व्हीएस न्यूज - सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन तरुणांना गजाआड केले आहे. या तरुणांनी मराठा समाजाबाबत व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
विश्वनाथ निवृत्ती वाजे आणि राजेंद्र गोरख मोडवे (दोघेही रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक सुनील संपत जाधव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन तरुण बेरोजगार आहेत. दोघांना दारूचे व्यसन असून या दोघांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. याबाबत पोलीस नाईक सुनील जाधव यांनी तक्रार दिली. विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारणावरून निगडी पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले.