व्हिएस न्यूज - व्यावसायिकाला कंपनीत येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रूपये हप्ता घेऊन आणखी पन्नास हजार देण्याची मागणी करणाऱ्या त्रिकुटावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
विकास अंबादास ठोसर (वय-27, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनोज विटकर, आकाश ओव्हाळ हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी व्यावसायिक व्यकंट राजू रमणामुर्ती (वय-41, रा. मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार बांबळे यांनी माहिती दिली. फिर्यादी रमणामुर्ती यांचे एमआयडीसीत ज्योती इंजिनेअरिंग नावाची गाड्यांचे जॉब बनविण्याची कंपनी आहे. आरोपी विकासने रमणामुर्ती यांना वारंवार फोन करून हप्ता देण्याची मागणी केली. 9 फेब्रुवारी रोजी कंपनीत येऊन रमणामुर्ती यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास हजार रूपये हप्ता म्हणून घेतला. त्यानंतरही आरोपीने हप्ता देण्याची मागणी सुरूच ठेवली. मंगळवारी आरोपी विकास व आकाशने रमणामुर्ती यांना कंपनीत येऊन आणखी पन्नास हजार रूपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रमणामुर्ती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. आरोपी विकास ठोसर याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002