व्हीएस न्यूज – निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमुळे अडचणीत आलेले पिंपळे-निलख प्रभागातील भाजपचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांनी गुरूवारी सकाळी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. बनावट कागदपत्र दाखल करून निवडणूक लढवल्याप्रकरणी त्यांच्यावर सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तुषार कामठे यांनी अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर पोलिस त्यांच्या अटकेच्या तयारीत होते. पण, आज कामठे स्वत:हून सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या निवडणुकीत १२ वी उत्तीर्ण असल्याचे खोटे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. याप्रकरणी २७ ऑक्टोबरला सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून कामठे फरार होते. कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर २० दिवसांनी ते स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तुषार कामठे हे पिंपळे निलख येथील प्रभाग क्रमांक २६ (ब) येथून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सचिन साठे यांना मोठ्या फरकाने पराभूत करत निवडणूक जिंकली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002