व्हीएस न्यूज – स्मार्ट सिटी योजनेसह विविध योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करणे आणि कामकाजात गतिमानता आणण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली, तसेच त्या सेलकरिता स्वतंत्रपणे आकृतीबंध निश्चित करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारित जेएनएनयुआरएम प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, पंतप्रधान आवास योजना, सीएसआर सेल, सिटी ट्रान्स्फॉमेंशन ऑफीस, अमृत योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. विशेषतः स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विविध कामे वेळेत पूर्ण करणे, त्या कामकाजात गतिमानता वाढविणे आवश्यक आहे. या कामकाजासाठी पालिकेने स्वतंत्र कक्षाची स्थापन केली आहे. त्या सेल करिता स्वतंत्र आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे.
पालिका प्रशासन विभागाने स्मार्ट सिटी सेल स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. प्रशासन विभागाने त्या सेलची रचना व आकृतीबंध निश्चित केला. तसेच त्या सेलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, कार्यालयीन अधिक्षक राजीव घुले, लेखापाल आबासाहेब चौधरी, लिपीक प्राजंल इंगळे, प्रशांत यादव आणि शिपाई एकनाथ येंचवाड यांची नियुक्ती करुन त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिलेला आहे.
दरम्यान, “स्मार्ट सिटी सेल’चे कामकाज करण्यास नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र, राज्य शासन व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडील आदेशानुसार कामे करावी लागणार आहे. तसेच सेलबाबत दैनंदिन कामकाजाचा अहवाल मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी प्रत्येक आठवड्यास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त हर्डीकर यांच्याकडे सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002