व्हीएस न्यूज - अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्युमुळे सांगली पोलीस दलाच्या अब्रुचे राज्यात धिंडवडे निघाले आहे. या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (दि.15) ताब्यात घेतलेल्या आयुब शेख याचा घातपात केल्याची तक्रार त्याचा चुलतभाऊ शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. या तक्रारीवरुन पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना येत्या मंगळवारी (दि.21) जबाब देण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.
अर्जदार शाहरुख शेख मावळ तालुक्यातील ताजे गावचे रहिवासी असून, बुधवारी (दि.15) त्यांना तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी फोन करुन, आयुब शेखच्या कुटुंबाविषयी चर्चा करुन, आम्ही त्याला पोलीस कर्मचारी रुममध्ये ठेवले असल्याचे सांगितले. मात्र, कोणत्या गुन्ह्यात अटक केली आहे, याविषयी त्यांनी शेख यांना कोणतीही माहिती दिली नाही. दुसऱ्यादिवशी शाहरुख शेख आपल्या वडीलांसह तळेगाव पोलीस स्टेशनला गेले, तसेच आयुबचे वडीलही पोलीस स्टेशनला गेले असता, सोनवणे यांनी त्यांना आयुबची भेट न घेऊ देताच हुसकावून लावल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे.
सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गेली चार दिवस आयुबचा कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे तळेगाव पोलीस आणि पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर यांनी आयुबचा घातपात केल्याची तक्रार शाहरुख शेख यांनी वडगाव मावळ न्यायालयात केली आहे. याची दखल घेत, येत्या मंगळवारी (दि.21)या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनवाणीला जबाब देण्यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक, देहूरोडचे पोलीस उपअधिक्षक गणपत माडगुळकर व तळेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयुब शेख हा सराईत गुन्हेगार असुन, पौड येथे 2010 मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात तो चार वर्षे शिक्षा भोगुन आला आहे. सध्या त्याला तळेगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून,न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरावडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांनी केलेले आरोप निराधार आहेत.
– वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002