दापोडी येथील हॅरिस ब्रिजवरून ८ महिन्याच्या बाळासह उडी घेत महिलेने आज सायंकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुरी असलम शेख (वय २०, रा. वाकड), असे महिलेचे नाव असून अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून बाळाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी औंध अग्निशामक दलाची गाडी असून जवान बाळाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीच्या सभेमध्ये अजेंड्यावरील विषय तहकूब करून ऐनवेळचे विषय मंजूर केले जात आहेत. ऐनवेळचे विषय घेण्यामध्ये ‘विधी’चे सभापती राजकारण करत आहेत. त्यामुळे यापुढे ‘विधी’, स्थायी समितीसह कोणत्याही विषय समितीत एकही ऐनवेळचा विषय घेऊ नयेत. अन्यथा या विरोधात न्यायालयात जाऊ, आंदोलने करु असा, इशारा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत अजेंड्यावर असलेले दोन विषय तहकूब करण्यात आले. तर, ऐनवेळचे सहा विषय सभेसमोर ठेवण्यात आले होते. परंतु, सहा विषयांपैकी विधी समितीने पाच ऐनवेळचे विषय मंजूर केले. तर, एकच विषय जाणीवपूर्वक वगळण्यात आला. विधी समितीच्या सभापती हे जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते, असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
ऐनवेळचे विषय मंजूर करायचे असतील तर सर्व सदस्यांचे विषय घेणे अपेक्षित होते. ऐनवेळचे विषय मंजूर करायचे नव्हते तर कुठलाच विषय मंजूर करायचा नव्हता. वाकड येथील स्थळ बदलचा विषय प्रशासनामार्फत आला होता. त्यामुळे या विषयाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते असे कलाटे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – हिंजवडीतील नामांकीत आयटी कंपनीत कामाला लावण्याच्या बहाण्याने 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपळे निलख येथे घडली.
राजीव ऊर्फ समीतकुमार संभुनाथ सिंग (श्रीमणी इस्टेट, भूमकर चौक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी विवेक शुक्ला (वय 29, रा. भूमकर चौक) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. विवेक यांच्या पत्नीला हिंजवडीतील नामांकीत आयटी कंपनीत कामाला लावण्यासाठी सिंग याने वेळोवेळी आपल्या खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करुन घेतले. मात्र, नोकरीला लावत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विवेक यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
पवना हॉस्पिटलमध्ये रि-प्लांटेशन शस्त्रक्रिया यशस्वी
व्हीएस न्यूज – डॉक्टर देव नाही; परंतु देवापेक्षा कमी नाही, याचा प्रत्यय सोमाटणे येथे पवना हॉस्पिटलमध्ये आला. येथील डॉक्टरांनी चक्क धडापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात याची चर्चा आहे.
मोनजिन शेख नामक एक वीस वर्षीय तरुण सोमाटणे येथे कामाकरिता आला असता त्याला काही दिवस होत नाहीत की दुर्दैव त्याला आडवे आले आणि काम करत असताना सिमेंट मिक्सरमध्ये अडकून त्याचा उजवा हात खांद्यापासून तुटून बाजुला पडला. त्याला त्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी लगेच तो हात पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे 12 तासांच्या अथक् प्रयत्नानंतर तो हात पुन्हा जोडण्यात आला आणि विशेष म्हणजे ही शत्रक्रिया यशस्वीही झाली. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सत्यजीत वाढोकर आणि डॉ. वर्षा वाढोकर यांनी उपचाराच्या खर्चाचा विचार न करता पेशंटवर तातडीने उपचार केले.
एका खोलीत या पेशंटला स्टॅबिलाईज करून त्याचे प्राण वाचवण्याचे व शरीरापासून पूर्णत: वेगळ्या झालेल्या हातावर दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये हातास पुन: प्रत्यारोपणासाठी सजीव ठेवण्याचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. केस “हाय रिस्क सर्जरी’ ची असल्याने आणि सहा तासांच्या आत हात पुन्हा जोडण्याचाच अवधी असल्याने प्लॅस्टिक सर्जन डॉ. संदीप नाफडे आणि ऑर्थोपिडीशियन डॉ. प्रवीण वाघमारे यांनी या रिस्कचे आव्हान स्वीकारले. सुमारे दीड-दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पेशंट ऑपरेशनसाठी फीट करण्यात त्यांना यश आले आणि त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले. डॉक्टर्स आणि स्टाफने सलग दहा तास शस्त्रक्रियेत व्यस्त राहून हे आव्हान पेलले. मंगळवार दि. 14मोनजिनला डिस्चार्ज देताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला लपवता आला नाही. या वेळी पत्रकारांशीही त्याने संवाद साधला. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही समाधान होते.
आर्थिक मदत गरजेची होती…
तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितले की, तो कोठून आला, त्याचे नाव काय, याचे मला काही देणे-घेण नाही. त्याला त्या वेळी आर्थिक मदतीची गरज होती आणि मी ती केली. मावळ तालुक्यातील कोणालाही वैद्यकीय मदत करण्यासाठी मी कधीही तत्पर आहे. मी केलेल्या मदतीपेक्षा त्याला हात परत मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कित्येक लाख मोजून मिळणार नाही. यावरून सुनील शेळके यांची समाजाप्रती निष्ठा लक्षात येते.
खरे तर हा पेशंट खूपच लकी म्हणावा लागेल, कारण कामगार असून यासाठी लागणारा पैसा तो उभा करू शकला नसता; परंतु सुनील शेळके यांच्यामुळे आज त्याला त्याचा हात परत मिळाला आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक् परिश्रमामुळे ही अवघड आणि खूप वेळखाऊ शत्रक्रिया यशस्वी पार पडली. अशा केसची स्टडी मेडिकल स्टुडंटस् आणि इतर डॉक्टर्सना अभ्यासासाठी व प्रॅक्टिस करताना मार्गदर्शक ठरते. त्यांची इत्थंभूत माहिती नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
डॉ. सत्यजीत वाढोकर, व्यवस्थापकीय संचालक, पवना मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल.
व्हीएस न्यूज – स्मार्ट सिटी योजनेसह विविध योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करणे आणि कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली, तसेच त्या सेलकरिता स्वतंत्रपणे आकृतीबंध निश्चित करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारित जेएनएनयुआरएम प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, पंतप्रधान आवास योजना, सीएसआर सेल, सिटी ट्रान्स्फॉमेंशन ऑफीस, अमृत योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. विशेषतः स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विविध कामे वेळेत पूर्ण करणे, त्या कामकाजात गतिमानता वाढविणे आवश्यक आहे. या कामकाजासाठी पालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापन केली आहे. त्या सेल करिता स्वतंत्र आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे.
पालिका प्रशासन विभागाने स्मार्ट सिटी सेल स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. प्रशासन विभागाने त्या सेलची रचना व आकृतीबंध निश्चित केला. तसेच त्या सेलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, कार्यालयीन अधिक्षक राजीव घुले, लेखापाल आबासाहेब चौधरी, लिपीक प्राजंल इंगळे, प्रशांत यादव आणि शिपाई एकनाथ येंचवाड यांची नियुक्ती करुन त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिलेला आहे.
दरम्यान, “स्मार्ट सिटी सेल’चे कामकाज करण्यास नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र, राज्य शासन व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडील आदेशानुसार कामे करावी लागणार आहे. तसेच सेलबाबत दैनंदिन कामकाजाचा अहवाल मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी प्रत्येक आठवड्यास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त हर्डीकर यांच्याकडे सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज – मोशीतील कोर्टाच्या नियोजित सुसज्ज इमारतीबरोबरच मोरवाडी कोर्टाच्या स्थलांतराबाबत पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी व उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय न्यायाधिशांची एकत्रित बैठक पुण्यात पार पडली. नव्या जागेतील इमारतीमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमधील नियोजित न्यायालये व या इमारतीच्या भाड्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पुणे शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री गवई, श्री बेदर, श्री कर्णिक, जिल्हा न्यायाधिश श्रीराम मोडक, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेश पुराणिक,ऍड. कालिदास इंगळे, ऍड. तुकाराम पडवळ, ऍड. कांता गोर्डे, ऍड. प्रदीप ढोले, ऍड. हर्षद नढे, ऍड. गणेश राऊत, ऍड. विकास बाबर, ऍड.नीलेश घोडेकर, ऍड. ज्ञानेश्वर होलगोली, ऍड. प्रतिभा हगवणे, ऍड. प्रसन्ना लोखंडे, ऍड. अतिश लांडगे, ऍड. किरण पवार, ऍड. सुहास पडवळ आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, नव्याने स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमध्ये सिनिअर डिव्हिजन कोर्ट, ऍडीशनल सेशन कोर्ट,कामगार न्यायालय, मोटर व्हेईकल ऍक्ट कोर्टासह नऊ प्रथम वर्ग न्यायालय सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या इमारतीचे भाडे कमी करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा करुन, भाडेनिश्चित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. उपस्थित न्यायाधिशांच्या या सर्व सूचनांचा आदर करुन,महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करु, असे आश्वासन बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी दिले.
व्हीएस न्यूज - अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्युमुळे सांगली पोलीस दलाच्या अब्रुचे राज्यात धिंडवडे निघाले आहे. या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (दि.15) ताब्यात घेतलेल्या आयुब शेख याचा घातपात केल्याची तक्रार त्याचा चुलतभाऊ शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. या तक्रारीवरुन पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना येत्या मंगळवारी (दि.21) जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.
अर्जदार शाहरुख शेख मावळ तालुक्यातील ताजे गावचे रहिवासी असून, बुधवारी (दि.15) त्यांना तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी फोन करुन, आयुब शेखच्या कुटुंबाविषयी चर्चा करुन, आम्ही त्याला पोलीस कर्मचारी रुममध्ये ठेवले असल्याचे सांगितले. मात्र, कोणत्या गुन्ह्यात अटक केली आहे, याविषयी त्यांनी शेख यांना कोणतीही माहिती दिली नाही. दुसऱ्यादिवशी शाहरुख शेख आपल्या वडीलांसह तळेगाव पोलीस स्टेशनला गेले, तसेच आयुबचे वडीलही पोलीस स्टेशनला गेले असता, सोनवणे यांनी त्यांना आयुबची भेट न घेऊ देताच हुसकावून लावल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे.
सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गेली चार दिवस आयुबचा कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे तळेगाव पोलीस आणि पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर यांनी आयुबचा घातपात केल्याची तक्रार शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. याची दखल घेत, येत्या मंगळवारी (दि.21)या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनवाणीला जबाब देण्यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयुब शेख हा सराईत गुन्हेगार असुन, पौड येथे 2010 मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात तो चार वर्षे शिक्षा भोगुन आला आहे. सध्या त्याला तळेगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून,न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरावडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांनी केलेले आरोप निराधार आहेत.
– वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन.
व्हीएस न्यूज - शहरातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित झोपडपट्टीतील नागरिकांना घरे मिळावीत, याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुन:विकास प्रकल्प मिलिंदनगरमध्ये राबविला. मात्र, या पुनर्वसन प्रकल्पातील अनेक मूळ लाभार्थी अन्यत्र स्थलांतरीत झाले असून, त्या लाभार्थ्यांनी घरे भाडोत्री दिली आहे. विशेषत: “झोनिपु’ कार्यालयातील एका लिपिकाने आर्थिक संगणमताने झोपडपट्टी धारकांना बोगस कागदपत्राच्या आधारे फोटोपास बनवून त्यांना लाभार्थी बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत लिपिकासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करुन कडक कारवाईची मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे शहर सरचिटणीस भीमराव तुरुकमारे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे 72 घोषित व अघोषित झोपडपट्टी कार्यरत आहेत. शहरातील झोपडपट्यांचे प्रमाण कमी करुन तेथील नागरिकांना घरे उपलब्ध करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाद्वारे शहरातील अनेक झोपड्यांचे 2002 मध्ये सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना फोटो पास बनवून त्यांची यादी तयार केलेली आहे. त्यानुसार त्या रहिवाशांचे पुनर्वसनासाठी “एसआरए’ अतंर्गत घरांचे प्रकल्प राबविलेले आहेत. महापालिकेने पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये नागरिकांच्या घरांसाठी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प टप्पा क्रमांक-2 राबविला. त्या पुनर्वसन प्रकल्पांतील तथागत हौसिंग सोसायटीत अनेक बोगस लाभार्थींना घरांचा लाभ दिला असून, लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यासाठी बोगस कागदपत्राचा वापर करण्यात आला आहे.
त्या पुनर्वसन प्रकल्पात शेकडो मूळ लाभार्थी नागरिक वास्तव्य करीत नाहीत. त्यांनी अन्यत्र घरे घेवून प्रकल्पातील त्यांची घरे भाडोत्री दिली आहे. तसेच एकाच लाभार्थ्यांला संजय गांधीनगर झोपडपट्टीत फोटोपास देवूनही त्याला मिलिंदनगरमध्ये घराचा लाभ मिळाला. पण, त्यानेही पूर्वीच्याच ठिकाणी वास्तव्य करुन ते घर भाड्याने दिले आहे. दरम्यान, महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्राचा आधार घेवून फोटोपास देत लाभार्थी केले आहे. झोपडपट्टी सर्व्हेक्षणात घरांसाठी पात्र ठरलेल्या काही नागरिकांची नावे गायब करुन लक्ष्मी दर्शन केलेल्यांची नावे संभाव्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यादीत समाविष्ट करत त्यांना फोटोपास दिलेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील मूळ लाभार्थी घरापासून वंचित राहू लागली आहेत.
सर्वसामान्य माणसांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे. याकरिता झोनिपु प्रकल्प राबविला जातो. परंतु, झोनिपु कार्यालयातील एका लिपिकाने दलाली सुरु केली आहे. त्या लिपिकांने अनेक लाभार्थ्यांची बनावट कागदपत्राच्या सहाय्याने आर्थिक हितसंबंध जोपासत घराचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरापासुन वंचित राहावे लागत आहे. त्या लिपिकाने गौतमनगर, मिलिंदनगर याठिकाणच्या प्रकल्पांत बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करुन त्यांना लाभार्थी केले आहे.
व्हीएस न्यूज – वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावरील काही घरे रस्त्यात जाणार आहेत. त्या घर मालकांना प्राधिकरणाने नोटीसा बजाविल्या आहेत. मात्र, आपली घरे वाचवीत, अथवा घरच्या बदल्यात घर मिळावे, याकरिता वाल्हेकरवाडी येथील दत्त मंदिरासमोर बांधितांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी घराबाबत असलेली मागणी प्रशासनाकडून सोडवून न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने बाधितांनी उपोषण मागे घेतले आहे.
वाल्हेकरवाडी-रावेत या मार्गावरील घरे वाचावीत किंवा घराच्या बदल्यात घर अथवा जागा प्रशासनाने द्यावी, या मागणीकरिता वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. महापालिका व नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या भागाचे रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन झाले नसल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. त्या रस्ता-रुंदीकरणामध्ये काही बैठी घरे बाधित होत आहेत. त्या घरांना खाली करण्याच्या प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यावर बधितांनी ग्रामपंचायतची परवानगी घेऊन घरे बांधली आहेत. ही आमची घरे अनधिकृत व रस्ता बाधित कसे ठरतात. या बाबत आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा व आम्हाला घराच्या बदल्यात घरे द्यावीत, या मागणीसाठी शशिकांत खाडे, प्रवीण देशमुख, अरुण देशमुख, पोपट खडतरे, बाळासाहेब गुळुंजकर, शरद पवार, हसीना शेख, शारदा नाईकनवरे, कमल शिंपी, मंदा सरोदे, माधुरी वायकर, नदाफ पठाण, शोभा इंगळे आदी आमरण उपोषण करीत होत.
दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्या नागरिकांना आपल्या मागण्यांवर प्रशासनाशी चर्चा करुन योग्य तो तोडगा काढून न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, शिवसेनेचे सल्लागार भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदींच्या उपस्थित होते. तसेच नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर भोंडवे, सचिन शिवले, नाना मरळ, छावाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील आदींनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती नागरिकांनी केली होती.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002