व्हीएस न्यूज - चऱ्होली येथील डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट व स्कूल ऑफ एमसीए आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27,27 फेब्रुवारी रोजी संयुक्त समकालीन धोरण: जागतिक दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिसवांदाचे आयोजन केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन चऱ्होली येथील डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात सकाळी 11 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे संस्थापक डॉ अजिंक्य डी वाय पाटील व आय. आय. एम. तिरुचिरापल्ली चे संचालक डॉ भीमराया मेत्री यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी केबांग्सन मलेशिया विद्यापीठाचे विशेष अतिथी डॉ जॉन अंतोनी झेवियर मॉरिशस देशाच्या डॉ अनिता रामागत्ती वौंग , कॅनडा देशाचे डॉ कृष्णलाल, मौरीशस देशाचे डॉ महेंद्रनाथ मोटा, कोलंबो श्रीलंकेचे डॉ अशोका जीनादासा हे मार्गदर्शन करणार आहेत. या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत श्रीलंकेच्या आरोषा जेनिफर मेरी, बांगलादेशाचे डॉ सैफुल मजीद, जाफना विद्यापीठ श्रीलंकेचे डॉ बी निमालाथासन, जपान देशाचे तोमियो एसोगयी, अन्नामलाई विद्यापीठ तामिळनाडूचे डॉ एस. पंचानाथम आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रामधील भारतातून व इतर देशातून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी आवाहन केले आहे.
व्हीएस न्यूज - मराठी असोसिएशन पर्थ तर्फे ऑस्ट्रेलियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा सोहळा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी अनेक भारतीय नागरिक, तसेच स्थानिक विदेशी नागरिकांनी देखील आवर्जून उपस्थिती लावून छत्रपती शिवरायांप्रती आदर व्यक्त केला. यावेळी शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन, बालशिवाजींचा पाळणा, शिवाजीमहाराजांचे आचार व विचार, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, जिजाऊंचे संस्कार यांसारख्या विषयावर छान माहीती, मराठी अस्मितेवरील समुहगान, लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषा, शिवकालीन ऐतिहासिक प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवराय व जिजाऊंच्या वेशातले बालचमू शोभून दिसते होते. असोसिएशनच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर अयोजित करीत परदेशात मराठी अस्मितेचा आदर्श निर्माण केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सदर उपक्रम चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरत आहे. यावेळी असोसिएशनचे कमिटी मेंबर व इतर सभासद उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढल्याने आज सकाळपासूनच पुण्याकडे जाणार्या मार्गावर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून या मार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वेग मंदावला होता. त्यातच अनेक मोठी अवजड वाहने वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्टया असल्याने अनेक पर्यटक फिरायला जाण्याचा बेत आखत सकाळच्या सत्रात घराबाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता, अतिक्रमणासह विविध विकास कामांचा आढावा आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज घेतला.
आयुक्त कक्षात झालेल्या या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता राजन पाटील,रवींद्र दुधेकर, अय्युबखान पठाण, प्रवीण तुपे, यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
शहरातील स्वच्छतेसाठीची यंत्रणा सक्षम करावी. शहरातील उड्डाणपूल व मुख्य रस्त्यांच्या प्रारंभी कचरा टाकण्यात येतो. तो नियमितपणे उचलून स्वच्छता राखण्यात यावी अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणा-या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या व अतिक्रमण विषयक कामकाज सक्षमतेणे करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील हे काम अनधिकृत बांधकाम नियंत्रण व बांधकाम परवानगी विभागाकडे देण्यात यावे अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रत्येक एका किलोमिटर अंतरावर नागरिकांसाठी ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून अथवा महापालिकेकडून ही कार्यवाही करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी या बैठकीत अधिका-यांना दिल्या. यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरातील इतर दवाखान्यातील ओ.पी.डी. सेवा सक्षम करावी यासाठी नियोजन करावे.
शहरातील सर्व चौकातील लेफ्ट टर्न फ्री केल्यास वाहतूक सुरळीत होईल. त्यासाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यावर योग्य ती कार्यवाही शहर अभियंता व सह शहर अभियंता यांनी करावी अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या. शहरातील रस्त्यावरील बेवारस वाहने पडलेली आहेत. त्यावर कार्यवाही करण्यात यावी असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. त्यावर येत्या 10 दिवसात सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी अशा वाहनांचे सर्व्हेक्षण करून अहवाल द्यावा अशा सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या त्यानंतर पोलीस आयुक्त यांना कळविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शहरातील व्यायामशाळा, स्विमिंग पूल इत्यादी मधून खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्यात यावेत व त्याची देखभाल योग्य प्रकारे करण्यासाठी नियोजन करावे. शहरातील मनपाच्या शाळा व इमारतीसाठी स्वतंत्र रंग संगती निश्चित करून इमारतींना रंग द्यावेत. नव्याने बांधण्यात येणा-या इमारतींना अथवा मनपा इमारतीची कामे सुरु असणाऱ्या ठिकाणी त्याचा अवलंब करावा. व त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीस एक वर्ष पूर्ण झाले गेल्या एक वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरवाशियांनी सत्ता परिवर्तन केले, राष्ट्रवादीच्या मनमानी कारभाराला कंटाळून पूर्व श्रमीचे राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक भाजपमध्ये दाखल होऊन त्यांनी आपल्याच नेत्याला आव्हान देऊन सत्ता काबीज केली. भय भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड करणार असल्याच्या घोषणा केल्या, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’चा नारा दिला. पण गेल्या एक वर्षाच्या काळात सत्ता मिळालेल्या भाजपा कडून पिंपरी चिंचवडकरांची घोर निराशा झाल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासनाची खैरात केली राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर पोवाडे गायले गेले, मूर्ती खरेदी भ्रष्टाचारापासून अनेक भ्रष्टाचाराचे दाखले दिले. परंतू गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचाराचा आरोप भाजपाला सिद्ध करू शकली नाही. महापालिका निवडणूकीत आश्वासनाची खैरात घालण्यात आली. अनाधिकृत बांधकामे नियमित करणार, शास्ती कर रद्द करणार, रखडलेले पुर्नवसन प्रकल्प सूरू करणार, बंद पवना जलवाहीनी बाबत निर्णय घेणार, पाणी – कचरा ह्या मुलभूत समस्या सोडवण्याबरोबरच भय, भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड शहर करणार, परंतू या सर्व आश्वासनाचा विसर सत्ताधार्यांना पडला असल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
दुसऱ्यावंर आरोप करून टीका करणे सोपे असते परंतू अनेक राष्ट्रवादी – काँग्रेस मध्ये भ्रष्टाचाराची फळे चाखणारे सत्ता मिळताच त्यांच्या मूळ भुमीकेत आले आहे. गेल्या एक वर्षापूर्वी शहरवासियांना दिलेल्या आश्वासनाचा पूर्ण विसर पडला आहे. अनाधिकृत बांधकामाबाबात राज्य शासनाने निर्णय घेऊनही त्याचा शहरवाशियांना कोणताही फायदा झाला नाही. शास्तीकर माफी बाबत सर्व मौन पाळुन आहे. विकासाच्या नावावर रिंगरोड बाधित नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखला गेला. परंतु त्या भागातील नागरीकांनी त्याला प्रचंड विरोध करीत आजपर्यंत तो टाळून लावला आहे. बीआरटी मार्गावर कोट्यावधी रूपये खर्च करूनही बीआरटी चालु होऊ शकली नाही. विठ्ठलनगर, ओटास्कीम लिंकरोड या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसन प्रकल्पाला ज्यांनी विरोध केला त्या प्रकल्पाचे एक वर्षात काय झाले हे ही ह्यांना सांगणे कठीण झाले असल्याचे बारणे म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरात दिवसोंदिवस कचरा, पाणी ह्या समस्य़ा वाढत आहेत. नागरीकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना फुरसत नाही. नागरीकांना चौपट पाणीदर वाढीचा भुर्दंड मात्र सोसावा लागणार आहे. भयभ्रष्टाचार मुक्तीच्या घोषणेचा पूर्ण विसर सत्ताधारी भाजपाला पडला आहे. शहरात रोज अनेक टोळकी सर्वसामान्य नागरीकांची वाहने तोडफोड करीत आहे. संपूर्ण शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन अनेक गुन्हेगार राजरोस पणे हप्ते वसुली करीत आहेत. गुन्हेगारंना एक प्रकारे राजआश्रयच मिळाला आसल्याचे नागरीक खाजगीत बोलु लागले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. अनेक निविदा संगनमत करून भरल्या जाऊ लागल्या आहेत. प्रशासन व सत्ता पक्ष दोन्ही ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालू लागल्याने सर्व काही अलबेल असल्याचा दिखावा करू लागले असल्याने पिंपरी चिंचवडकरांनी सत्ता परिवर्तन करूनही आपली घोर निराशा झाल्याने यांच्या पेक्षा पहिले बरे असे बोलू लागले असल्याने भाजपाच्या एक वर्षाची पूर्ती म्हणजे हाती सत्ता देऊन शहरवासियांच्या पदरी घोर निराशा आली असल्याचे खासदार बारणे यांनी म्हंटले आहे.
व्हीएस न्यूज - दुचाकीवरुन तोंड बांधून आलेल्या दोघांनी समोरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीची सोनसाखळी भरदिवसा हिसकावून नेली. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीगावात घडली. मच्छिंद्र काटे (वय 28, रा. पिंपळे सौदागार) असे सोनसाखळी चोरीला गेलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिंपरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आंतरकर यांनी माहिती दिली. मच्छिंद्र हा शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीगावातून दुचाकीवरुन पिंपळे सौदागरकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून प्लसर या दुचाकीवरुन तोंड बांधून आलेल्या दोघांनी त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची 90 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - मराठी भाषा गौरव दिन व जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांंना शिक्षणाबरोबरच अर्थाजनासाठी विविध उपक्रमाविषयी माहिती देत मोडी लिपी मधून करिअर करता येते हे ही सांगितले. आज लाखो मोडी लिपीतील कागदपत्रे अभ्यासकांची वाट पहात आहेत. या अशा अभ्यासक्रमातून पुढे अभ्यासक निर्माण व्हावेत असा आमचा प्रयत्न असल्याच्या त्या म्हणाल्या. श्यामला पानसे गेली आठ वर्षे येथे मोडी षिकवित आहेत त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करणाऱ्या श्यामला पानसे म्हणाल्या की, 1935 मध्ये मोडी लिपी बंद झाली. पण अनेक जुने कागदपत्रे, वारसाहक्काची, जमिनीची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्याचे देवनागरीत रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप संधी आहे. इतिहासाचे कागद बोलत असतात आणि मोडी हा त्याचा मार्ग असल्याचे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट यांनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संगिता लांडगे यांनी तर आभार प्रा. दुर्गा भिसे यांनी मानले. डॉ. धनंजय वाघमारे, डॉ. संगिता लांडगे यांचे सहकार्य लाभले.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे ठेके बी.व्ही.जी इंडिया प्रा.लि. व ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपन्यांना देण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली आहे.मात्र, या दोन्ही ठेकेदारांनी भरलेले निविदेचे दर पाहता या कामात रिंग झाली आहे असे दिसत असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून दोन्ही ठेकेदारांना काळ्यायादीत टाकावे असा तक्रार अर्ज रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गुरुवारी केला आहे. वाघेरे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी महापालिकेत सलग 15 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती या काळात राष्ट्रवादीने शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे ठेके प्रभागवार छोट्या सहकारी संस्थांना देऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर स्थायीसमिती सभापती सीमा सावळे यांनी या संस्था त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांचा प्रॉव्हिडंड फंड आणि अन्य देय रक्कमा शासनाकडे भरणा करत नाहीत तसेच या मजुरांना किमानवेतन कायद्याप्रमाणे वेतनही देत नाहीत. त्यामुळे या सहकारी संस्थांना मुदतवाढ न देता नवीन निविदाप्रक्रिया राबवावी व शहराचे दोन भाग करून दोन मोठ्या कंपन्यांना हे काम द्यावे असे प्रशासनाला सुचविले होते. त्या प्रमाणे प्रशासनाने शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई महामार्गाच्या उत्तर व दक्षिण असे दोन भाग कल्पून या भागांसाठी दोन स्वतंत्र निविदा मागविल्या होत्या. यामध्ये उत्तर भागातील कामासाठी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. आणि पी. गोपिनाथ रेड्डी या चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या त्यापैकी बी.व्ही.जी इंडिया लि. या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची म्हणजेच 1850 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. आणि ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीची निविदा त्यापेक्षा जास्त दराची म्हणजेच 2380 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. त्यामुळे उत्तर भागासाठी बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीला ठेका दिला जाणार आहे. दक्षिण भागासाठी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. आणि पी. गोपिनाथ रेड्डी या ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची म्हणजेच 1890 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. आणि मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीची निविदा त्यापेक्षा जास्त दराची म्हणजेच 2350 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. त्यामुळे सर्वात कमी दर असलेल्या ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीला दक्षिण भागासाठी ठेका दिला जाणार आहे. स्थायीसमितीने या प्रस्तावावर मान्यतेची मोहर उमटवली असल्याने लवकरच सर्वसाधारण सभेत या ठेक्यांना अंतीम मंजुरी दिली जाणार आहे. या दोन्ही निविदा प्रक्रियेत ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. आणि बी.व्ही.जी इंडिया लि. या दोनच ठेकेदार कंपन्यांमध्ये स्पर्धा झाल्याचे दिसत असून या दोन्ही कंपन्यांनी दोन्ही निविदांमध्ये भरलेले दर पाहता त्यांनी दोघांनीही एक एक ठेका मिळेल अशाप्रकारे निविदा भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामात दोन्ही ठेकेदार कंपन्यांनी संगनमत करून भरल्याचे दिसून येत असल्याने या दोन्ही निविदाप्रक्रिया रद्द करून या ठेकेदार कंपन्यांना काळ्यायादीत टाकावे अशी तक्रार वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. शिवाय हे दोन्ही ठेके 8 वर्षे एव्हढ्या दीर्घ कालवधीसाठी देण्याचा प्रस्ताव असल्याबद्दलही वाघेरे यांचा आक्षेप आहे. स्थायीसमितीच्या दबावाला बळी न पडता या दोन्ही निविदा रद्द कराव्यात. अन्यथा या विरोधात आपणाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही वाघेरे यांनी तक्रारीच्या शेवटी दिला आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहत्रक बनविण्याऱ्या कंपनीला आग लागली. तर, रहाटणीत गणेश बॅंकेला लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक झाली. या दोन्ही घटना शनिवारी सकाळी घडल्या. तळवडे येथे विद्युत रोहत्रक बनविण्याची कंपनी आहे. कंपनीत फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील दोन बंब, भोसरी आणि प्राधिकरणातील एक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. यामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरी घटनी रहाटणी येथे घडली. रहाटणी येथील गणेश बॅंकेला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत बॅंकेतील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत बॅंकेची चलन व इतर कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.
व्हीएस न्यूज - पैशाच्या वादातून त्रिकुटाने एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील आंबी गावच्या हद्दीत घडली. विनोद सुरेश गायकवाड (रा.कामशेत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अरविंद गौतम निकाळजे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शशिकांत भरत शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) व अनोळखी दोन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड आणि फिर्यादी अरविंद निकाळजे हे दोघे शुक्रवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आंबी गावच्या हद्दीत वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी शशिकांत भरत शिंदे याने मागून दुचाकीवरून येऊन विनोद गायकवाड यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पडले. त्यानंतर पैशाच्या देवाण घेवाणीवरून चिडून आपली मोटारसायकल चार ते पाच वेळा विनोदच्या अंगावर घातली. त्यानंतर तेथे पडलेला दगड विनोदच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. आरोपी शशिकांत शिंदे हा फिर्यादी अरविंद निकाळजे यांचा आत्येभाऊ आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
व्हीएस न्यूज - इसमाचे लायसन त्वरीत काढून देण्याची मागणी करत एका एजंटने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मी कोण आहे, तुला माहित आहे ना, तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मोशी येथील आरटीओ कार्यालयात घडला. गौतम सुराडकर असे आरोपी एजंटचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर (वय-55, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार ईश्वर जगदाळे यांनी माहिती दिली. फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गुरूवारी सायंकाळी आरोपी व इतर एक जण त्यांच्या केबीनमध्ये आले. माझ्या माणसाचे लायसन त्वरीत काढून देण्याची मागणी आरोपीने केली. फिर्यादी यांनी आरोपीला केबीनच्या बाहेर जाण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपी एजंटने फिर्यादी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच मी कोण आहे, तुला माहित आहे ना, तुझ्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - महापालिकेच्या वायसीएममधील एका डॉक्टर महिलेसह देशभरात अनेक महिलांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या एका नायजेरियनच्या भोसरी पोलिस व सायबर सेलने मुसक्या अवळल्या आहेत. तसेच आरोपीच्या पासपोर्टची 12 मार्च 2017 रोजी मुदत संपली होती. तो भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होता. अरिरिका हेंन्री अजुबुके (वय-38) असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. प्रतिभा शामकुवर यांना फेसबुकच्या माध्यमातून अजुबुके याने तब्बल 41 लाख 82 हजार रुपयांचा गंडा घातला होता. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच्या फिर्यादीवरून पुणे सायबर सेल व भोसरी पोलीसांच्या पथकाने कसून तपास केला. अखेर आरोपी अजुबुकेला दिल्लीतून अटक केली. त्याने फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांना गंडा घातल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. अजुबुके याने बंगळुरु येथील एका महिलेला 60 लाख, कुलू मनाली येथील महिलेला 30 लाख, वसई येथील महिलेला 8 लाख, निगडी येथील एका महिलेला 5 लाख तर तक्रार करणाऱ्या डॉक्टर महिलेला 42 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आले आहे. भोसरी पोलीस व सायबर सेल अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002