुचाकीवरील व्यक्तींनी लक्ष दिले नाही, तर अंगाला हात लावणे, चार चाकी गाडीच्या काचा आणि दरवाजावर हाताने टकटक करणे आदी प्रकार करतात.
या मुलांचे पालक चौकामध्ये एका बाजूला मुलांवर लक्ष ठेवून असतात. अशाप्रकारे लहान मुलाद्वारे सहानुभूती मिळवून भीक मागण्याचा फंडा त्यांचे पालक करत असतात. यामध्ये एखाद्या चिमुरड्याचा जीव गेला, तरी त्यांना काही घेणेदेणे नसल्यासारखे दिसत आहे. परंतु, या भीक मागण्यांच्या प्रकाराने वाहन चालक त्रस्त झाले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी त्या पालकांना चौकातून हटवावे, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपचे युवा कार्यकर्ते अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना मोफत नोकरी कार्ड वाटप अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील पाच हजार तरुण-तरुणींनी जॉब कार्ड वाटप करण्याचा त्यांचा निश्चय आहे.
भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात काही तरुण-तरुणींना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम निगडी येथील संत तुकाराम संकुल सभागृहात झाला.
या अभियानांतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीत त्यांच्या शैक्षणिक व कामाच्या पात्रतेनुसार, नोकरी विषयीचा दररोज किमान एक मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येणार आहे. त्यात एक लिंक दिली जाईल, ती ओपन केल्यास, ज्या कंपनीत नोकरी उपलब्ध आहे. त्या कंपनीची संपूर्ण माहिती (उदा. कंपनीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, कामाचे स्वरूप, पगार) असेल. त्या मेसेजच्या माध्यमातून पुढील 24 तासात त्या उमेदवारांना नोकरीविषयक निर्णय घेणे सोपे जाईल. वेळेप्रसंगी उमेदवारांना मुलाखत, नोकरी, कामाबाबतचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीमध्ये युवक-युवतींना प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी मोफत प्रवासाची व जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे. किमान 400 कंपन्यासोबत याबाबात करार करण्यात आलेला असून एक रुपया देखील न घेता,प्रत्येक कार्डधारकास शंभर टक्के नोकरी ही मिळणारच ही हमी संयोजकाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.
महापौर नितीन काळजे यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, शहरातील सुशिक्षित व धडाडीचा चेहरा हे खूप कष्टातून तो उभा राहिला आहे. आई शिक्षिका होती यातूनच त्याने आज शिक्षण संस्था उभारल्या आहेत. पिंपरी-चिंचवड मधला पहिला तरुण आहे, ज्याला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या उपक्रमासाठी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आझम पानसरे, नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्या तरुणांना नोकरी कार्ड हवे आहे. त्यांनी निगडी येथील संत तुकाराम संकुल नॉवेल संस्था येथे सकाळी नऊ ते सायंकाळी 5 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पाच हजार तरुणांना रोजगार
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, स्वतः साक्षर व सामर्थ्यवान झाल्यानंतर इतरांनाही ताकदवान करण्याचे काम अमित गोरखे करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तसेच सतत नाविन्यपूर्ण प्रयोग ते राबवतात. त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंटचे महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळाला. आता सुरू केलेल्या नोकरी कार्य या उपक्रमातून पाच हजार तरुणांना रोजगार देण्याचा मानस असून दोन हजार तरुणांना उद्योगाची हमीही देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
व्हीएस न्यूज – तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 5 करिता आंबी, मंगरूळ, निगडे, आंबळे व कल्हाट गावांमधील शेत जमिनींचे भूसंपादन होणार आहे. त्याला अनुसरून गेल्या 3 ते 4 वर्षात जमीन खरेदी-विक्री व्यवहारात करोडोंचा गैरव्यवहार झाला. यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यासह त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा आरोप जागतिक मानवाधिकार संघटनेने केला आहे. व्यवहाराची चौकशी करण्यात येऊन भूसंपादन प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. जागतीक मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदीप नाईक यांनी यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
या गावांमधील जमिनी शेतकरी व अल्प भू-धारकांच्या असून मोठ्या प्रमाणात भात शेती आहे. पोट भरण्याचे ते एकमेव साधन आहे. त्यामुळे या जमिनी संपादित झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होतील म्हणून या जमिनींचे भूसंपादन करण्यात येऊ नये, अशी मागणी या निवेदनात केली आहे. गेल्या 3 ते 4 वर्षात संपूर्ण परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी-विक्री झाली असून यात अनेक गैरव्यवहार झाले असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांच्या तसेच इतरांच्या नावावर हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत व त्यातून शासनाचे करोडो रुपये लाटणार आहे. त्यामुळे तळेगाव येथील 1जानेवारी 2014 पासूनच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहाराची सखोल चौकशी करावी. यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा उघडकीस येणार आहे. वरील मागणी मान्य न केल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा सोमवारी (दि.6) एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. नवीन रुग्ण वाढल्यामुळे शहरातील स्वाइन फ्लूची संख्या 411 वर पोचली आहे. शहरात आजपर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी तीन संशयितांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच 38 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.
स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. या वर्षी दहा महिन्यांत स्वाइन फ्लूच्या मृतांची संख्या 60 वर पोचली आहे. महापालिकेच्या वतीने टॅमी फ्लूच्या गोळ्या व लस दिली जात आहे. सोमवारी एकूण 38संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. 348 रुग्ण सर्दी, तापासारख्या आजारांनी त्रस्त झाले असल्याचे आढळले आहे. तीन संशयितांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 411 झाली आहे, तर एकूण 9 हजार 207 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा स्वभिमानीच्या समन्वयकांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबर 2015 पर्यंतची घरे नियमित करण्यासाठीचा अध्यादेश 7 ऑक्टोबर 2017 रोजी पारित केला. परंतु एक महिना उलटूनही प्राधिकरणातील घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु झाली नाही. सहा महिन्याचा कालावधी हा खूप कमी आहे. त्यात आपण दिरंगाई करत वेळ वाया घालवून नागरिकांची फसवणूक करू नये, हा प्रश्न विविध कारणाने रेंगाळत आला आहे. अनधिकृत घरे नियमित करण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरु करावी अन्यथा या विरोधात स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदन प्राधिकरण अधिकारी डॉ. सतीशकुमार खडके यांनी स्वीकारले. निवेदनावर समितीचे समन्वयक धनाजी येळकर, राजेंद्र देवकर, दत्ता चिंचवडे, प्रशांत सपकाळ, अमोल पाटील, राजश्री शिरवळकर, शिवाजी पाटील, देवेंद्र भदाणे, विशाल पवार, ऍड. प्रतिभा कांबळे, भाग्यश्री सावंत, नयना नारखेडे, अर्चना मेंगडे, सुनिता फुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हीएस न्यूज – भविष्याच्या दृष्टीने वाहतूक सेवेचे अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडविणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती यांसारख्या अनेकविध पैलूंचे प्रदर्शन 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच हैद्राबाद शहरात या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये महामेट्रोच्या स्टॉलचे कौतुक झाले असून या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
शहरी भागातील मेट्रो प्रकल्पांबरोबरच त्यांच्याशी निगडीत इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देणा-या 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्स्पो आणि 17 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सचे उद्घाटन यावेळी उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महामेट्रोचा स्टॉल या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरला. भारत सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव दुर्गा शंकर मिश्रा, तेलंगणा सरकारचे मुख्य सचिव एस. पी. सिंग, सीओडीएटीयुचे अध्यक्ष डॉमनिक बुसेरू, फ्रांसचे भारतातील राजदूत एम. अलेक्झांडर जिग्लर, केंद्र सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आदी यावेळी उपस्थित होते.
महामेट्रोतर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मो बाईक, इलेक्ट्रिक वाहने यांबरोबर मेट्रो प्रकल्पादरम्यान पुरविण्यात येणा-या फीडर सर्व्हिसेस यांसारख्या प्रवासी सेवांची माहिती पुरविण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो स्टेशन्स,नागरिकांशी साधण्यात येणारा संवाद, सोशल मिडीयाद्वारे होत असलेली जनजागृती, हरित उपकक्रम यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन विकासाचे वैशिष्ट्य, नवीन कल्पनांचा प्रसार करणे, शहरी वाहतूक क्षेत्राच्या व्याप्तीचा शोध घेऊन नवनवीन पर्याय आणि त्याची कार्यप्रणाली सादर करणे आणि यातून परावर्तित होणाऱ्या सर्वोत्तम वाहतूक पर्यायाची अंमलबजावणी करणे असा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
व्हीएस न्यूज - नाशिक जिल्हा पालक मंत्री यांनी दारू उत्पादनास महिलांची नावे द्यावीत, असे वक्तव्य करणारे नाशिक जिल्हा पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका निकिता कदम, कविता खराडे, पल्लवी पांढरे, मिनाक्षी उंबरकर, अरुणा कुंभार, पुष्पा शेळके, सविता खराडे, पौर्णिमा पालेकर, शिला भोंडवे, संगीता जाधव, वर्षा शेडगे, मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, सोनम पोटवडे, सविता धुमाळ, अश्विनी पोळ आदी उपस्थित होते.
गिरिष महाजन यांच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या की, नाशिक जिल्हा पालक मंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महीलांची माफी मागावी अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल. तसेच माजी नगरसेविका शकुंतला भाट यांनी देखील आक्रमकपणे आपले मत व्यक्त केले.
व्हीएस न्यूज – महापालिकेने बीआरटी अभ्यास करण्यासाठी नगरसेवक, अधिकारी यांचा अहमदाबाद दौरा करण्यात आला. या दौऱ्यावर झालेला खर्च संबंधित नगरसेवकांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलीआहे.
बीआरटीचा अहमदाबाद दौरा तीन टप्प्यात आयोजित केला होता. त्या दौऱ्यातून ऐनवेळी काही नगरसेवकांनी दांडी मारली. या नगरसेवकांचे विमानाचे तिकीट व राहण्याचा हॉटेलमधील रुम बुक केल्या होत्या. परंतु, सर्वसामान्य जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशाचीउधळपट्टी सुरु आहे. या दौऱ्यातून काही फलनिष्पत्ती होणार आहे काय? तसेच दौऱ्यांचा अभ्यास अहवाल नगरसेवक देणार आहेत का, असा सवाल मनसेने केला असून त्यांचा सर्व खर्च नगरसेवकांकडून वसुल करावा, अशी मागणी राजू भालेराव यांनी केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002