व्हीएस न्यूज - शहरातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित झोपडपट्टीतील नागरिकांना घरे मिळावीत, याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुन:विकास प्रकल्प मिलिंदनगरमध्ये राबविला. मात्र, या पुनर्वसन प्रकल्पातील अनेक मूळ लाभार्थी अन्यत्र स्थलांतरीत झाले असून, त्या लाभार्थ्यांनी घरे भाडोत्री दिली आहे. विशेषत: “झोनिपु’ कार्यालयातील एका लिपिकाने आर्थिक संगणमताने झोपडपट्टी धारकांना बोगस कागदपत्राच्या आधारे फोटोपास बनवून त्यांना लाभार्थी बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत लिपिकासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करुन कडक कारवाईची मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे शहर सरचिटणीस भीमराव तुरुकमारे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे 72 घोषित व अघोषित झोपडपट्टी कार्यरत आहेत. शहरातील झोपडपट्यांचे प्रमाण कमी करुन तेथील नागरिकांना घरे उपलब्ध करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेने झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाद्वारे शहरातील अनेक झोपड्यांचे 2002 मध्ये सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना फोटो पास बनवून त्यांची यादी तयार केलेली आहे. त्यानुसार त्या रहिवाशांचे पुनर्वसनासाठी “एसआरए’ अतंर्गत घरांचे प्रकल्प राबविलेले आहेत. महापालिकेने पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये नागरिकांच्या घरांसाठी झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प टप्पा क्रमांक-2 राबविला. त्या पुनर्वसन प्रकल्पांतील तथागत हौसिंग सोसायटीत अनेक बोगस लाभार्थींना घरांचा लाभ दिला असून, लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यासाठी बोगस कागदपत्राचा वापर करण्यात आला आहे.
त्या पुनर्वसन प्रकल्पात शेकडो मूळ लाभार्थी नागरिक वास्तव्य करीत नाहीत. त्यांनी अन्यत्र घरे घेवून प्रकल्पातील त्यांची घरे भाडोत्री दिली आहे. तसेच एकाच लाभार्थ्यांला संजय गांधीनगर झोपडपट्टीत फोटोपास देवूनही त्याला मिलिंदनगरमध्ये घराचा लाभ मिळाला. पण, त्यानेही पूर्वीच्याच ठिकाणी वास्तव्य करुन ते घर भाड्याने दिले आहे. दरम्यान, महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्राचा आधार घेवून फोटोपास देत लाभार्थी केले आहे. झोपडपट्टी सर्व्हेक्षणात घरांसाठी पात्र ठरलेल्या काही नागरिकांची नावे गायब करुन लक्ष्मी दर्शन केलेल्यांची नावे संभाव्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यादीत समाविष्ट करत त्यांना फोटोपास दिलेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील मूळ लाभार्थी घरापासून वंचित राहू लागली आहेत.
सर्वसामान्य माणसांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे. याकरिता झोनिपु प्रकल्प राबविला जातो. परंतु, झोनिपु कार्यालयातील एका लिपिकाने दलाली सुरु केली आहे. त्या लिपिकांने अनेक लाभार्थ्यांची बनावट कागदपत्राच्या सहाय्याने आर्थिक हितसंबंध जोपासत घराचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरापासुन वंचित राहावे लागत आहे. त्या लिपिकाने गौतमनगर, मिलिंदनगर याठिकाणच्या प्रकल्पांत बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करुन त्यांना लाभार्थी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002