व्हिएस न्यूज - टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यावतीने आयोजित केलेल्या 10 व्या राष्ट्रीय स्तरावरील सेमीनारमध्ये पिंपरी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडीच्या निदेशक तानाजी कोकणे, सुनिल पाटील यांनी यश संपादन केले.
21 ते 22 फेब्रुवारी रोजी कर्नाटक येथील हलीयाल येथे झालेल्या या राष्ट्रीय सेमीनारमध्ये निदेशक तानाजी कोकणे,सुनिल पाटील, गटनिदेशक विजय आगम यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोकणे यांनी तयार केलेल्या श्रिरपशींरीू सशरी र्ीपळीं च्या ीर्ळाीश्ररींेी ला राष्ट्रीय स्तरावर बेस्ट कीझन म्हणून निवडण्यात आले. ऑटोमोटीव्ह जनरल रिपेअर या कॅटेगरीमध्ये राष्ट्रीय दिनेशक स्कील कॉन्टेस्टमध्ये सुनिल पाटील यांचा तिसरा क्रमांक आला असून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टी- टेप प्रशिक्षण राबविले जात असून या संस्थेला 10 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
व्हिएस न्यूज - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमधून खाली पडल्याने मजुराचा मृत्यु झाल्याप्रकरणी वाकड पोलीसांनी ठेकेदारासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
ठेकेदार रणवीर सिंग याच्यासह इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीपकुमार श्रीचंदर प्रजापती (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. संदीपकुमार प्रजापती (वय 19, रा. रामपूर ठाणा, जि. बस्ती,उत्तरप्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीपकुमार हे कोलते पाटील डेव्हलपर्स यांच्या वाकड येथील ऍव्हेन्यू बांधकाम साईटवर मजुर म्हणून काम करत होते. 28फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. प्रदीपकुमार फरशी घेण्यासाठी लिफ्टच्या डक्टजवळ गेले असता पाय घसरून खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. कामगाराच्या जिविताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही साधने न पुरविता मजुराच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी रणवीर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार एस. एस. घोळवे तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोची धडक बसून 16 वर्षाचा मुलगा ठार झाला. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर बावधन येथे घडली.
सिनु गारदी बोदरा (वय 16, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी नारायण कालुंडीया (वय19, रा. बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. सिनु आणि नारायण हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. 4 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास दोघे बावधन येथे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजी खरेदी करून ते घरी पायी निघाले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोची सिनु याला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने सिनु याचा मृत्यु झाला. टेम्पोचालक परशुराम खंडु सुर्यवंशी (वय25 , रा. थेरगाव फाटा, श्रीकृष्ण कॉलनी, चिंचवड) याला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. फौजदार एम. के. अबनावे तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - शैक्षणिक वर्ष 2016-17 वर्षातील प्रतिबिंब या वार्षिक नियतकालिकाचा समृद्ध पर्यावरण : समृद्ध जीवन हा विषय केंद्रस्थानी ठेवून काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन बाबुरावजी घोलप महाविद्यालायाचे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. मोहनराव देशमुख, ए.एम. जाधव,प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उद्योगपती अभिजित शिर्के,कार्यकारी संपादक प्रा. विठ्ठल नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. के. ढगे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, प्रा. वसंत गावडे, डॉ. संगीता घोडके, प्रा. विद्या पाठारे आदी उपस्थित होते.
ॲड. देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनात महाविद्यालयाचा कालखंड हा सोनेरी असतो त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारी अनेक व्यासपीठे व माध्यमे महाविद्यालयातून त्यांना मिळतात. त्यातीलच लेखनाचे एक माध्यम म्हणजे महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक त्यामधून विध्यार्थी आपली प्रतिभा व्यक्त करत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदा राशिनकर यांनी केले. तर आभार नियतकालिक सदस्य प्रा. वसंत गावडे यांनी मानले.
व्हिएस न्यूज - एका 25 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला. हिंजवडी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. दोन नराधमाना अटक केली आहे. जितेंद्र तुरीया आणि अजेश तिवारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संबंधीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही बावधन परिसरात वास्तव्यास असून हिंजवडीतील एका कंपनीत काम करते. महिलेला पैशाची आवश्यकता असताना आरोपी अजेश तिवारी याने पैसे देण्याच्या आमिषाने तिला बोलावले घेत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिचे नग्नावस्थेतील फोटोही काढले. त्यानंतर हेच नग्नावस्थेतील फोटो दाखवून तिला वारंवार ब्लॅकमेल केले. त्यानंतर आरोपीने कात्रज, बावधान आणि मारूंजी येथील जंगलात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज – गॅस लिकेज झाल्यामुळे अनेकदा अपघात घडून मोठा अनर्थ घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. योग्य काळजी घेतल्यास आपण धोका टाळू शकतो, असे आवाहन एजन्सीचे अधिकारी गणेश संभेराव यांनी केले. गुजर गॅस एजन्सी तर्फे कासारवाडी केशवनगर येथे गॅस वापरताना काय काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्जुन जवळकर, बबन जवळकर, विष्णु बिरदवडे,शशीकांत शेडे, प्रशांत माने, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गणेश जवळकर यांनी केले होते.
आपण फक्त पाणी टाकून गॅस चेक करुन घेतो. शक्यतो गॅस घेताना गॅस रेगुलेटर लावून चेक करून घ्या. म्हणजे पुढचे अपघात टळतील. तसेच गॅस शेगडीही गॅस टाकीच्या कमीत कमी 6 इंच वर असावी, असेही त्यांनी सांगितले.
व्हिएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा छत्रपती पुरस्कार हा सर्वोच्च गौरव असुन अशा पुरस्कारामुळे सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा व बळ मिळते असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ञ अँड. एस. के. जैन यांनी येथिल कार्यक्रमाप्रसंगी केले.
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतिने शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी अँड.जैन बोलत होते. यावेळी आमदार विजय काळे, नगरसेवक उज्वल केसकर, प्रकाश ढोर,विजय शेवाळे, खडकी कॅंन्टोन्मेंट सदस्य मनीष आनंद, सुरेश कांबळे, दुर्योधन भापकर, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, परिमंडल चार चे पोलिस उपायुक्त दिपक साकोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे, समितीचे अध्यक्ष अजित पवार, विलास पंगुडवाले, फ्रान्सिस डेव्हीड, विवेक शिंदे, वासु पुजारी,बाळासाहेब आहेर आदी उपस्थित होते.
समितिच्या वतिने दरवर्षी भव्य स्वरुपात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी केले जाते. यंदाच्या वर्षी भव्य मिरवणुकीसह विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचा छत्रपती पुरस्कारांने सन्मान व गौरव करण्यात आला. पुरस्कार्थींची नावे या प्रमाणे डॉं. अनिल लकारीया (वैद्यकीय क्षेत्र) प्रा.विजय मानकर (शैक्षणिक) सुधीर फेंगसे( कामगार) आशिष टिळक (कला सांस्क्रुतिक) केशव गडपेल्लु मनोज गांधी (उद्योजग) दिनेश गडांकुश (पोलिस सेवा) विवेक शिंदे ( सामाजिक) या पुरस्कार्थीं यांचा अँड. जैन व गोयल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या व्यतिरिक्त विशेष कार्याबद्दल सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे, सुरेंन्द्र वधवा, नरेंद्र बागनाईक यांचा ही आमदार काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उदयोन्मुख खेळाडु सम्रुद्धी झुजम, गिरीजा नंदवाणी,प्रतिक फाळके, रोहन कदम, कुणाल कांबळे यांचा सन्मान कॅंन्टोन्मेंट सदस्य मनीष आनंद व नगरसेवक उज्वल केसकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत विलास पंगुडवाले यांनी केले सुत्रसंचालन नितिन पहलवान यांनी तर आभार अमर देशपांडे व अशोक कुडले यांनी मानले.
व्हिएस न्यूज - मावळ कार्ला येथील प्रसिद्धी एकविरा मंदीराचा कळस काही महिन्यापूर्वी चोरीला गेला होता. या कळसाचा पोलीसांना अद्याप शोध घेता आला नाही. तथापि, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावतीने मंगळवारी बारणे यांचे सुपुत्र प्रताप बारणे यांनी एकविरा देवी गडावर जाऊन मंदीर समितीकडे नव्याने बनविण्यात आलेला कळस सुपूर्द केला.
एकविरा देवीचा कळस चोरीस गेल्यानंतर नव्याने कळस बसवण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी मंदिर विश्वस्थांना पत्र पाठवून आपण देवीचा कळस देवू तो घ्यावा, अशी विनंती केली होती. मंदिर समितीने ती मान्य केली. त्यानुसार खासदार बारणे यांनी चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्सचे मालक दिलीप सोनिगरा यांच्याकडून नव्याने कळस तयार करून घेतला. कळस बसविण्याबाबत मंदिर समितीला सुचना दिल्या होत्या. परंतू मंदिर समितीच्या अंतर्गत वादामुळे आजपर्यंत कळस बसविण्यात आला नव्हता. दोन दिवसापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडून मंदिर समितीला काही निर्देश प्राप्त झाल्यानंतर खासदार बारणे यांनी पुन्हा मंदिर समितीकडे कळस बसविण्याबाबत विनंती केली. त्यानुसार खासदार बारणे यांचे सुपुत्र प्रताप बारणे यांनी एकविरादेवी गडावर जाऊन मंदीर समितीकडे नव्याने बनविण्यात आलेला कळस सुपूर्द केला. लोकसभेचे अधिवेशन असल्याने खासदार श्रीरंग बारणे दिल्लीमध्ये असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, माऊली घोगरे, अशोक म्हाळसकर,बाळासाहेब हुलावळे उपस्थित होते. मंदिर समितीला कळस सपुर्द करत असल्याची कल्पना मंदिर समिती अध्यक्ष अनंत तरे व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिल्याची खासदार बारणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
व्हिएस न्यूज – पोलीस तपासात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढीच रक्कम असल्याचे समोर आले आहे. डीएसकेंना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांची विविध बँकेतील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ही बाब या खात्यांची तपासणी केल्यानंतर समोर आल्यामुळे डीएसके यांनी पैसा कुठे ठेवला, याचा तपास पोलीस घेत आहेत.
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी हे येरवडा जेलमधील न्यायालयीन कोठडीत आहेत. विविध बँकांचे कुलकर्णी यांनी कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्याकडे गहाण असलेल्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ५ हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी डीएसके यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची मालमत्ता आणि बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. डीएसकेंची हजारो कोटींची त्यात मालमत्ता ‘सील’ केली आहे. काही बँकांनी त्यांचे कर्ज थकविल्याने त्यांच्याकडे गहाण टाकलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे कामही सुरू केले आहे. परंतु, डी. एस. कुलकर्णी यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नव्हते.
३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक डीएसके ग्रुपकडून झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पण त्यांच्या बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढीच रक्कम आढळून आल्यामुळे डीएसके यांनी बाकीचा पैसा इतरत्र कुठे वळवला आहे का? याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - व्यावसायिकाला कंपनीत येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रूपये हप्ता घेऊन आणखी पन्नास हजार देण्याची मागणी करणाऱ्या त्रिकुटावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत. विकास अंबादास ठोसर (वय-27, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनोज विटकर, आकाश ओव्हाळ हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी व्यावसायिक व्यकंट राजू रमणामुर्ती (वय-41, रा. मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार बांबळे यांनी माहिती दिली. फिर्यादी रमणामुर्ती यांचे एमआयडीसीत ज्योती इंजिनेअरिंग नावाची गाड्यांचे जॉब बनविण्याची कंपनी आहे. आरोपी विकासने रमणामुर्ती यांना वारंवार फोन करून हप्ता देण्याची मागणी केली. 9 फेब्रुवारी रोजी कंपनीत येऊन रमणामुर्ती यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रूपये हप्ता म्हणून घेतला. त्यानंतरही आरोपीने हप्ता देण्याची मागणी सुरूच ठेवली. मंगळवारी आरोपी विकास व आकाशने रमणामुर्ती यांना कंपनीत येऊन आणखी पन्नास हजार रूपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रमणामुर्ती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. आरोपी विकास ठोसर याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - मोरवाडी न्यायालयात एका पक्षकाराने न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप साबळे यांनी प्रसंगावधान दाखवत त्याला आत्महत्येपासून वाचविल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास घडला. अरविंद बबन कसबे (रा. निगडी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद कसबे या तरुणाचे 28 मे, 2013 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. मागील एक वर्षांपासून मोरवाडी न्यायालयात त्याचा खटला सुरु आहे. त्याला साडेतीन वर्षांची मुलगी असून मुलीला दर शनिवारी भेटण्यासाठी त्याने न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. मात्र पत्नी, सासू, सासरे त्याला मुलीला भेटू देत नाहीत. पत्नीला नांदण्यासाठी विनंती करूनही पाठवित नाहीत. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या बाहेर त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. न्यायालयामध्ये आत पोर्चमध्ये येऊन थांबला. त्यानंतर त्याने खिशातून काडीपेटी काढत काडी ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका केससंदर्भात वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप साबळे तेथे उपस्थित होते. त्यांचे कसबे याच्याकडे लक्ष गेले. साबळे यांनी प्रसंगावधान दाखवत कसबे याला पाठीमागून पकडल्याने मोठा अनर्थ टळला. कसबेला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तो गरीब असल्या मुळे वकील देऊ शकत नाही म्हणून अॅड.अतिश लांडगे (रिमांड वकील पिंपरी न्यायालय) व त्यांच्या सहकार्यांनी मोफत वकील पत्र दाखल केले आहे.
डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा संपन्न
व्हिएस न्युज - मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची व जडणघडणीची जबाबदारी शाळा-कॉलेजबरोबरच पालकांची देखील आहे. कुटुंबात मुलांच्या जडणघडणीसाठी पोषक वातावरण आज कमी होत चालले आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील कॉलेज, पिंपरी यांच्यावतीने आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास’ विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मलघे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, संयोजक डॉ. श्याम गायकवाड, कुुुलसचिव डी.डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मलघे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कुटुंब, शाळा- महाविद्यालय आणि समाज या तीन घटकांद्वारे होत असते. कुटुंबात पालकांचा मुलांसोबत सुसंवाद असणे गरजेचे असते. मुलांनी देखील मोबाईल, टी.व्ही.चा अतिरिक्त वापर टाळून आई-वडील-बहीण-भावाशी संवाद साधला पाहिजे. आज कुटुंबात संवाद अपुरा होत असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होताना दिसतो आहे. शाळा-महाविद्यालात विद्यार्थ्यांना मित्रपरिवार लाभतो. ‘कॉलेज कट्टे’ दिसून येतात. यातून मुलांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन डॉ. मलघे यांनी केले. ते पुढे म्हणाले, की ज्यांना उत्तम भाषण व संभाषण करता येते, ते लोक आपल्या मनातील विचार व भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. अशाच लोकांना समाजात मान्यता लाभू शकते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे त्याचे केवळ दिसणे किंवा रुप नव्हे; तर त्याच्याकडे किती तीव्र बुद्धीमत्ता, आचार विचार आणि समाजाशी किती नाळ जुळलेली आहे, यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची गणना होत असते. देशात-परदेशात ज्या ज्या व्यक्तींनी छाप पाडली, ते सर्व लोक विद्वान होते. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, मोरारजी देसाई, डॉ. राजेंद्रप्रसाद हे सारे लोक बुद्धीमान होते. त्यांनी नवा समाज घडवला. त्याचे कारण त्यांचे विचारशील व्यक्तिमत्व. अनेक उदाहरणे देत डॉ. मलघे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी केली. डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले, की विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, त्याला आज पुढे जाण्यासाठी चांगले बोलणे, चालणे, व्यासंग या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या खर्या गुणांची कदर म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व होय. डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002