तळेगाव दाभाडे येथे दुर्मिळ “चित्रांग नायकूळ’ आढळला
पिंपरी- चिंचवड
2017-11-16
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे येथे विद्याविहार कॉलनीच्या पार्किंगमध्ये चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप आढळला. नागरिकांनी तातडीने मावळ येथील वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य व सर्पमित्र हर्षल गरूड यांना याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर हर्षल गरुड यांनी सापाला पकडले. हा चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप असल्याचे लक्षात आले. या जातीचे साप हे बिनविषारी असतात. यांची सरासरी लांबी 40 सेमी (1 फूट 4 इंच) तर जास्तीत जास्त 93 सेमी (3 फूट 1 इंच) याचा रंग व आकार राखाडी-तपकिरी असा असून त्याच्या शरीरावर काळी किनार असलेले पिवळे खवले असतात. तर पोटाकडचा भाग पांढरा असतो. खवले डोक्याकडे गडद तर शेपटीकडे अस्पष्ट असतात. याच्या डोक्यावर काळी किनार असलेली इंग्रजी व्ही आकाराची खून असते.
हा साप जंगली पाली व छोटे सरडे खातो. नाणे घाट, फलटण, अहमदनगर, पुणे, सोलापूर तसेच मध्य प्रदेशातील असिरगढ भागात माळरान परिसरात हा साप शक्यतो आढळतो. हा साप दिनचर असून शांत स्वभावाचा आणि अत्यंत देखणा असतो. सर्प मित्र हर्षल गरुड यांनी या सापाला कुठेही इजा झालेली नसल्याचे तपासून त्याला इंद्रायणी नदीपात्राशेजारी सोडून दिले, अशी माहिती सर्प मित्र सागर कवळेकर यांनी दिली.