8 हजार 125 ग्राहकांवर कारवाई
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात थकबाकीदार असलेल्या 8 हजार 125 जणांची वीज महावितरणने तोडली आहे. अडीच लाखांचे वीज बिल थकवल्याबद्दल वीज पुरवठा खंडीत केल्याने कुदळवाडी चौकातील उड्डाणपूल अंधारात सापडला आहे.
महावितरणच्या पुणे परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी शून्य थकबाकी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे परिमंडळामध्ये सुमारे 174 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी असून, ही मोहीम 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअतंर्गत करवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, वीज ग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे, हे न पाहता वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक अशा 8 हजार 125 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 8 कोटी 8 लाख रुपयांची थकबाकी या ग्राहकांमध्ये होते. यामध्ये 900 थकबाकीदारांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडी करण्यात आला आहे. भोसरी विभागांतर्गत 3 कोटी 68 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 2 हजार 966, पिंपरी विभागांतर्गत 4 कोटी 40 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 5 हजार 159 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडीतील उड्डाणपुलाचा समावेश आहे. सात महिन्यांचे तब्बल अडीच लाखांचे बील थकल्याने पुलाचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केला आहे.
पथदिव्याअभावी रात्रीच्या वेळी उड्डाणपुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार पुलाला तीन पूल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे कुदळवाडी- चिखली, निगडी, पिंपरी व भोसरी दिशेला पुलावरुन जाणाऱ्या मार्गावर अंधार पसरलेला असतो. तसेच पुलाखालूनही चारही दिशेला जाणारा रस्ता काळोखात बुडत आहे. भोसरी – चिखली, तळवडे, चाकण या औद्योगिक पट्टयाबरोबरच जवळच असलेल्या देहू – आळंदी या धार्मिक स्थळांकडे जाणारे भाविक मोठ्या संख्येने या पुलाचा वापर करतात. कार्तिकी एकादशीमुळे या उड्डाणपुलावरुन मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. मात्र, रात्रीच्या वेळी गैरसोईचा सामना वारकरी तसेच भाविकांना करावा लागला, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वीज बिल थकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर वीज बिल मिळालेच नसल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याशी संपर्क साधला असता कुदळवाडी उड्डाणपुलाचा वीज पुरवठा खंडीत केल्याबद्दल आपल्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगत हात वर केले.
थकबाकी भरा, कारवाई टाळा…
शून्य थकबाकी मोहिमेमध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बील भरणा केद्रांसह घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरण www.mahadiscom.in ही वेबसाइट; तसेच मोबाइल ऍपचा पर्याय उपलब्ध असून ग्राहकांनी थकबाकी भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
...Read MoreADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002