व्हीएस न्यूज – महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्याजागी शिक्षण समिती स्थापन होण्याचा निर्णय रेंगाळला असताना, महापालिका अधिनियमानुसार पालिकेत आणखी तीन नवीन समित्यांची नेमणूक प्रस्तावित आहे. माध्यमिक, पूर्व प्राथमिक शाळा आणि तांत्रिक समितीबरोबरच स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती), वैद्यकीय आणि आरोग्य समिती आणि गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण समितीची स्थापना करण्याचा निर्णय महासभेसमोर आहे. पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची आवश्यकता विचारात घेऊन समिती स्थापनेचा निर्णय होणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम 30 (1) अन्वये महानगरपालिकेला समिती नेमण्याचे अधिकार आहेत. याची अंमलबजावणी करून शिक्षण समिती नेमण्यासाठी पूर्वीचे शिक्षण मंडळ 2 जून रोजी शासनाच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आले. परंतु, याला सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पालिका प्रशासनाने शिक्षण समिती स्थापण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. आता शिक्षण समिती (माध्यमिक, पुर्व प्राथमिक शाळा आणि तांत्रिक समिती)बरोबरच स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती), वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समिती तसेच गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण या समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. इतर समित्या सोडल्या तर शिक्षण समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी दिरंगाई करत आहेत. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या कामकाजावर याचा परिणाम पडू लागला आहे,अशा तक्रारी आहेत.
स्थापत्य समिती (सार्वजनिक बांधकाम समिती) स्थापन केल्यास शहरातील विकास कामांचे निर्णय समितीचे सभापती आणि नियुक्त सदस्यांच्या अधिपत्याखाली बैठकीत होतील. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राहील. विषय मंजुरीचे सर्वाधिकार समितीच्या सभापती यांनाच असणार आहेत. वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समितीअंतर्गत शहरातील रुग्णालये व नागरिकांच्या आरोग्यासंबंधित महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार निर्गमित होतील. त्याचबरोबर औषध, मशिन, रुग्णालयातील वस्तुंच्या खरेदीचे निर्णय समितीच्या बैठकीत प्रशासकीय शिफारशीनंतर घेतले जातील. तसेच, गलिच्छ वस्ती सुधार, गृहनिर्माण आणि समाजकल्याण समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या घराचे निर्णय होतील. सामाजिक हित जोपासून झोपडपट्टीचा विकास साधण्यासाठी ही समिती महत्वाचे निर्णय घेईल. परंतु, शिक्षण समिती नेमण्याचे कोणतेच संकेत मिळत नसल्यामुळे यासह अन्य पर्यायी समित्या नेमण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे. मंगळवारच्या (दि. 28) महासभेने देखील हा प्रस्ताव तहकुब केला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे बहुतांश फाईली प्रलंबित राहिल्या आहेत. या विभागाचा प्रभारी कार्यभार प्राथमिक विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांच्याकडे आहे. त्यांच्यावर प्राथमिक विभागाच्या कामकाजाचा ताण असल्याने त्यांना माध्यमिक विभागासाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे माध्यमिक विभागाच्या 18 शाळांचे महत्वपूर्ण निर्णय वेळेवर होत नसल्याने विद्यार्थी हितावर गदा आली आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेच्या एकत्रीकरणाचा निर्णय किती हिताचा आहे, हे सुद्धा संशयास्पद आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे एकतर्फी निर्णय झाला आहे. तो निर्णय चुकीचा ठरल्यामुळे एकत्रीत केलेल्या चार प्राथमिक शाळा पुन्हा दोन सत्रात सुरू केल्याचे उदाहरण समोर आहे.
व्हीएस न्यूज - राज्यातील सर्व बॅंकेसह वित्त व्यवहार होत असलेल्या ठिकाणी व्यापारी आस्थापना व दुकाने यांचे व्यवहार भाषा व जाहिरात फलक मराठी मधून असावेत यासाठी प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करीत या मागणीचे निवेदन देऊन आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आळंदीत कामकाज न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देण्यास पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मनोज खराबी, खेड तालुका उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, तृणाल गांडेकर, आळंदी शहर माजी शहराध्यक्ष निलेश बापु घुंडरे, उपाध्यक्ष तुषार नेटके, शहर संघटक प्रसाद बोराटे, चाकण विभाग अध्यक्ष किरण पार्टे, सागर सावंत, संदीपान घायाळ, तुकाराम यमगर, ईश्वर सलगर, विनोद लोखंडे, कुष्णा आवटे, शैलेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व बॅंका व ए.टी.एम.मधील वित्त व्यवहार हा मराठीत व्हावा तसेच दुकानदारांनी आपापल्या दुकानांचे फलक ठळक स्वरूपात मराठीत लिहावेत यासाठी सुचविले आहे. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करीत आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी राजभाषा वापर वाढावा यासाठी शहरातील बॅंकांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे.यापुढील काळात यासाठी प्राधान्य न दिल्यास मनसे या मागणीसाठी तीव्र आंदोलन छडेल असा इशारा देण्यात आला आहे.
बॅंका व ए.टी.एम मधील व्यवहार हा इतर भाषांप्रमाणे मराठीत सुरु व्हावा, मराठीत महाराष्ट्रात व्यवहार व्हावा यासाठी शासनाचे तसेच वित्त व्यवस्थापनाचे सूचना देखील आहेत. मात्र नियमांप्रमाणे कामकाज होत नसल्याने या मागणीचे निवेदन देण्यात आल्याचे मनसे प्रमुख निलेश घुंडरे यांनी सांगितले. पुढील दिवसाची मुदत यासाठी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिवसांच्या आत मराठीचा वापर आळंदीतवाढला नाही तर या मागणीसाठी आळंदी शहर मनसे आपल्या स्टाईल ने आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या व विद्यार्थींच्या मासिक पासमध्ये केलेली भाडेवाढ अन्यायकारक असून ती त्वरीत रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक जन आंदोलन कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांचा मासिक पास हा 450 वरून 700 रूपये, विद्यार्थी पास 600 वरून थेट 750 रूपये तर सामान्य पासच्या दरामध्येही मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून त्वरीत रद्द करावी. ज्येष्ठ नागरिकांना,विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी रूपनर, विश्वनाथ खंडाळे यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता नेहरुनगर येथे घडली. रोहन नंदकुमार घोडके (वय 25, रा. कुलदिप अंगण सोसायटी, डी वींग, नेहरुनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी घरी कोणी नसताना रोहनने चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर त्याला तातडीने डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहनच्या आत्महत्येचे अद्याप कारण कळाले नाही. रोहनची आई डी वाय पाटील रुग्णालयात नर्स होत्य़ा. त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - भावाला भेटण्यासाठी जाणाऱ्या एका दुचाकीस्वार तरूणाचा अज्ञात मोटारीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मोशी आळंदी रोडवर घडली.
ओमप्रकाश नारायण सिरवी (चौधरी) (वय-22, रा. पिंपळे-गुरव) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचे नातेवाईक मोहनलाल चौधरी (वय-54) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मोशीत राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात होता. मोशी आळंदी रस्त्यावर सस्तेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओमप्रकाशच्या दुचाकीला अज्ञात मोटारीने जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता मोटार चालक पसार झाला.
फौजदार मुळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - कचरा वेचत असताना क्रेनने धडक दिल्यामुळे एका वृध्द महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना 22 नोव्हेंबर रोजी एमआयडीसीतील एम स्कवेअर कंपनीत सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.
रूक्मिणी लक्ष्मण साळवे (वय-90, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा रामहरी साळवे (वय-66) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एमआयडीसीतील एम स्कवेअर कंपनीत साळवे या 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता कचरा वेचत होत्या. यावेळी क्रेनने साळवे यांना जोरदार धडक दिली. त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
फौजदार गायकवाड अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - चारित्र्यावर संशय घेवून शारिरीक व मानसिक छळाला कंटाळलेल्या विवाहितेने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी वाकड येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना ऊर्फ निशा सिध्दार्थ गायकवाड (वय-30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सिध्दार्थ सोमनाथ गायकवाड, सासरे सोमनाथ गायकवाड,दिर शाम सोमनाथ गायकवाड यांच्यासह दोन महिला (सर्व रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेची आई सुशिला भोसले (वय-55, रा. झाफराबाद, जालना) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना व सिध्दार्थ यांचे दोन वर्षापुर्वी लग्न झाले आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासऱ्यांच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. तिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला विषारी औषध पिण्यास भाग पाडले.
फौजदार एम.एल. जाधव अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड प्रभाग क्र. 10 येथील इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या इमारतींची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदिरा नगर पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येथिल नागरीकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्या इमारतींचे जिने तुटलेले असून, पावसाळ्यात टेरेस-भिंतींमधून पाणी झिरपत असते, इमारतींमधील शौचालयांचे पाईप्स तुटल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे कचरा जमा करण्यासाठी पालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या घंटागाड्यांपैकी एकही घंटागाडी याठिकाणी आत्तापर्यंत आलेली नाही. त्यामुळे सोसायट्यांच्या सभोवती कचऱ्यांचे ढिग लागले आहेत. परिणामी रोगराई पसरत आहे. येथील शौचालयांचे ड्रेनज वारंवार जाम होउन मैला बाहेर येत असतो, त्यामुळे परिसरात दुर्गधी पसरुन लोकांना त्याचा त्रास होत आहे. म्हणून ड्रेनेज लाईन्स नविन टाकण्यात याव्यात, अशी विविध समस्या इंदिरानगर प्रकल्पात असून तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी बच्छाव यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - वर्ग सुरु असताना बाहेरील पॅसेजमधील साफ सफाईचे काम करताना स्लिपरच्या आवाजामुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा. साबण, ॲसिड, फिनाईल मिश्रीत पाण्यामुळे सफाई कर्मचारी अनेकदा पाय घसरुन पडले. त्यातून छोट्या मोठ्या दुखापती झाल्या. यावर काय तरी उपाय शोधला पाहिजे. या हेतूने प्रा. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी सुनिता कांबळे आणि सहका-यांनी स्लिपर चप्पलवर अनेक प्रयोग करुन बहुउपयोगी स्लिपरचे डिझाईन तयार केले. यासाठी प्रा. राहुल बावणे यांनी सहकार्य केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) मधील सफाई कर्मचारी बाळू थोपटे, सुनिता कांबळे, मिना सांवत, जय्यमा सुका,जयमाला कांबळे, दामन्ना देसाई, शोभा राऊत, सुनंदा पारधे, सुगलाबाई बिराजदार, शुभंम्मा बैरबोईना आणि रेखा गाडे यांनी स्लिपरला वरील बाजूने प्लॅास्टिकच्या कॅप लावून ‘स्लिपर विथ व्हॅक्युम कप इन हिल्स’चे बहुउपयोगी डिझाईन तयार केले. त्याचे स्वामित्व हक्क मिळविण्यासाठी प्रा. डॉ. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील भारतीय पेटंट नोंदणी कार्यालयात सीबीआर क्र. 21285 अर्ज क्र. 201721040069 अर्ज दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना प्रा. बावणे यांनी सांगितले की, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयातून चालू शैक्षणिक वर्षांत आतापर्यंत 70 पेटंटची नोंदणी करण्यात आली आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, कर्मचारी नेहमीच नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावण्याच्या प्रयत्नात असतात. सफाई कर्मचारी बाळू थोपटे, सुनिता कांबळे यांनी या बहुउपयोगी स्लिपर बाजारात मिळतात का? याचा शोध घेतला. अशा स्लिपर कोणीही बनवत नाहीत. त्यामुळे आपल्या सारख्या इतर सर्व सफाई कर्मचा-यांना अशा स्लिपर मिळाव्यात या हेतूने प्रयत्न केले. या बहुउपयोगी स्लिपर वापरल्यामुळे अनेकवेळ काम करुन देखील पायाच्या टाचा दुखणार नाहीत तर अॅक्युप्रेशरमुळे पायाला आराम मिळेल. अशा स्लिपरचा उपयोग औद्योगिक कारखान्यातील, रुग्णालय, शाळा, मोठे हॉल, सभागृह अशा सर्व ठिकाणी साफ सफाईच्यावेळी करता येईल. यातील कॅपमुळे स्लिपर टाचेला पकडून राहते. त्यामुळे पाय घसरणार नाही. पावसाळ्यात ही स्लिपर वापरुन चालताना चिखल पाणी उडणार नाही. ज्येष्ठ नागरीक, महिला व्यायाम करताना बुट वापरत नाहीत. त्यांना या स्लिपरचा खूप उपयोग होईल. रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, परिचारीका, डॉक्टर यांना देखील याचा उपयोग होऊ शकतो. अशी माहिती प्रा. बावणे यांनी दिली. सफाई कर्मचा-यांच्या या संशोधक व चिकित्सक वृत्तीची दखल घेऊन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना मिळणार मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या (पीसीसीओईआर) संगणक आणि ई अँड टीसी विभागात फ्री ओपन सोर्स सेंटर (फॉस) केंद्राचे उद्घाटन इन्फोसिस एज्युकेशन अँड रिसर्चचे दिनेश अनंतवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अनंतवार यांनी या सेंटरचा अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले आणि हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मिळणार्या विविध संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, प्रा. महेंद्र साळुंके, प्रा. चंद्रशेखर भावसार, प्रा. शाम मानकर, प्रा. मयुरा येवले, प्रा. सोनाली कणसे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे आय सी टी धोरणानुसार आणि मुंबई आयआयटीच्या सहयोगाने स्पोकन ट्युटोरियल अंतर्गत फॉस सेंटर उभारले आहे. या ‘फॉस’ (FOSS - FREE OPEN SOURCE CENTER) सेंटरमध्ये पिंपरी चिंचवड शहरात शिकणा-या अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत सर्व सुविधा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेणा-या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देखिल देण्यात येईल. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटरच्या सी, सी++, जावा, पायथॉन, पीचपी, लिनकम, लायब्ररी ऑफीस, स्कायलॅब यासारख्या अनेक सेल्फ लर्निंग प्रोग्रॅमींगचा अभ्यास करता येईल. अशीही माहिती प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांनी दिली. विभागप्रमुख प्रा. महेंद्र साळुंके व प्रा. चंद्रशेखर भावसार यांनी फॉसच्या अंतर्गत होणार्या माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभियानाची माहिती दिली. हे केंद्र उभारण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवार्धन पाटील, भाईजान काझी, संचालक डॉ. गिरीश देसाई आणि आयआयटी मुंबईच्या विद्या कदम यांनी मार्गदर्शन केले. प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी सूत्रसंचालन, प्रा. स्मिता लांडगे यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - भारतीय संविधानामुळे भारतासारख्या खंडप्राय, बहुसंस्कृती संपन्न देशात जात, वर्ण, वंश, पंथ, धर्म, लिंग या घटकांवर आधारीत कोणताही भेदभाव न मानता सर्व नागरिकांना समान आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय व संधी मिळत आहे. भारतीय संविधान हे विसाव्या शतकातील सर्वांत मोठा आदर्श ग्रंथ आहे. यामुळे प्रजासत्ताक व्यवस्थेत सर्व अधिकार नागरिकांना आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता या सार्वभौम राष्ट्रात वृध्दीगंत होण्यासाठी सर्वांनी या आदर्श संविधानाचे पालन केले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. यशोधरा नितनवरे यांनी केले.
भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव, संयुक्त जयंती समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त रविवारी (दि. 26 नोव्हेंबर 17) संस्थेचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल आणि माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे गुरव येथील सृष्टी हॉटेल चौकात नागरिकांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांनी दहशतवाद विरोधी तसेच देशात न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता वाढीस लागावी यासाठी प्रयत्नशील रहाण्याची उपस्थितांना सामुहिक शपथ दिली. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, एनसीपीचे युवा नेते शाम जगताप, तानाजी जवळकर, राहुल काकडे, हरीष गायकवाड, हुसेन मुलाणी, संजय साळवे, संदिप नितनवरे, चंद्रकांत वाखोडे, रवी कांबळे, लता शार्दुल, उषा शिंदे, अर्चना सिंग, शितल पाथाडे, प्रदिप पवार, निलचंद्र निकम आदी उपस्थित होते.
डॉ. नितनवरे म्हणाल्या की, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकशाही संपली की, सामान्य लोकांचे जीवन उध्वस्त होईल. हे व्हायला नको असेल तर भारताच्या संविधानाचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. देशातील सव्वाशे कोटींहून जास्त नागरिकांचे सर्वांगीण हित या संविधानाचे पालन करण्यामुळे होईल.
व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने नेहरूनगर येथील आंबेडकर नगरात "संविधान गौरव दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने भारताच्या संविधानाचे जनक डॉ. भीमराव आंबेडकर यांना स्मरण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन शहराध्यक्ष उमेश बनसोडे यांनी केले.
प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष अशोक राव मोरे यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचा गौरव करीत जातीवादी संघटन पासून सावध राहण्याचे आवाहन केले. यावेळी, शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष अर्जुन शिवाजी गायकवाड, मास्टर शाहिद बारस्कर, साहिब राव निंबर्गीकर, सन्मुख आयगोळे, कल्याणी साखरे, परशुराम आयगोळे, चंद्रशहा आयगोळे, रुक्मिणी आयगोळे, शारदा आयगोळे, सुधारानी आयगोळे, रमाबाई आयगोळे, शिवाजी आयगोळे, सिद्धाराम आयगोळे, महादेव कांकरी, शिवलिंग बनसोडे, तुकाराम चंदनशिवे, मौला नदाफ, फातिमा नदाफ, जयश्री निसर्गिकर, पार्वती बनसोडे, शिक्षिका अरूणा चव्हाण, नजीर शेख, रुक्मादीं शेख,सुरेखा बनसोडे, नामदेव मलंगणाकार, शोभा गवई, कल्पना बाई चंदनशिवे, रेखा कामदारी, राजश्री कांकारे, पुतनाबाई गायकवाड, भारतबाई, वैशाली बनसोडे, दत्ता बनसोडे, मिलिंद बनसोडे, दुर्गाबाई बजे आदी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002