व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे ठेके बी.व्ही.जी इंडिया प्रा.लि. व ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपन्यांना देण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली आहे.मात्र, या दोन्ही ठेकेदारांनी भरलेले निविदेचे दर पाहता या कामात रिंग झाली आहे असे दिसत असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून दोन्ही ठेकेदारांना काळ्यायादीत टाकावे असा तक्रार अर्ज रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गुरुवारी केला आहे. वाघेरे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत.
भाजप सत्तेवर येण्यापूर्वी महापालिकेत सलग 15 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती या काळात राष्ट्रवादीने शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे ठेके प्रभागवार छोट्या सहकारी संस्थांना देऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजप सत्तेवर आल्यानंतर स्थायीसमिती सभापती सीमा सावळे यांनी या संस्था त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांचा प्रॉव्हिडंड फंड आणि अन्य देय रक्कमा शासनाकडे भरणा करत नाहीत तसेच या मजुरांना किमानवेतन कायद्याप्रमाणे वेतनही देत नाहीत. त्यामुळे या सहकारी संस्थांना मुदतवाढ न देता नवीन निविदाप्रक्रिया राबवावी व शहराचे दोन भाग करून दोन मोठ्या कंपन्यांना हे काम द्यावे असे प्रशासनाला सुचविले होते. त्या प्रमाणे प्रशासनाने शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई महामार्गाच्या उत्तर व दक्षिण असे दोन भाग कल्पून या भागांसाठी दोन स्वतंत्र निविदा मागविल्या होत्या.
यामध्ये उत्तर भागातील कामासाठी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. आणि पी. गोपिनाथ रेड्डी या चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या त्यापैकी बी.व्ही.जी इंडिया लि. या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची म्हणजेच 1850 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. आणि ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीची निविदा त्यापेक्षा जास्त दराची म्हणजेच 2380 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. त्यामुळे उत्तर भागासाठी बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीला ठेका दिला जाणार आहे.
दक्षिण भागासाठी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. आणि पी. गोपिनाथ रेड्डी या ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची म्हणजेच 1890 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. आणि मॅनेजमेंट लि., बी.व्ही.जी इंडिया लि. या कंपनीची निविदा त्यापेक्षा जास्त दराची म्हणजेच 2350 रुपये प्रतिटन प्रतिदिवस या दराची होती. त्यामुळे सर्वात कमी दर असलेल्या ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीला दक्षिण भागासाठी ठेका दिला जाणार आहे. स्थायीसमितीने या प्रस्तावावर मान्यतेची मोहर उमटवली असल्याने लवकरच सर्वसाधारण सभेत या ठेक्यांना अंतीम मंजुरी दिली जाणार आहे. या दोन्ही निविदा प्रक्रियेत ए.जी.एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. आणि बी.व्ही.जी इंडिया लि. या दोनच ठेकेदार कंपन्यांमध्ये स्पर्धा झाल्याचे दिसत असून या दोन्ही कंपन्यांनी दोन्ही निविदांमध्ये भरलेले दर पाहता त्यांनी दोघांनीही एक एक ठेका मिळेल अशाप्रकारे निविदा भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामात दोन्ही ठेकेदार कंपन्यांनी संगनमत करून भरल्याचे दिसून येत असल्याने या दोन्ही निविदाप्रक्रिया रद्द करून या ठेकेदार कंपन्यांना काळ्यायादीत टाकावे अशी तक्रार वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. शिवाय हे दोन्ही ठेके 8 वर्षे एव्हढ्या दीर्घ कालवधीसाठी देण्याचा प्रस्ताव असल्याबद्दलही वाघेरे यांचा आक्षेप आहे. स्थायीसमितीच्या दबावाला बळी न पडता या दोन्ही निविदा रद्द कराव्यात. अन्यथा या विरोधात आपणाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही वाघेरे यांनी तक्रारीच्या शेवटी दिला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002