पवना हॉस्पिटलमध्ये रि-प्लांटेशन शस्त्रक्रिया यशस्वी
व्हीएस न्यूज – डॉक्टर देव नाही; परंतु देवापेक्षा कमी नाही, याचा प्रत्यय सोमाटणे येथे पवना हॉस्पिटलमध्ये आला. येथील डॉक्टरांनी चक्क धडापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात याची चर्चा आहे.
मोनजिन शेख नामक एक वीस वर्षीय तरुण सोमाटणे येथे कामाकरिता आला असता त्याला काही दिवस होत नाहीत की दुर्दैव त्याला आडवे आले आणि काम करत असताना सिमेंट मिक्सरमध्ये अडकून त्याचा उजवा हात खांद्यापासून तुटून बाजुला पडला. त्याला त्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी लगेच तो हात पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे 12 तासांच्या अथक् प्रयत्नानंतर तो हात पुन्हा जोडण्यात आला आणि विशेष म्हणजे ही शत्रक्रिया यशस्वीही झाली. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सत्यजीत वाढोकर आणि डॉ. वर्षा वाढोकर यांनी उपचाराच्या खर्चाचा विचार न करता पेशंटवर तातडीने उपचार केले.
एका खोलीत या पेशंटला स्टॅबिलाईज करून त्याचे प्राण वाचवण्याचे व शरीरापासून पूर्णत: वेगळ्या झालेल्या हातावर दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये हातास पुन: प्रत्यारोपणासाठी सजीव ठेवण्याचे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. केस “हाय रिस्क सर्जरी’ ची असल्याने आणि सहा तासांच्या आत हात पुन्हा जोडण्याचाच अवधी असल्याने प्लॅस्टिक सर्जन डॉ. संदीप नाफडे आणि ऑर्थोपिडीशियन डॉ. प्रवीण वाघमारे यांनी या रिस्कचे आव्हान स्वीकारले. सुमारे दीड-दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पेशंट ऑपरेशनसाठी फीट करण्यात त्यांना यश आले आणि त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले. डॉक्टर्स आणि स्टाफने सलग दहा तास शस्त्रक्रियेत व्यस्त राहून हे आव्हान पेलले. मंगळवार दि. 14मोनजिनला डिस्चार्ज देताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला लपवता आला नाही. या वेळी पत्रकारांशीही त्याने संवाद साधला. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही समाधान होते.
आर्थिक मदत गरजेची होती…
तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितले की, तो कोठून आला, त्याचे नाव काय, याचे मला काही देणे-घेण नाही. त्याला त्या वेळी आर्थिक मदतीची गरज होती आणि मी ती केली. मावळ तालुक्यातील कोणालाही वैद्यकीय मदत करण्यासाठी मी कधीही तत्पर आहे. मी केलेल्या मदतीपेक्षा त्याला हात परत मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कित्येक लाख मोजून मिळणार नाही. यावरून सुनील शेळके यांची समाजाप्रती निष्ठा लक्षात येते.
खरे तर हा पेशंट खूपच लकी म्हणावा लागेल, कारण कामगार असून यासाठी लागणारा पैसा तो उभा करू शकला नसता; परंतु सुनील शेळके यांच्यामुळे आज त्याला त्याचा हात परत मिळाला आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक् परिश्रमामुळे ही अवघड आणि खूप वेळखाऊ शत्रक्रिया यशस्वी पार पडली. अशा केसची स्टडी मेडिकल स्टुडंटस् आणि इतर डॉक्टर्सना अभ्यासासाठी व प्रॅक्टिस करताना मार्गदर्शक ठरते. त्यांची इत्थंभूत माहिती नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
डॉ. सत्यजीत वाढोकर, व्यवस्थापकीय संचालक, पवना मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002