व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बेवारस आणि भिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांच्या चौकांत सिग्नलवर अनेक भिकारी किंवा व्यंगाचे सोंग घेऊन वस्तू विकणारी बहुतांश मुले दिसतात. त्यामुळे मुलांकडून भीक मागणे हा धंदा झाल्याने वाहन चालकांना त्यांचा त्रास होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई महामार्गावरील प्रमुख चौकात पिंपरी आंबेडकर चौक, मोरवाडी, आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात देखील अशाच प्रकारे भिकारी आणि त्यांची लहान मुले देखील सिग्नल लागल्यावर जीव धोक्यात घालून गाड्यांमध्ये फिरून भीक मागताना दिसत आहेत.
मोरवाडी चौक या ठिकाणी सिग्नल लागल्यानंतर वाहन चालकांना त्रास देणे हे भिकाऱ्यांचे नेहमीचे चित्र आहे. यामध्ये संपूर्ण शरीर रंगविलेली चार ते पाच वयोगटातील लहान मुले आणि एक अपंग व्यक्ती ही धोकादायक पद्धतीने भीक मागत असतात. दुचाकीवरील व्यक्तींनी लक्ष दिले नाही, तर अंगाला हात लावणे, चार चाकी गाडीच्या काचा आणि दरवाजावर हाताने टकटक करणे आदी प्रकार करतात.
या मुलांचे पालक चौकामध्ये एका बाजूला मुलांवर लक्ष ठेवून असतात. अशाप्रकारे लहान मुलाद्वारे सहानुभूती मिळवून भीक मागण्याचा फंडा त्यांचे पालक करत असतात. यामध्ये एखाद्या चिमुरड्याचा जीव गेला, तरी त्यांना काही घेणेदेणे नसल्यासारखे दिसत आहे. परंतु, या भीक मागण्यांच्या प्रकाराने वाहन चालक त्रस्त झाले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी त्या पालकांना चौकातून हटवावे, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002