तळेगावात पैशाच्या वादातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
तळेगाव दाभाडे
2018-02-25
व्हीएस न्यूज - पैशाच्या वादातून त्रिकुटाने एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील आंबी गावच्या हद्दीत घडली.
विनोद सुरेश गायकवाड (रा.कामशेत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अरविंद गौतम निकाळजे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शशिकांत भरत शिंदे (रा. तळेगाव दाभाडे) व अनोळखी दोन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड आणि फिर्यादी अरविंद निकाळजे हे दोघे शुक्रवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आंबी गावच्या हद्दीत वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी शशिकांत भरत शिंदे याने मागून दुचाकीवरून येऊन विनोद गायकवाड यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पडले. त्यानंतर पैशाच्या देवाण घेवाणीवरून चिडून आपली मोटारसायकल चार ते पाच वेळा विनोदच्या अंगावर घातली. त्यानंतर तेथे पडलेला दगड विनोदच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. आरोपी शशिकांत शिंदे हा फिर्यादी अरविंद निकाळजे यांचा आत्येभाऊ आहे.
पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.