व्हीएस न्यूज - सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन तरुणांना गजाआड केले आहे. या तरुणांनी मराठा समाजाबाबत व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. विश्वनाथ निवृत्ती वाजे आणि राजेंद्र गोरख मोडवे (दोघेही रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक सुनील संपत जाधव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन तरुण बेरोजगार आहेत. दोघांना दारूचे व्यसन असून या दोघांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. याबाबत पोलीस नाईक सुनील जाधव यांनी तक्रार दिली. विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारणावरून निगडी पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले.
व्हीएस न्यूज - वाघेरे कॉलनी येथे कामगारांच्या झोपड्यांना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाघेरे कॉलनी येथे रिकाम्या जागेत बिगारी काम करणारी अनेक कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे कर्नाटकवरून पुण्यात रोजी-रोटी कमविण्यासाठी आले आहेत. रोजच्याप्रमाणे झोपड्यांमधील सर्वजण कामावर गेले असता बुधवारी दुपारी एकच्या सुमारास एका झोपडीतून अचानक धूर निघाला. घरी असलेल्या काही महिलांनी जवळ जाऊन बघितले असता झोपडीमधील सर्व वस्तूंनी पेट घेतला होता. महिलांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणात आग आजूबाजूला पसरली. यामध्ये शेजारी असलेल्या सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या. नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची तात्काळ माहिती दिली. पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. यामध्ये जिवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
व्हीएस न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्रभाकर केशव पांचाळ (वय-65, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे), असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. प्रभाकर पांचाळ यांनी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 641 मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात ते सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली. वसिम खान (वय 37, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसिम खान यांचे निगडीतील ट्रान्सपोर्टनगर भागात साई एन्टरप्रायजेस नावाचे मोबाईलचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी लोखंडी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. 6 लाख 32 हजार 423 रुपये किंमतीचे मोझोमॅक्स व सेलकॉन कंपनीचे एकूण 641 मोबाईल चोरून नेले. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी. खारगे अधिक तपास करीत आहे.
व्हीएस न्यूज - गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आरोपीची चौकशी करत असताना आरोपीने पोलीस ठाण्यातच स्वतःचे डोके फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. प्रशांत उर्फ डिग्या भानुदास दिघे (वय-26, रा. तंगडेवस्ती, माथळवाडे फाटा भूगाव, ता. मुळशी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल होते. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आरोपीकडे चौकशी करीत होते. चौकशीमध्ये पोलिसांना सहकार्य न करता त्याने जवळच असलेल्या लोखंडी कपाटावर डोके आपटून घेतले. यामध्ये आरोपीच्या डोक्याला मार लागला. तसेच लोखंडी कपाटाची काच फुटली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व आत्महत्येचा प्रयत्न या गुन्ह्याखाली आरोपीला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आण, असा तगादा लावून विवाहितेचा छळ केला. पैसे न आणल्यास सामूहिक बलात्कार करण्याची धमकी पतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे निलख येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे सासरच्या मंडळींनी सुनेकडे हुंड्याच्या पैशांची मागणी केली. फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आण, असा तगादा वारंवार लावला. फिर्यादी महिलेने पैसे आणले नाहीत म्हणून तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. पतीने तर यापुढे जाऊन पैसे न आणल्यास पत्नीला सामूहिक बलात्काराची धमकी देखील दिली. याबाबत पीडित महिलेने पोलिसांकडे दाद मागितली. महिलेने सासरच्या मंडळींविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार संभाजी पाटील करीत आहेत.
व्हीएस न्यूज - मोटारीचा ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून एनओसी दाखला काढून देण्याच्या अमिष दाखवून एका दलालाने इसमाची दोन लाख रूपयांची फसवणूक केली. ही घटना कासारवाडी येथे नुकतीच उघडकीस आली. चार्ज डेव्हिड अल्बर्ट करकडा (वय-50, रा. शांतीनगर, उल्हासनगर, पुणे) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ खत्री (वय-53, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खत्री यांना मोटारीचा ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचा एनओसी दाखला काढून देण्याचे आरोपीने सांगितले. खत्री यांचा विश्वास संपादन करून आरोपीने एनओसी दाखल्यासाठी आरटीजीएसव्दारे दोन लाख रूपये घेतले. एनओसी दाखला काढून न देता फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - हातगाडीवर चहा पिऊन पायी जाणाऱ्या एका इसमाच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास चिंचवड येथे घडली. अनिल नवघने (वय-40, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघने बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास चिंचवड येथील युनाइटेड एजन्सीच्या पाठीमागील एका चहाच्या हातगाडीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा पिवून पायी जाताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांपैकी एकाने नवघने यांच्या गळ्यातील दोन लाख 50 हजार 940 रूपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पति व मुलीसह होळी पाहण्यासाठी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 40 हजार रूपये किमतीचे सोन्याची चैन मोटर सायकलवरुन आलेल्या चोरट्याने हिसका मारुन पळवुन नेले. ही घटना गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता औंध रोड बोपोडी येथे घडली. रोहित नायर (वय रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नायर हे गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता पत्नी निता व मुलीसह होळी पाहण्याकरिता औंधरोड एम. एम. रेस्टारंट शेजारील व्होडाफोन स्टोअर्स बस स्टॉंप जवळुन पायी चालले होते. पाठीमागून मोटर सायकलवरुन आलेल्या चोरट्याने निता यांच्या गळ्यातील 40 हजार रु. किमतीचे सोन्याची चैन हिसका मारुन पळवुन नेली. सोनसाखळी चोरीची खडकीतील महिनाभरातील दुसरी घटना आहे. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - होलसेल मेडिकलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी सात लाख रूपये किंमतीच्या 107 औषधांच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना 24 मे 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत नेहरूनगर येथे घडली. कामगार अजय निसरगंध (वय-22, रा. मोशी), लखन कांबळे (वय-21, रा. विठ्ठलनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज मोरे (वय-30, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार घुगे यांनी माहिती दिली. फिर्यादी यांचे नेहरूनगर येथे औषधाचे होलसेल दुकान आहे. या दुकानात आरोपी दोघेही कामाला आहेत. त्यांनी 24 मे 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत सात लाख 33 हजार रूपये किंमतीच्या लाईफ सेव्हिंग या औषधांच्या 107 बाटल्यांची चोरी केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद ब. तेलंग महाविद्यालयाच्या कुमार साईराम चौगले याने कुमार केसरी किताब पटकाविला. त्याला क्रीडा प्रमुख डॉ.सविता फलके यांनी मार्गदर्शन केले.
व्हीएस न्यूज - रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पोतून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीची साखरेची 50 पोती चोरून नेली. ही घटना बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ताथवडे येथे घडली. इंद्रकुमार गुप्ता (वय-62, रा. गंगाधाम मार्कटयार्ड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांनी द्रारूंबे, कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यातून 50 किलो वजनाची 50 पोती साखर ( एमएच 14 बीजी 0730) या टेम्पोतून साखर आणली होती. बुधवारी पहाटे टेम्पो ताथवडे येथील बालाजी महाविद्यालयाजवळ पार्क केला होता. चोरट्यांनी टेम्पोतील अडीच लाख रूपये किंमतीची 50 पोती साखर चोरून नेली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002