व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्र. 28 मधील आरोग्य विभागातील महिलांना ऊन व पावसापासुन संरक्षण मिळण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच आरोग्य सहाय्यक दिपक माकर, आरोग्य निरिक्षक राकेश सौदाई यांच्या हस्ते टोपी व स्कार्पचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपळे सौदागर येथील आरोग्य कार्यलयात घेण्यात आला. यावेळी महिलांना कर्मचारी वर्गानी मिठाई वाटुन व केक कापुुन या महिलादिनाचा आनंद व्यक्त केला. सर्व कर्मचारी महिलांना आरोग्य विभागातील अधिकारी व कामगारांनी शुभेच्छा दिल्या.
व्हीएस न्यूज - महिलांनी सर्वच क्षेत्रात धाडसाने पुढे येऊन आपल्या स्पर्धात्मक कामाचा ठसा निर्माण करावा, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला मंचच्या संस्थापिका सौ सारिका संजय भेगडे यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने महिला बाल कल्याण समितीकडून जागतिक महिला दिनाच्यानिमित्त विविध कार्यकर्माचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळ पैठणीचा, दुचाकी रॅली, शूर महिलांच्या जीवनावर एकांकिका, आदर्श महिला पुरस्कार आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सारिका भेगडे या होत्या. यावेळीं शहरातील 20 महिलांना विविध क्षेत्रात समाजपयोगी कार्य केल्याबद्दल आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी दीनदयाळ अत्योदय योजना राष्ट्रीय नागरी अभियाना अंतर्गत बालाजी महिला गट, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट यांना प्रत्येकी रुपये 10 हजार फिरता निधीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला बाल कल्याण समिती सभापती संध्या भेगडे यांनी केले. तर सारिका भेगडे, चित्रा जगनाडे, हेमेलता खळदे, वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. खेळ पैठणीच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक तेजश्री पाटील, व्दितीय प्रियदर्शनी हेंद्रे तर तृतीय क्रमांक जया लाटकर यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले. नियोजन उपसभापती प्राची हेंद्रे, समन्वयक सारिका लामखेडे यांनी केले. आभार नगरसेविका काजल गटे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाकण, खेड, शिक्रापूर येथून 1500 हुन अधिक भक्त उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्रीय प्रचारक निर्मल मनचंदा यांनी नारी शक्ती चे महत्व पटवून दिले. सदगुरूच्या गुरुसिखाची लक्षणे त्यांनी सांगितली. सदगुरुचा शिष्य हा नेहमी त्याचे स्मरण करीत असतो, तो शांत तर असतोच. परंतु जे कोणी त्याच्या जवळ येतात त्यांना हि तो शांत बनवण्याचं कार्य करीत असतो.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला भोसरी सेक्टर मधील सर्व शाखांचे मुखी, सेवादल अधिकारी, प्रबंधक उपस्थित होते. भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी आभार मानले.
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एक लाख रूपयांची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेली. ही घटना जागतिक महिला दिनी सकाळी साडेआठच्या सुमारास अजमेरा कॉलनी येथे घडली. याबाबत शैला सतिश शिराळकर (वय-76, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरीतील सिनीयर ऑफिसर कॉ. सोसायटीजवळून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 10 हजार रूपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली. फौजदार विठ्ठल बढे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका तरूणाचा नऊ जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, चॉपरने डोक्यात, हातावर, पायावरण वार करून खून केला. ही घटना गुरूवारी रात्री साडेदहा वाजता थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी वाकड पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. रुपेश सुखबीर सोराती (वय, 24 रा. गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व रूपेश यांच्यात पुर्ववैमनस्य होते. याच पूर्ववैमनस्यातून आरोपींनी रूपेश गुरूवारी रात्री साडेदहा वाजता घऱी जाताना थेरगावातील पाण्याच्या टाकीजवळ त्याला अडविले. आरोपींनी रूपेशवर लोखंडी कोयता, चॉपरने डोक्यात, हातावर, पायावर वार करून गंभीर जखमी केले. रूपेशला तात्काळ चिंचवड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सतीश माने अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले. या उपक्रमामुळे निगडी पोलीस ठाण्यात काम करणा-या महिला पोलीस कर्मचारी, बंदोबस्तासाठी येणा-या महिला कर्मचारी तसेच तक्रारी व अन्य कामानिमित्त येणा-या सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे.
महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्ष साधना काळभोर, प्रणिता अलुरकर, शकुंतला बन्सल, सभासद सुजाता ढमाले, डॉ. रंजना कदम, माधुरी भुरकुले, नियोजित अध्यक्ष प्रतिभा दलाल, राजश्री , रो. विजय काळभोर, रो. रवी राजापूरकर, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन मधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. यामुळे सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर,कचराकुंड्यांमध्ये उघड्यावर टाकल्याने उद्भवणा-या विविध त्रासांपासून सुटका मिळणार आहे. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते. या उपक्रमामुळे महिला पोलीस कर्मचारी व उपस्थित महिलांच्या चेह-यावर भावनिक आनंद ओसंडून वाहत होता.
याबाबत बोलताना इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड च्या अध्यक्षा सविता राजापूरकर म्हणाल्या की, “महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणे ही काळाची गरज आहे. शहर शांत राहण्यासाठी पोलीस कर्मचा-यांना सतत कर्तव्यावर रहावे लागते. महिला पोलीस कर्मचारी देखील यामध्ये मागे नाहीत. मात्र सॅनिटरी नॅपकिन सारख्या काही गोष्टींमुळे त्यांची वाताहत होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा महिला पोलीस कर्मचारी व अन्य महिला लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले म्हणाले की, “अशा प्रकारचा उपक्रम परिसरात प्रथमच सुरु करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनची सर्वत्र उपलब्धता ही काळाची गरज आहे. ही गरज सर्वांनी ओळखून अशा स्तुत्य उपक्रमांना चालना द्यायला हवी. पोलीस ठाण्यात सतत महिलांचा वावर असतो. हा उपक्रम पोलीस ठाण्यात सुरु केल्याने गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.”
व्हीएस न्यूज - थेरगाव, गणेशनगर भागातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज गणेशनगर ते डांगे चौक या दरम्यान ‘हंडा’ मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चात शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, ह्युमन राईट्सचे पदाधिकारी डॉ. सतिश नगरकर, रामराव नवघन, मदन जोशी, अॅड. वर्षा भोसले, दिपाली गुजर, साधना आठवले,रेखा ठांणाबीर, मिना शेळके, लक्ष्मी मंडलिक, अनिता भालेराव, कमल जाधव यांच्यासोबत मंगलनगर, गणेशनगर, शिव कॉलनी, लोकमान्य कॉलनी परिसरातील रहिवाशी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिका-यांना निवेदन देण्यात आले.
थेरगाव, गणेशनगर भागातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. अपुर पाणीपुरवठा होत असून पुरेसे वेळ देखील पाणी येत नाही. उन्हाळा सुरु होण्यापुर्वी ही परस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय परस्थिती निर्माण होईल. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महिला संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेने वेळेत आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक निलेश बारणे आणि अॅड. सचिन भोसले यांनी केली.
व्हीएस न्यूज - दिघी येथील डब्ल्यू टी प्रोजेक्ट प्रा.लिमिटेड मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीतील प्राजक्ता पाटील यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने गौरव करण्यात आला. देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिघीतील डब्ल्यू टी प्रोजेक्ट प्रा.लिमिटेड मध्ये देखील महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून महिला दिनाची तयारी सुरु होती. महिलांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. कामाला आल्यावर सकाळी महिलांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. सायंकाळी कापण्यात आला.
गुणवंत महिला कामगार म्हणून प्राजक्ता पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दर्शना देशपांडे, अमृता पिसे, प्रियंका आवटे, स्वाती ढोले, प्राजक्ता पाटील, मनिषा गायकवाड, प्रणाली भोसले,मनाली पवार, श्यामल चव्हाण, अनघा घुले, स्वाती ढोले, अलका पारते, किर्ती मावकर आदी महिला उपस्थित होत्या.
व्हिएस न्यूज - तलवारीने केक कापून मित्राचा वाढदिवस साजरा करणाया बारा जणांवर निगडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी सहा जणांना गजाआड करण्यात आले आहे. ही घटना निगडी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. शुभम अमर मारिया (वय 18, रा. खराळवाडी, पिंपरी) सागर शिवा शिंदे (वय18) साहिल रमजान शेख (वय18, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) संदीप मारूती लोहेकर (वय20, रा. पिंपरी) सुमीत शिवाजी कांबळे (वय 19) रामचंद्र सुनील नाफडे (वय19, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत. याशिवाय सहा अल्पवयीन मुलांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील संत कबीरदास गार्डनमध्ये काही जण तलवारीने केक कापत असल्याची माहिती निगडी पोलीसांना मिहाली. त्यानुसार, निगडी पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तलवारीच्या आकाराएवढे दोन कोयते आणि चार वाहने असा 2 लाख 40 हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला. सहायक फौजदार तात्या तापकीर तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने तरूणासह रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजविली. वाहनांची तोडफोड करत एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दिघीतील भारत मातानगर येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सोमेश्वर सोळंके असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्यात आणि पोटात मारहाण करण्यात आली. सुरज जयस्वाल (वय 24, रा. वडमुखवाडी, चहोली) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयस्वाल यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, याचा राग टोळक्याला आला. सहा जणांच्या या टोळक्याने भारत मातानगर येथे येऊन जयस्वाल याला शिवीगाळ केली. रस्तयाने ये-जा करणाऱ्यांनाही शिवीगाळ करत दहशत माजवली. तसेच सोळंके यांनाही बेदम मारहाण केली. फौजदार फारूक सोलापूरे तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - ओळख असलेल्या एकाने दुचाकी नेली. दुचाकीच्या चावीबरोबर असणाऱ्या घराच्या चावीची बनावट चावी बनवून घरातील अडीच लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली आहे. श्रीमंत शिवाजी गंभीरे, (वय 40, रा. श्रीकृष्ण कालनी, मांजरी), आकाश उत्तम गिरी (वय-26 वर्षे, रा-मलंग गल्ली, सराफा लाईन, लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश पुरी हा फरार आहे. याप्रकरणी नंदकुमार अरूण बनसुडे (रा. डागा रूग्णालयाजवळ, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांनी माहिती दिली. फिर्यादी यांची श्रीमंत गंभीरे याच्याशी ओळख होती. आरोपी गंभीरे याने कामानिमित्त फिर्यादीची दुचाकी घेवून गेला होता. दुचाकीच्या चावीबरोबर फिर्यादी यांच्या घराचीही चावी होती. या चावीची बनावट चावी तयार करून आरोपी गंभीरे याने 27 फेब्रुवारी रोजी फिर्यादीचे घर उघडले. बेडरूममधील कपाटातील 2 लाख 55 हजार रूपयांचे सोन्याचे साडेआठ तोळे दागिने चोरून नेले. हे दागिने आरोपीने त्याचा मित्र आकाश गिरी याच्याकडे ठेवले होते. गंभीरे व गिरी या दोघांना सांगवी पोलीसांनी अटक केली असून त्याचा साथीदार गणेश पुरी हा फरार आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज -पिंपरी पोलीसांनी केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले. याप्रकरणी तीन अल्पवयीनांसह पाच जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन असा पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. किरण उर्फ दाद्या गौतम शिंदे (वय-21, रा. साई मंदिराजवळ, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. चोरीच्या वस्तू विकत घेणारा चाचा ऊर्फ शहजाद गफार खान (वय-46, रा. तळेगाव दाभाडे) यालाही पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी किरण शिंदे याच्याकडून एक लाख, 90 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चंदननगर, वाकड, सांगवी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दोन अल्पवयीन मुले वडगाव, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव या भागात घरातील एलईडी टीव्ही, मोबाईल फोन अशा वस्तूंची चोरी करीत होते. चोरी केलेले साहित्य ते तळेगाव येथील चाचा उर्फ शहजाद गफार खान याला विकत होते. पोलिसांनी खानकडून सात दुचाकी व तीन एलईडी टीव्ही असा एकूण दोन लाख, 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघांवर पिंपरी तीन, भोसरी एमआयडीसी दोन, दौंड आणि पंढरपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे दाखल आहेत. तसेच आणखी एका अल्पवयीन मुलाकडून 40 हजार रूपये किंमतीची होंडा ऍक्टीव्हा दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तीन अल्पवयीनांसह पाच जणांकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन असा पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे आदींनी केली. फोटो- पोलीस नावाने
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002